कुठे चाललोय आपण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:55 AM2018-06-21T00:55:26+5:302018-06-21T00:55:26+5:30

एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असेल तर ते माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ?

Where are you going? | कुठे चाललोय आपण ?

कुठे चाललोय आपण ?

- जितेंद्र ढवळे
एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असेल तर ते माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ?
आठ दिवसांपूर्वी नागपुरात पवनकर कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या कशासाठी करण्यात आली? मारणारा संशयित आरोपी विवेक पालटकर हा सायको होता? त्याने कौटुंबिक वादातून हे हत्यांकाड घडवून आणले, असा कयास परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी बांधला आहे. नराधम पालटकर हत्याकांडानंतर फरार झाला आहे. मात्र या हत्याकांडानंतर सोशल मीडियावर आणि नागपूरकरांवर प्रेम न करणाऱ्यांनी पुन्हा एकदा नागपूरला ‘क्राईम कॅपिटल’ची बिरुदावली लावली आहे. गत सहा वर्षांत नागपुरात दुहेरी हत्याकांडाची सहा आणि तिहेरी हत्याकांडाची पाच प्रकरणं घडली. काही व्यक्तिगत कारणांमुळे तर काही आपसी वैमनस्यातून ही हत्याकांड घडली आहेत. मुळात या हत्याकांडाचा खोलवर अभ्यास केला तर क्रोध आणि अहंकार या दोन गोष्टी यात दडल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी नरसाळ्यात कोंबडी अंगणात आल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर एका माथेफिरूने तिघांना ठार मारले होते. अतिक्रोधाचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
२६ जून २०१२ रोजी कळमन्यातील आभा कॉलनीत नाथजोगी समुदायातील सुपडा मगन नागनाथ, हसन दादाराव सोलंकी आणि पंजाब भिकाराम शिंदे या तिघांची जमावाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. हे बिचारे पोट भरण्यासाठी महिलांचे सोंग (वेशांतर) करून भीक मागत होते. जमावाच्या नावाखाली अविवेकी वृत्तीने या तिघांना दगडाने ठेचून ठार मारले होते. या हत्याकांडात तर मारणारे आणि मरणारे दोन्ही पक्ष गुन्हेगारी प्रवृत्तीचे नव्हते. मग यालाही क्राईम कॅपिटलची फोडणी आपण लावायची का? १७ फेब्रुवारी २०१८ रोजी नंदनवन परिसरात राशी कांबळे आणि उषा सेवकदास कांबळे या आजीनातीची गणेश शाहू आणि साथीदारांनी निर्घृण हत्या केली होती. यात मरणाºया राशीचा काय दोष होता ? मात्र येथेही क्रोधाने निरागस मुलीचा बळी घेतला. स्वत:च्या चार वर्षीय मुलासह बहीण, जावई, भाची आणि बहिणीची सासू या सर्वांना एकाच वेळी एवढ्या क्रूरपणे मारून विवेक पालटकर याने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मात्र हे हत्याकांड त्यानेच घडवून आणले, हे अद्यापही कायदेशीररीत्या कुठेच सिद्ध झालेले नाही. पालटकरला तातडीने अटक झालीच पाहीजे. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून पवनकर कुटुंबातील हत्याकांडावर पर्दाफाश करण्याची मागणी समाजातून प्रखरतेने होताना दिसत नाही. मात्र एखादे हत्याकांड घडल्यानंतर केवळ पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला नाही, नागपूरची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, असे उपदेश सोशल मीडियावर पहायला आणि शहरातील कट्ट्यावर ऐकायला मिळतात. मात्र हे असे का होतेय ? नागपुरात अशा घटना घडू नये यासाठी सोशल मीडियावर कुणी तसा मॅसेज किंवा व्हिडीओ टाकल्याचे क्वचितच पाहावयास मिळते. मात्र एखाद्या पोलीस वाल्याने कुणाशी वाद घातला किंवा कुणाला मारले तर तो व्हिडीओ आम्ही क्षणाचाही विलंब न करता विविध गु्रपवर व्हायरल करतो. मात्र नागपुरात एखादी चांगली घटना घडली तर ती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी किती लोक पुढाकार घेतात? एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असतील तर हे माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ? सजग नागपूरकर म्हणून ही आमची जबाबदारी नाही का ?

Web Title: Where are you going?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.