पुतळातोड प्रवृत्तीचा निषेध खरा की तोंडदेखला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:02 AM2018-03-10T01:02:14+5:302018-03-10T01:02:14+5:30

त्रिपुराच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकला आणि भगव्या फौजेच्या अंगात प्रचंड उन्माद संचारला. सत्ता ग्रहण करण्याच्या आधीच, बेलोनिया टाऊनच्या कॉलेज चौकात, रशियन क्रांतीचे जनक ब्लादिमीर लेनिन यांचा पुतळा बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आला. त्रिपुरानंतर तामिळनाडूत द्रविडी चळवळीचे जनक रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली. पाठोपाठ...

What is the real face of male domination? | पुतळातोड प्रवृत्तीचा निषेध खरा की तोंडदेखला?

पुतळातोड प्रवृत्तीचा निषेध खरा की तोंडदेखला?

Next

- सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)

त्रिपुराच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकला आणि भगव्या फौजेच्या अंगात प्रचंड उन्माद संचारला. सत्ता ग्रहण करण्याच्या आधीच, बेलोनिया टाऊनच्या कॉलेज चौकात, रशियन क्रांतीचे जनक ब्लादिमीर लेनिन यांचा पुतळा बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आला. त्रिपुरानंतर तामिळनाडूत द्रविडी चळवळीचे जनक रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली. पाठोपाठ मेरठ जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कोलकत्यात श्यामाप्रसाद मुखर्जी अन् केरळात महात्मा गांधींच्या पुतळ्याचीही विटंबना करण्यात आली. पुतळातोड प्रकरणाचे लोण आता देशभर वेगवेगळ्या प्रकारे वाढत जाणार, याचा अंदाज येण्यास या घटना पुरेशा होत्या. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांनी या घटनांचा निषेध करण्याचा उपचार पूर्ण केला. केंद्रीय गृह मंत्रालयाने नाराजी व्यक्त करीत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राज्य सरकारांना सक्त कारवाईचे आदेश पाठवले. अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाली नाही तर भारताची अवस्था सीरियासारखी होईल, असा गर्भित धमकीचा कल्पनाविलास ज्यावेळी श्रीश्री रविशंकर देशाला ऐकवीत होते, त्याच सुमारास त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याचे नाट्य सुरू होते. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय निर्लज्जपणे या नाट्याचे समर्थन करीत होते. ‘पूर्वीच्या सरकारने जे उभारले ते नष्ट करण्याचा अधिकार त्यांच्या जागी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या दुसºया सरकारला आहे’, असा राज्यपाल रॉय यांच्या निवेदनाचा सारांश होता. मूर्तिभंजन इथेच थांबले नाही तर भाजपचे वादग्रस्त राष्ट्रीय सचिव एच.राजा यांनी ‘त्रिपुरातल्या लेनिन पुतळ्याच्या विध्वंसाचा दाखला देत, तामिळनाडूत रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्याचेही तेच होईल,’ अशी पोस्ट फेसबुकवर टाकली. लगेच काही तासात वेल्लोर येथे पेरियार यांच्या पुतळ्याचेही भंजन झाले. तुटक्या अवस्थेत हा पुतळा खाली पडलेला आढळला. त्रिपुरात भाजप सरकार सत्तेवर येण्याआधीच कम्युनिस्टांच्या कार्यालयांवर हिंसक हल्ले चढवले गेले. लेनिन असोत की पेरियार दोघांचेही मूर्तिभंजन घडवणारे लोक तेच आहेत जे देशभर नथूराम गोडसेंचे पुतळे उभारू इच्छितात. म्हणूनच केरळात गांधीजींच्या पुतळ्याची विटंबनाही याच मालिकेतली असावी असे वाटते. त्रिपुराचे राज्यपाल रॉय, श्री श्री रविशंकर, एच.राजा यांच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्याचे धाडस, मोदी सरकार अथवा भाजपने दाखवलेले नाही. तसा त्यांचा इरादाही दिसत नाही. पंतप्रधान केवळ तोंडदेखला निषेध नोंदवून आणि गृह मंत्रालय परस्पर राज्य सरकारांना सक्त करवाईचे आदेश देऊन मोकळे झाले आहे.
लेनिनचा पुतळा उद्ध्वस्त केल्यानंतर स्वयंघोषित राष्ट्रभक्त तावातावाने लेनिन अन् मार्क्स काही भारतीय नाहीत, त्यांच्या तत्त्वज्ञानाची देशाला गरज नाही, असा युक्तिवाद करतात. सुब्रमण्यम स्वामी लेनिनना दहशतवादी संबोधतात. ‘विदेशी विचारसरणीला भारतात स्थान असता कामा नये’, असा सुविचार (!) गृहराज्यमंत्री हंसराज अहिर देशाला ऐकवतात, हे सारे जण सोयीस्करपणे एक गोष्ट विसरतात की ज्या संसदीय लोकशाहीने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी आणि भाजपला त्रिपुराच्या सत्तेत विराजमान केले ती संसदीय लोकशाहीदेखील परदेशातूनच भारतात अवतरलेली संकल्पना आहे. ज्या तथाकथित राष्ट्रवादावर भाजपचा अतिरेकी विश्वास आहे ती विचारसरणीदेखील विदेशीच आहे. ज्या परदेशी गुंतवणुकीला कालपरवापर्यंत भाजपचा कडाडून विरोध होता, आता त्याच परदेशी गुंतवणुकीचे भारतात अगत्याने स्वागत करताना पंतप्रधान मोदींसह भाजप शासित सरकारांच्या तमाम मुख्यमंत्र्यांची मान गर्वाने उंच होते. लेनिन भारतीय नव्हते तर महात्मा गांधी आणि भगवान बुध्द मग भारतापुरते मर्यादित आहेत काय? या दोघांच्या प्रतिमा आणि पुतळे तर जगातल्या अनेक देशांनी सन्मानाने उभे केले आहेत. कुणाकुणाचे भंजन तुम्ही घडवणार?
प्रचंड उन्मादात लेनिनचा पुतळा भगव्या फौजेने पाडला. लेनिन यांना परदेशी ठरवले, मार्क्सवादाची थट्टा उडवली, केरळात अहिंसेचा पुरस्कार करणाºया महात्मा गांधींच्या पुतळ्यावरही हल्ला चढवला तरी स्वत:ची सहीसलामत सुटका करवून घेण्यात ही फौज यशस्वी होईल मात्र पेरियार यांच्या पुतळा भंजनाची मोदी सरकार आणि भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल. डॉ. आंबेडकर, ज्योतिबा फुले अन् रामस्वामी पेरियार यांचे पुतळे केवळ निर्जीव नाहीत तर दलित अस्मितेचा तळपता हुंकार या प्रतिकांशी निगडीत आहे. १८२७ साली जन्मलेल्या ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या अस्पृश्यताविरोधी लढ्याने आर्यांच्या श्रेष्ठतेलाच आव्हान दिले, त्यातूनच दलित शब्द जन्माला आला. ज्योतिबा फुलेंनंतर ५० वर्षांनी पेरियार जन्मले. ब्राह्मणवादी पाखंडी परंपरांच्या विरोधात त्यांनी स्वाभिमान आंदोलन चालवले. आर्य आणि हिंदू परंपरेतल्या दुष्प्रवृत्तींविरुध्द प्रचंड संताप पेरियार यांच्या मनात दाटलेला होता. पेरियार यांच्यानंतर १२ वर्षांनी डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेब दलित समाजाच्या बौध्दिक प्रखरतेचे ज्वलंत प्रतीक होते. आंबेडकरांनी हिंदुत्ववादी रूढी परंपरांच्या श्रेष्ठतेवर जी प्रश्नचिन्हे उभी केली, जे तर्कशुध्द प्रहार केले, त्याचे उत्तर परंपरेचे पूजन करणारे हिंदुत्ववादी आजतागायत देऊ शकले नाहीत. दलितांची सावलीही एकेकाळी ज्यांना अस्पृश्य वाटत असे, त्यांना दलित अस्मितेच्या प्रखर विचारसरणीपासून स्वत:चा बचाव करावासा वाटला. गठ्ठाबंद मतपेट्यांच्या राजकारणात सर्व तंत्रांचा अवलंब करीत, भाजपला दलितांपुढे दिखाऊ शरणागती पत्करणे सोयीस्कर वाटले. डॉ. आंबेडकरांशी निगडीत सर्व स्मारक स्थळांच्या पुनरुज्जीवनाचा देखावा, याच भावनेतून निर्माण झाला. त्रिपुरात उन्मादी वीरांनी लेनिन यांचा पुतळा उद्ध्वस्त केल्यानंतर त्याचे निर्लज्ज समर्थन करणाºयांची पाठराखण ज्यांनी केली, त्या मोदी सरकारला तब्बल पाच दिवसांनी पुतळातोड प्रवृत्तीचा अखेर निषेध करावा लागला. कारण तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याचे भंजन त्यांच्याच पदाधिकाºयाच्या इशाºयानंतर झाले आहे. प.बंगालमधे डाव्यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचे उच्चाटन ममता बॅनर्जींनी केले मात्र लेनिनच्या पुतळ्याचे भंजन घडवावे, असे दीदींना कधी वाटले नाही. जगभर ज्यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम आहे, लेनिन त्यापैकीच एक आहेत. लोकशाही व्यवस्थेच्या देशात लेनिन, गांधी, पेरियार, आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जींच्या विचारांशी असहमत असणे समजू शकते, त्यांचे पुतळे तोडणे हा मात्र केवळ बीभत्स उन्माद आहे. लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका जिंकणे नव्हे, सहिष्णुता आणि सौहार्दही त्यात अभिप्रेत असतो, याची जाणीव यांना कोण करून देणार?

Web Title: What is the real face of male domination?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.