आधारवर काय मिळेल साहेब..?

By अतुल कुलकर्णी | Published: April 4, 2018 12:05 AM2018-04-04T00:05:39+5:302018-04-04T00:05:39+5:30

गेले काही दिवस फार परेशान झालोय. आधार कार्डाचा आधार वाटायचा सोडून भार वाटू लागलाय साहेब हो... आमच्या गावात सगळ्यांना आधार कार्ड आहे. काल आमच्या मावशीनं ते कार्ड रेशन दुकानदाराला दाखवलं. त्याच्यावर रेशन मिळेलं का म्हणून विचारलं. तर तो म्हणाला, पिवळं कार्ड आणा, हे नाय चालायचं... आता रेशनकार्ड पण सांभाळा, हे कार्ड पण सांभाळा म्हणजे जरा टेंशनचं काम नाही का...

 What can be found on the basis of Adhar | आधारवर काय मिळेल साहेब..?

आधारवर काय मिळेल साहेब..?

Next

देशातले, राज्यातले साहेबहो,
सप्रेम नमस्कार.
गेले काही दिवस फार परेशान झालोय. आधार कार्डाचा आधार वाटायचा सोडून भार वाटू लागलाय साहेब हो... आमच्या गावात सगळ्यांना आधार कार्ड आहे. काल आमच्या मावशीनं ते कार्ड रेशन दुकानदाराला दाखवलं. त्याच्यावर रेशन मिळेलं का म्हणून विचारलं. तर तो म्हणाला, पिवळं कार्ड आणा, हे नाय चालायचं... आता रेशनकार्ड पण सांभाळा, हे कार्ड पण सांभाळा म्हणजे जरा टेंशनचं काम नाही का...
गावातल्या साहेबांना विचारलं की आधारच्या ऐवजी चार दोन टॉयलेट बांधले असते तर बरं झालं असतं. त्या अक्षयकुमारचे पण सिनेमा बनवायचे पैसे वाचले असते. तर तो साहेब म्हणाला, त्यासाठी दुसरी योजना आहे. ती नंतर देऊ तुमच्या गावाला. आता ती योजना येईल तेव्हा येईल.
साहेब, तुमच्या त्या कार्डाबद्दल काही शंका आहेत. त्या कुणाला विचारायच्या, हे काही कळत नाही. तुम्हीच समजावून सांगितल्या तर बरं होईल. हे कार्ड मिळालं म्हणजे काय होणार. या कार्डाचा आम्हाला आधार होणार आहे की ज्यांनी हे कार्ड आम्हाला दिलं त्यांच्यासाठीचा हा आधार आहे... कारण कुणी तरी सांगत होतं की हे कार्ड निवडणुकीच्या टायमाला आमची माहिती विकायचं काम पण करणार आहे म्हणून... खरयं का साहेब हे...
माहिती विकता विकता आम्हालाच विकू नका म्हणजे मिळवली साहेब... आता याच कार्डावर निवडणुकीत मतदानपण करता येणार आहे म्हणे. मग त्या शेषन साहेबांनी करोडो रुपये खर्च करून जे इलेक्शन कार्ड दिलं त्याचं काय करायचं. ते पण सांभाळायचं का... आता शेषन कार्ड, रेशन कार्ड, स्मार्ट कार्ड अशी किती कार्ड सांभाळायची ते तरी सांगा. त्यात पुन्हा तुम्ही बँकेत १५ लाख जमा करणार म्हणाला होता म्हणून बँकेत खात उघडलं, तर बँकवाल्याने पण एक कार्ड दिलयं. आता या सगळ्या कार्डाची माळ करून गळ्यात घालायची सोय आहे का साहेब... या कार्डामुळे काय काय होणार याच्या घोषणा ऐकल्या.
काही प्रश्न आहेत साहेब, नियमानुसार होणाऱ्या कामासाठी आता ‘आधार’ पाहिला जाणार की टेबलाखालचाच आधार अजूनही मान्य केला जाणार..? पोलीस ठाण्यात हे कार्ड दाखवले तर पोलीस मला बसायला खुर्ची देणार का? सरकारी दवाखान्यात डॉक्टर मला चिठ्ठी लिहून न देता जवळची औषधं मोफत देतील का? गावात सध्या एकच एसटी येते, त्याऐवजी दिवसातून तीन चार तरी खेपा होतील का? गावातल्या शाळेचे पत्रे गळायला लागलेत त्याच्यासाठी याचा काही उपयोग होईल का? गावाच्या पारावर शिक्षण संपलेली, अर्धवट सुटलेली पोरं बसलेली असतात, काही जण टपºयांवर गुटख्याची पाकीटं खात बसतात, त्यांना या ‘आधार’चा काही आधार होईल का? या सारखे फार प्रश्न आम्हाला पडू लागले आहेत. त्याची उत्तरं शोधायची कुठे? की देता आधार की करू अंधार म्हणत फिरायचं... काय ते एकदाचं सांगून टाका. उगाच मनात संशय नको... आता तर म्हणे कोर्टानेच तुमच्या आधारला आधार दिला नाही म्हणे... मग आम्ही काय करायचं. काय ते लवकर सांगा साहेब, आम्ही त्या १५ लाखाची वाट पहातोय...
- अतुल कुलकर्णी

Web Title:  What can be found on the basis of Adhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.