कोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल काय?

By अोंकार करंबेळकर | Published: September 21, 2018 03:52 AM2018-09-21T03:52:45+5:302018-09-21T03:52:57+5:30

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन आणि उत्तर कोरियाचे एकाधिकारशहा किम जोंग उन यांच्यामध्ये सुरू असलेली तीन दिवसांची चर्चा परिषद आज संपली आहे.

 What is the peace of the Korea Peninsula? | कोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल काय?

कोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल काय?

googlenewsNext

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन आणि उत्तर कोरियाचे एकाधिकारशहा किम जोंग उन यांच्यामध्ये सुरू असलेली तीन दिवसांची चर्चा परिषद आज संपली आहे. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे मून जे इन स्वत: विमानाने सोल ते प्योंगयांग असा विमानप्रवास करून गेल्याने नवा इतिहास रचला गेला आहेच, आता या चर्चेतून काय फळ मिळेल हे काही काळानंतर स्पष्ट होईल.
यापूर्वी पॅनमुन्जोम येथे ऐतिहासिक सीमेवर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हा कोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल, युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न होतील, द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त होईल असे संकेत मिळाले.
मात्र हे संकेत अजिबातच स्पष्ट नसल्याचे त्यांच्या बैठकीनंतर काहीच दिवसांमध्ये उघड झाले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व किम यांची सिंगापूरच्या सेंटोसा बेटावर भेट झाली. यामध्ये अण्वस्त्रमुक्तीसाठी कोणताही ठोस विचार करण्यात आला नाही. तेव्हाच किम आणि मून भेट तकलादू होती हे स्पष्ट झाले. आता मात्र दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून यांना किमकडून अण्वस्त्रमुक्तीसाठी काही तरी ठोस वदवून घ्यावे लागणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या बेभरवशीपणाचाही या शांतता प्रक्रियेवर परिणाम होत आहे. अमेरिकेचे सेक्रेटरी आॅफ स्टेट माइक पोम्पेओ यांनी अचानक उत्तर कोरियाची भेट रद्द करणे त्याचेच प्रतिबिंब म्हणता येईल.
पोम्पेओ यांची भेट रद्द झाल्यावर ट्रम्प प्रशासन मन मानेल तसे वागते, एकतर्फी निर्णय घेते, असा आरोप करण्याची उत्तर कोरियाला पुन्हा संधी मिळाली. या सर्वाचा परिणाम शांतता चर्चेवर होईल आणि आंजारून गोंजारून शांत केलेले किम नावाचे शिंगरू पुन्हा उधळेल अशी भीती मून यांना वाटते. अण्वस्त्रमुक्तीच्या चर्चेची गाडी रुळावरून खाली घसरू नये यासाठी त्यांना प्रयत्न करायचे आहेत. त्यातच आपल्या आर्थिक सहाकार्य स्वप्नाचे घोडे दामटायचे आहे. गेली अनेक वर्षे दक्षिण कोरिया उत्तर कोरियाबरोबर आर्थिक सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दोन्ही कोरियामध्ये रेल्वेवाहतूक पुन्हा सुरू व्हावी, मालवाहतूक व्हावी तसेच नैसर्गिक वायू व इंधन भूमार्गाने दक्षिणेत यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
संपूर्ण शांतता हे जरी दूरचे स्वप्न असले तरी आधी अशी सहकार्याची लहान पावले टाकली पाहिजेत, असे मत मून यांचे आहे. एक चांगली बाब म्हणजे नुकतेच उत्तर कोरियाच्या केसाँग शहरामध्ये लायझन आॅफिस सुरू करण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा संवाद सुरू करण्यासाठी अत्यंत सोपे जाणार आहे.
अण्वस्त्र आणि कथित हायड्रोजन बॉम्बच्या धमक्यांवर किम जोंग उनने अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. सात दशकांहून अधिक काळ चिघळलेल्या, शीतयुद्धातही कायम धगधगत राहिलेला कोरियाचा निखारा आता खरंच शांत होईल की नाही हे आताच सांगता येणार नाही. सध्या तरी किम जोंग उन काय म्हणतात हे पाहणे आपल्या हातामध्ये आहे.

Web Title:  What is the peace of the Korea Peninsula?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.