श्रीलंकेतील हल्ल्यांना जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 04:14 AM2019-04-24T04:14:31+5:302019-04-24T04:21:04+5:30

काही देशांकडून समर्थन मिळत असल्याने दहशतवादी संघटनांची हिंमत वाढते. दहशतवादावर जगभरात एकजूट नसल्याने त्यांचे फावते.

Who is responsible for the attacks in Sri Lanka | श्रीलंकेतील हल्ल्यांना जबाबदार कोण?

श्रीलंकेतील हल्ल्यांना जबाबदार कोण?

Next

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर

श्रीलंकेतील हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता. त्याची तयारी काही महिन्यांपासून चालू होती. स्फोटासाठी जाणीवपूर्वक इस्टर संडेचा दिवस निवडण्यात आला. स्थळेही पूर्वनियोजित होती. याला अतिरेकी वांशिक राष्ट्रवाद, धार्मिक दहशतवाद म्हणता येईल. विविध धर्मांत तेढ निर्माण करण्याचा उद्देश या हल्ल्यांमागे असतो. काही देशांकडून समर्थन मिळत असल्याने दहशतवादी संघटनांची हिंमत वाढते. दहशतवादावर जगभरात एकजूट नसल्याने त्यांचे फावते. सध्या दक्षिण आशियातील कोणताही देश मूलतत्त्ववादापासून सुरक्षित नाही, ही धोक्याची घंटा आहे.



श्रीलंकेत असा भीषण हल्ला पहिल्यांदाच झाला आहे. मागील काळात श्रीलंकेत ३० वर्षे यादवी युद्ध सुरू होते. हे युद्ध लिट्टे (लिबरेशन आॅफ टायगर तमिळ ईलम) आणि सिंहली यांच्यादरम्यान होते. त्यावेळी लिट्टेकडून १९९६च्या दरम्यान असे बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. मात्र, त्यातील मृतांचा आकडा ८० ते ९० इतका होता. रविवारच्या स्फोटांतील जीवितहानी त्याहून मोठी आहे.

काही आठवड्यांपूर्वी शांतताप्रेमी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंडमध्ये मशिदींवर दहशतवादी हल्ला झाला. त्याचे लाइव्ह चित्रण समाजमाध्यमांवर प्रसारित केले गेले. त्याचे प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचा दावा आयसिसने केला आहे. कोलंबोतील हल्ल्यांबाबत भारताच्या गुप्तहेर यंत्रणांनी ११ एप्रिलला श्रीलंकेला सूचना दिल्या होत्या आणि चर्च, भारतीय दूतावासावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचे कळविले होते. कट्टर मूलतत्ववादी मुस्लीम धार्मिक संघटना नॅशनल तौहिद जमात हिचे नावही कळविले होते. श्रीलंकेच्या पूर्वेकडील भागात या संघटनेचे मोठे जाळे आहे. या संघटनेने १००हून अधिक श्रीलंकन तरुणांना आयसिस संघटनेला जाऊन मिळण्यास प्रवृत्त केले होते. २०१७-१८ मध्ये श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिमांत झालेल्या दंगलीत या संघटनेची महत्त्वाची भूमिका होती.



यातून पुढे येणारा पहिला प्रवाह म्हणजे आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने आपले केंद्र पश्चिम आशियाकडून दक्षिण आशियाकडे सरकवल्याचा. ही संघटना इराक आणि सीरियातून हद्दपार झाली. त्यांना नवी भरती करायची आहे. त्यासाठी ते दक्षिण आशियामधील गरीब देशांना लक्ष्य करताहेत. अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव, श्रीलंका या देशांमधील गरीब मुसलमानांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आयसिस करत आहे. श्रीलंकेत मूलतत्ववादाचे लोण पसरले आहे, त्याचे श्रेय सर्वस्वी पाकिस्तानला जाते. राजेपक्षे यांच्या काळात श्रीलंकेत चीनचा प्रभाव वाढला. त्याच काळात श्रीलंकेने पाकशी करार केला. त्यानुसार, पारपत्राशिवाय पाकिस्तानी नागरिकांना श्रीलंकेत येण्याची अनुमती देण्यात आली. त्याचा वापर पाकने जिहादी विचारसरणी पसरविण्यासाठी केला.



भारताच्या राष्ट्रीय तपास समितीने गेल्या आठवड्यात देशात चार ठिकाणी छापे टाकले. वर्धा, हैदराबाद, केरळ येथील छाप्यांतून आयसिस संघटनेशी संबंधितांना ताब्यात घेण्यात आले. भारतातही बॉम्बहल्ल्याची तयारी होती, असे त्यातून समोर आले. या संदर्भात अलीकडची घडामोड लक्षात घ्यायला हवी. फ्रान्सने संयुक्त राष्ट्र परिषदेत ठराव मांडला आहे. त्यानुसार, दहशतवादाला प्रोत्साहन देणाºया देशांवर आर्थिक निर्बंधांची तरतूद करण्याची गरज प्रतिपादित करण्यात आली आहे. या ठरावाला सर्व देशांनी समर्थन दिले, तरच अशा देशांच्या नाड्या आवळल्या जातील. जागतिक बँक, अमेरिकेसारख्या देशांनीही दहशतवादाला खतपाणी घालणाºया, पोसणाºया देशांना साह्य देताना विचार करणे गरजेचे आहे. जागतिक महासत्तांसह विविध देशांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरील राजकारण थांबविले पाहिजे. सध्या दहशतवादाच्या २०० हून अधिक व्याख्या आहेत. प्रत्येक देश आपल्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहात आहे. आपल्या पद्धतीने अर्थ लावत आहे. त्यात एकवाक्यता नसल्याने दहशतवाद्यांचे फावते.

कोलंबोतील हल्ल्याची मोठी किंमत श्रीलंकेला चुकवावी लागेल. तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, पण येत्या काळात त्यांना कदाचित मोठ्या राजकीय पेचप्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. सध्या श्रीलंकेत चीन, पाकिस्तानसह अनेक देश पाय पसरण्याचा प्रयत्न करत आहेत. श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्या देशावर जीडीपीच्या ८० टक्के कर्ज आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी युरोपीय देशांकडून मदत घेतली जात आहे. त्यावरही याचा परिणाम होऊ शकतो.



श्रीलंका, मालदीव हे दहशतवादाचे लॉचपँड असू शकतात. ज्या देशांत अस्थिरता आहे, त्यांचीच निवड दहशतवादी करतात. तेथे जाळे पसरवून इतर ठिकाणी हल्ले करण्याचा त्याचा इरादा असतो. श्रीलंकेचे हिंदी महासागरातील स्थान पाहता, तिथे जिहादींनी आपला कब्जा केला, तर ते दक्षिण पूर्व आशियामध्येही हल्ले करू शकतात, त्यामुळे श्रीलंकेसह अनेक देशांनी सतर्क आणि सजग राहण्याची गरज आहे. या हल्ल्यातून पुन्हा धार्मिक दहशतवादाचा उग्र चेहरा समोर आला आहे. त्यामुळे राजकारण न करता, अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वसहमतीने आणि एकजुटीने प्रयत्न गरजेचे आहेत.

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आहेत)

Web Title: Who is responsible for the attacks in Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.