केंद्रातल्या मोदी सरकारचं हे सूडसत्र कधी संपणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 05:27 AM2019-04-18T05:27:31+5:302019-04-18T05:29:14+5:30

कनिमोझी, रॉबर्ट वडेरा यांच्याविरुद्धच्या कारवाया, दिग्विजयसिंगांच्या घरावरचे छापे कशाचे निदर्शक आहेत?

When will the suppression of the Modi government at the Center end? | केंद्रातल्या मोदी सरकारचं हे सूडसत्र कधी संपणार?

केंद्रातल्या मोदी सरकारचं हे सूडसत्र कधी संपणार?

googlenewsNext

कनिमोझी, रॉबर्ट वडेरा यांच्याविरुद्धच्या कारवाया, दिग्विजयसिंगांच्या घरावरचे छापे कशाचे निदर्शक आहेत? याच काळात ज्यांची संपत्ती शेकडो पटींनी वाढली व त्या वाढीची सबळ कारणे त्यांना सांगता येत नाहीत अशी माणसे छाप्यांतून कशी सुटली?
सूड ही वृत्ती आहे आणि ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणातही उद्भवू शकते. सामान्यपणे जी माणसे दुखावलेली वा अन्यायग्रस्त असतात त्यांच्यात ही भावना सहजपणे येते. मात्र जे सत्तेत असतात आणि सत्तेची सारी आयुधे ज्यांच्या हातात असतात ते जेव्हा सुडाच्या भावनेने पेटतात तेव्हा ते एकाचवेळी अमानुष आणि अनाकलनीय होतात. केंद्रात मोदींचे सरकार गेली पाच वर्षे सत्तेत आहे. प्रशासन, पोलीस, लष्कर व तपास यंत्रणा त्यांच्या हातात आहेत आणि तरीही ऐन निवडणुकीच्या काळात त्या सरकारची सूडभावना प्रगट व सक्रिय होत असेल तर ते केवळ लोकशाहीशीच नव्हे, तर भारतीयांच्या क्षमाशील परंपरेशीही विसंगत ठरणारे आहे. गेल्या महिन्याभरात मोदींच्या सरकारने विरोधी पक्षातील किती नेत्यांच्या घरांवर आर्थिक अन्वेषण विभागाचे छापे घातले? त्यातील किती निरर्थक निघाले आणि त्यातून काही मिळण्यापेक्षा सरकारची सूडवृत्तीच देशाला कशी दिसली हे पाहिले की सूडशाही हाही शासन व्यवस्थेचाच एक प्रकार असावा असे वाटू लागते. तामिळनाडूत ऐन मतदानाच्या वेळी द्रमुकच्या नेत्या कनिमोझी यांच्या घरावरील छापा हा अशाच सूडवृत्तीचा ताजा नमुना आहे. रॉबर्ट वडेरा विरुद्धच्या कारवाया, दिग्विजयसिंगांच्या घरावरचे छापे, काँग्रेसच्या अनेक माजी मंत्र्यांच्या, नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या घरावर घातलेल्या धाडी या कशाच्या निदर्शक आहेत? याच काळात ज्यांची संपत्ती शेकडो पटींनी वाढली व तिच्या वाढीची कोणतीही सबळ कारणे त्यांना सांगता येत नाहीत अशी माणसे अशा छाप्यांतून कशी सुटली वा सोडली गेली? केवळ विरोधक आहेत म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी हे छापे घालायचे आणि आपल्या पंखाखाली असलेल्यांना संरक्षण देत गोंजारत राहायचे हे राजकारण लोकशाहीचे नसून सूडबुद्धीचे आहे. सरकारजवळ स्वत:चे सांगण्यासारखे काही उरले नाही की ते विरोधकांचे उणेपण सांगू लागते. दुसऱ्यांचे दोष दाखवून आपले मोठेपण सिद्ध करण्याचा हा बालिश प्रकार आहे. बरे, तसे सांगून संपले असेल तर? मग त्यांच्या जुन्या पिढ्यांच्या चुका सांगायच्या. मनमोहन सिंगांवर टीका करता येत नसेल तर ती नरसिंहरावांवर करायची. त्यांचे सांगून झाले की राजीव गांधींना हाताशी धरायचे. मग बोफोर्सच्या कित्येक दशके चालू असलेल्या, संपलेल्या व विस्मरणात गेलेल्या प्रकरणावर नवी कमिशने नेमायची. राजीव झाले की इंदिरा गांधींना ओढायचे. त्यांच्यामुळे पंजाबचा प्रदेश भारतात राहिला व त्यासाठी त्यांनी बलिदान दिले हे विसरायचे आणि त्यांनी सुवर्ण मंदिरात केलेल्या लष्करी कारवाईला शिवीगाळ करणारी भाषणे करायची.

त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले हे विसरायचे आणि त्यांचा पक्ष पाकिस्तानला साथ देतो असे खोटेच सांगायचे; त्याही पलीकडे जाऊन पं. नेहरूंना व गांधीजींनाही दोष द्यायला धरायचे. ही सारी सुडाची परंपरा आहे. आयुष्यात वर्षानुवर्षे वाट्याला आलेल्या पराभवातून ती जन्माला आली आहे. काम करणारी सरकारे काम करणारच. ते करताना काही बरोबर तर काही चूकही होणार. मग त्या चुकांवरच आपल्या राजकारणाची चूल पेटवायची हा प्रकार केवळ भारतीय आहे आणि तो संघ प्रवृत्तीचा आहे. राहुल गांधींवर टीका, करावी असे काही नाही. प्रियांकाला धारेवर धरावे असेही काही नाही. ते दोघेही राजकारणात नवे आहेत. स्वच्छ आहेत. पण त्यांना बदनाम करावयाला त्यांचे पूर्वज शोधायचे, त्यांचे जाती-धर्म विचारायचे आणि त्यांच्यावर तोच तो घराणेशाहीचा ठपका ठेवायचा. त्यांच्याकडे किमान घराणेशाही आहे. आपल्याकडे तर फक्त एकाधिकारशाही आहे व तीही मोदीशाही आहे हे विसरायचे, यातील एकारलेपण उघड आहे.


आपण हाती घेतलेली प्रत्येक योजना, नोटाबंदी ते रोजगारनिर्मिती मातीत गेली; उलट बेरोजगारी वाढली, विमाने जमिनीवर आली आणि शेतकरी शेती करण्याऐवजी आत्महत्या करू लागला. त्या परिस्थितीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे. इतरांनीही ते मुद्दे उपस्थित करू नये, यासाठी मग जुनेच मुद्दे उकरून चर्चेत आणायचे. राष्ट्रवादाची आपली संकल्पना राबवायची आणि ती मान्य नसलेल्यांना देशद्रोही ठरवायचे. ही स्थिती मग सूडसत्राला जन्म देते. ते थांबवायचे, तर नागरिकांनीच सतर्क व्हायला हवे.

Web Title: When will the suppression of the Modi government at the Center end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.