दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या झुंडशाहीला बळ येते कोठून ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 08:56 PM2018-10-15T20:56:43+5:302018-10-15T20:56:52+5:30

धुळे येथे जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी २८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Where does the strength ochlocracy, who create the situation | दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या झुंडशाहीला बळ येते कोठून ?

दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या झुंडशाहीला बळ येते कोठून ?

Next

- विनायक पात्रुडकर
धुळे येथे जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी २८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून या खटल्यात नियुक्ती करण्यात आली आहे. मुले चोरणारी टोळी आली असल्याचे मेसेज व्हॉटस् अ‍ॅपवर फिरले आणि ही घटना घडली, असा दावा पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. जमाव किती भयानक असतो याची परिणती या घटनेतून महाराष्ट्राला आली. गेल्या काही वर्षांत अशा घटना देशभर घडत आहेत. कुठे गोमांस बाळगले म्हणून जमावाने बळी घेतला तर कुठे बाळ चोरणारी टोळी म्हणून जमावाकडून हत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेही गेल्या महिन्यात सर्व राज्यांना आदेश देऊन जमावाला निर्बंध घालण्यासाठी नियम करायला सांगितले. या आदेशाची महाराष्ट्र सरकारने तातडीने अंमलबजावणी केली. आदेशानुसार पोलीस खोट्या व्हॉटस्अ‍ॅप मेसेजवर लक्ष ठेवणार आहेत. जमाव एकत्र येणार नाही याची काळजी घेणार आहे. मात्र जमाव म्हणजे कोण, तर चार लोक एकत्र आले की जमाव तयार होतो. जमावाला जात, धर्म नसतो, हा जमाव कोणाचेही ऐकत नाही. केवळ हिंसा करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहित करतो. जमावाला थांबवणे व पांगवणे हे पोलिसांनाही शक्य होत नाही. त्यामुळेच दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली की १५१ कलमाअंतर्गत जमाव बंदी लागू केली जाते. मात्र झुंडशाहीला बळ येते कोठून, किंवा जमाव संतप्त झाल्यानंतर त्या गर्दीत त्यांना थांबवण्यासाठी कोणीच नसतो का, असे अनेक प्रश्न आहे. याचे एकमेव उत्तर म्हणजे मानसिकता. मुळात समाजाच्या मानसिकतेत बदल झाला, तर अनेक मुद्दे चर्चेनेही सुटू शकतील. पण तसे होत नाही. गर्दीला चेहरा नसतो. ही गर्दी सरास कायदा हातात घेते. कारण गर्दीतील प्रत्येकाला माहिती असते की घटनेचे खापर सहजासहजी कोणा एकावर फुटणार नाही. हीच मानिसकता माणूस मारायला कमी करत नाही. ही मानसिकता बदलण्यासाठी कठोर कायदा करायलाचा हवा. त्याचबरोबर व्यापक जनजागृतीचही यासाठी आवश्यकता आहे. आपण लोकशाही प्रधान देशात राहतो. या देशात कायदा आहे. तो सर्वांसाठी समान आहे. आरोपी पकडण्यासाठी पोलीस आहेत. आरोपीला शिक्षा देण्यासाठी न्यायपालिका आहे. प्रत्येक गुन्ह्यासाठी शिक्षा ठरलेली आहे. असे असताना आपण कायदा हातात घेणे योग्य नाही, याची शिकवण शालेय शिक्षणातूनच द्यायला हवी. लहान वयातच याचे बाळकडू मिळाले तर जमावाकडून होणारी मारहाण व त्यात जाणारे बळी, अशा घटना निश्चितच थांबू शकतील. कायदा सक्षम आहे. कायदा हाकणारे सक्षम नाहीत, अशी ओरड नेहमीच होत असते आणि त्यात तथ्य आहे. परिणामी न्यायदान प्रक्रियेलाही विलंब होतो. मात्र न्याय होतच नाही, असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. कायदा आहे म्हणून गुन्हेगारीला जरब आहे. अन्यथा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच गेले असते. तेव्हा जमावाला थांबवणे ही जशी पोलिसांची जबाबदारी आहे, तसेच भान विसरून जमावात सामील न होणे ही देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलीस त्यांचे काम करतीलच, पण प्रत्येकाने स्वत:पासूनच सजग नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा, तरच भविष्यात जमावाकडून कोणाची हत्या होणार नाही. तसेच मारहाणीत मृत्यू होणे महाराष्ट्राला निश्चितच शोभनीय नाही. त्यामुळे जमाव बळी घेत असलेल्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने तयार केलेल्या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी. धुळे प्रकरणात आरोपपत्र जसे वेळेत दाखल झाले, तसेच या खटल्याचा निकालही वेळेत लागवा, एवढीच अपेक्षा.

 

Web Title: Where does the strength ochlocracy, who create the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.