दुकानदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:25 AM2017-08-19T00:25:35+5:302017-08-19T00:25:38+5:30

चांगले विचार, सकारात्मक काम करण्याची इच्छाशक्ती, चुकीच्या गोष्टींना पाठीशी न घालण्याची वृत्ती आणि स्वच्छ प्रतिमेमुळे ते कायम माध्यमांचे आवडते आहेत.

Which one is shopping? | दुकानदारी कुणाची?

दुकानदारी कुणाची?

Next

देवेंद्र फडणवीस हे माध्यमांचे आवडते मुख्यमंत्री. चांगले विचार, सकारात्मक काम करण्याची इच्छाशक्ती, चुकीच्या गोष्टींना पाठीशी न घालण्याची वृत्ती आणि स्वच्छ प्रतिमेमुळे ते कायम माध्यमांचे आवडते आहेत. कधीही त्यांच्यावर टोकाची टीका या कार्यकाळात झालेली नाही. मात्र गुरुवारी भाजपाच्या बैठकीत त्यांनी भाषण करताना माध्यमांवर न पटणारी टीका तर केलीच शिवाय ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने चांगले काम करणाºयांचे त्यांनी अत्यंत हीन शब्दात मोजमाप केले. माध्यमे दुकानदारी करतात, वाईट शोधण्याचेच काम करतात, आपल्यातील उणीदुणी काढतात असेही ते म्हणाले. मात्र अशी टीका करताना अनेक गोष्टी ते विसरले. फडणवीस विरोधी पक्षात असताना याच दुकानदारांनी त्यांना मदत केली होती. तेव्हाचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे प्रत्येक भाषणाची सुरुवात करतात, ते आपल्याला बोलू देत नाहीत याचीही खंत त्यांनी त्यावेळी बोलून दाखवली होती. त्यावेळी त्या दुकानदारांनी त्यांच्या बातम्या छापल्या होत्या. पुढे खडसेंनी अनेक विषयात त्यांना बोलण्याची संधी आधी दिली होती. पुढे याच खडसेंना स्वत:च्या पक्षाच्या सरकारमध्ये आल्यानंतर व त्यांचे मंत्रिपद गेल्यानंतर एमआयडीसीचा एक जीआर मिळावा म्हणून थेट विधानसभेत अध्यक्षांना साकडे घालावे लागले. तरीही त्यांना तो जीआर मिळाला नाहीच. प्रकाश मेहता, सुभाष देसाई या मंत्र्यांवरच्या आरोपावर कारवाईच्या घोषणा झाल्या पण कृती काहीच नाही, विनोद तावडे, पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या येतात मग अशा गोष्टीेंचे विश्लेषण माध्यमांनी केले तर त्यांना थेट दुकानदार ठरवणे हा तर एककल्लीपणा झाला. माध्यमांचे कामच समाजातील चुकीच्या गोष्टी शोधण्याचे, त्यावर प्रहार करण्याचे असते. ‘‘खिचों ना कमानों को, ना तलवार निकालो, जब तोफ मुकाबिल हो, तो अखबार निकालो,’’ हा अकबर इलाहाबादींचा शेर आजचा नाही. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी माध्यमांचे महत्त्व सांगताना हे लिहून ठेवले होते. माध्यमे कायम चुकीच्या गोष्टीवर प्रहार करत असतातच. याच माध्यमांनी रान उठवले म्हणूनच देशात, राज्यात सत्ताबदल झाला. सत्तेची फळं फडणवीस यांना मिळाली. त्याची परतफेड सगळ्या माध्यमांनाच दुकानदार ठरवून करावी हे दुर्दैव. फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नाही. ते सुसंस्कृत राजकारणी आहेत. दुसरे कुणी असे बोलले असते तर त्याचे फार वाटले नसते पण फडणवीस यांनी असे विधान करुन त्या राजकारण्यांमध्ये आणि आपल्यात फरक नाही हे दाखवून दिले आहे. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर २४ तासाच्या आत खुलासा पाठवलाच पाहिजे, सरकारची बाजू पाठवलीच पाहिजे, असे लेखी आदेश काढणारे फडणवीस त्यांच्याच मंत्र्यांवर आरोप होत असताना गप्प बसतातच शिवाय माध्यमांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका, असेही जाहीरपणे सांगतात तेंव्हा त्यांच्या कथनी आणि करणीत अंतर दिसू लागते. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे तुम्ही तरी निदान अन्य राजकारण्यांसारखे वागू नये हीच या क्षेत्रात चांगले काम करणाºया दुकानदारांकडून माफक अपेक्षा.

Web Title: Which one is shopping?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.