डोनाल्ड ट्रम्प पुरस्कृत बंदनंतर पुढे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 02:59 AM2019-01-29T02:59:25+5:302019-01-29T03:00:07+5:30

मग आता ट्रम्प काय करणार? ते खुद्द ट्रम्पनाही माहीत नाही. ते अजिबात कोणाला विचारत नाहीत, जाणकारांचा सल्ला ते घेत नाहीत.

what will happen in us after donald trump government shutdown | डोनाल्ड ट्रम्प पुरस्कृत बंदनंतर पुढे काय?

डोनाल्ड ट्रम्प पुरस्कृत बंदनंतर पुढे काय?

Next

- निळू दामले

अमेरिका या जगातल्या सर्वात श्रीमंत देशाचं सरकार एक महिना बंद ठेवल्यानंतर अध्यक्ष ट्रम्पनी ते पुन्हा सुरू केलंय. तेही फक्त ३ आठवड्यांपुरतंच. त्यांची ५.७ अब्ज डॉलरची मागणी मान्य झाली नाही तर पुन्हा सरकार बंद करू किंवा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करून ते पैसे लष्कराच्या खर्चातून काढून वापरू, अशी धमकी ट्रम्पनी दिलीय.

एक महिना सरकार बंद होतं. ८ लाख सरकारी नोकर आणि सरकारसाठी काम करणारे लाखो कंत्राटदार यांना कामावरून कमी करण्यात आलं होतं, त्यांचा पगार बंद होता. अमेरिकेत पगाराचा चेक आला नाही तर लोकांचे वांधे होतात. लोकांनी कर्ज काढलेली असतात त्याचा हप्ता चुकतो. अमेरिकन माणसं सर्व खरेदी कर्जावरच करत असतात. खाणावळीत आणि पिणावळीत खातातपितात तेही क्रेडिट कार्डावरच. के्रडिट कार्डाचे पैसे पगारातून जातात. पगार मिळाला नाही की क्रेडिट कार्डवाले दंड-व्याज आकारतात. मुख्य म्हणजे हप्ता वेळेवर भरला नाही असा शिक्का लागला की त्यांना कोणतीही खरेदी करता येत नाही, नोकरी मिळतानाही त्रास होतो, नागरिक म्हणून जगायलाच तो नालायक ठरतो. अमेरिकेत कोणीही पैसे बचत खात्यात किंवा कुठेही साठवत नाही, पगाराच्या चेकवरच सर्व अवलंबून असतं. ट्रम्प यांनी सरकार बंद केल्यामुळे लाखो लोकांचे जाम वांधे झाले. ट्रम्प म्हणतात की, लवकरच त्यांच्या बंद काळातल्या वेतनाची भरपाई केली जाईल. परंतु दंड-व्याज काही ट्रम्प देणार नाहीत आणि हप्ते न फेडल्याबद्दल बसणारा शिक्का काही ट्रम्प पुसणार नाहीत. हे लोकांचं नुकसान कसं भरून निघणार? काही लाख माणसं अगदी कमी पगारावर काम करतात. त्यांच्या घरी अन्नाची चणचण झाली होती. त्यांना सार्वजनिक अन्नछत्रात जाऊन भीक मागितल्यागत जेवावं लागलं होतं. तो त्रास ट्रम्प कसा भरून काढणार?

अमेरिकेत डेथ व्हॅली म्हणून एक जागा आहे. तिथलं तापमान साठ अंशांच्याही पलीकडे जात असतं. काळजी न घेता माणूस तिथं गेला तर तो मरतोच. प्राणी आणि वनस्पती तिथं मेटाकुटीनं जिवंत असतात. ती जगातली एक अद्वितीय अशी जागा आहे, वैज्ञानिक त्या जागेचा अभ्यास करत असतात. या जागेची काळजी सरकार घेत असतं. सरकार बंद असल्यानं तिथं संरक्षक जाऊ शकले नाहीत. मूर्ख माणसं तिथं गाड्या घेऊन गेली आणि त्यांनी त्या भागात कित्येक ठिकाणचं वनस्पती जीवन, प्राणी जीवन नष्ट करून टाकलं. या नुकसानीची भरपाई कोणीही कधी करू शकणार नाही.

या नुकसानीचा विषय निघाल्यावर ट्रम्प यांची सून म्हणाली, ‘‘थोडासा गोंधळ झाला, काही लोकांना थोडासा त्रास झाला असेल. पण देशाच्या भल्यासाठी त्यांनी हा त्रास सहन करायला हवा...’’ अब्जोपती विल्बर रॉस हे अमेरिकेचे व्यापार मंत्री आहेत. ते घरात ६00 डॉलर म्हणजे सुमारे ५0 हजार रुपये किमतीच्या स्लिपर्स वापरतात. ते म्हणाले, ‘‘एक महिना पगार मिळाला नाही याबद्दल लोक खळखळ का करतात ते मला कळत नाहीये. त्यांनी बँकांमधून कर्ज काढायला हवं होतं.’’

भारतातल्या नोटाबंदीची आठवण झाली. लोकांना त्रास झाला. सत्ताधारी पक्षातले मंत्री आणि लोकप्रतिनिधी चांगले गब्बर होते, त्यांना कसलाही त्रास झाला नाही. त्रास झाला तो करोडो सामान्य लोकांना. सत्ताधारी लोकांचं त्या वेळी म्हणणं होतं की देशासाठी लोकांनी एवढा त्रास सहन करायला काय हरकत आहे?

ट्रम्प यांनी सरकार का बंद ठेवलं होतं? त्यांना मेक्सिकन हद्दीवर एक भिंत उभारायची आहे. तसं आश्वासन त्यांनी निवडणूक प्रचार मोहिमेत दिलं होतं. मेक्सिकोतून येणारी मंडळी बलात्कारी, गुन्हेगार, स्मगलर असतात असं ते म्हणतात. त्यांना रोखण्यासाठी ट्रम्पना भिंत उभारायची आहे. ढीगभर अभ्यास आणि चाचण्यांनी सिद्ध केलंय की मेक्सिकोतून येणारी माणसं गरजू असतात, रोजगारासाठी ती अमेरिकेत येतात. मादक द्रव्यं अमेरिकेत येतात ती बोटीनं, विमानानं आणि ट्रकनं. आपल्याबरोबर ती द्रव्यं घेऊन कोणी हद्द ओलांडत नाहीत. अमेरिकेतले गुन्हे स्थानिक अमेरिकन जास्त करतात, बाहेरून आलेले मेक्सिकन नव्हेत. परंतु ट्रम्प यांना सत्याशी देणंघेणं नाही. परकीयांच्या द्वेषावर पोसलेल्या अमेरिकन गोऱ्यांच्या मतांवर ते निवडून येत असल्यानं बाहेरची माणसं रोखणं हा ट्रम्प यांचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी परदेशातून येणाºया काळ्या, मुसलमान, आफ्रिकी इत्यादी लोकांवरही बंधनं घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. स्थलांतरित अमेरिकेत येऊ नयेत, यादृष्टीने ते कायम व्यूहरचना करताना दिसत असतात.

ट्रम्प यांची मागणी संसदेतल्या डेमॉक्रॅटिक पार्टीला मान्य नाही. हद्दीवर लक्ष ठेवलं पाहिजे, माणसं आत घेताना काळजी घेतली पाहिजे हे डेमॉक्रॅट्सना मान्य आहे. त्यासाठी भिंत उभारणं व ५.७ अब्ज डॉलरचा अवाढव्य खर्च करणं त्यांना मान्य नाही. आणीबाणी जाहीर करून लष्कराच्या पैशावर डल्ला मारणं शक्य नाही, ते कायद्यात बसणार नाही, न्यायालय ते नामंजूर करेल असं जाणकारांचं मत आहे. मग आता ट्रम्प काय करणार? ते खुद्द ट्रम्पनाही माहीत नाही. ते अजिबात कोणाला विचारत नाहीत, जाणकारांचा सल्ला ते घेत नाहीत. हेकेखोर राजकारणी अशी त्यांची प्रतिमा आहे. टीव्हीसमोर स्वत:ची छबी पाहत असताना त्यांच्या डोक्यात जे काही येईल ते ट्रम्प करतील. वाट पाहायची.

(लेखक आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.)

Web Title: what will happen in us after donald trump government shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.