-विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
सर्वप्रथम इराकमधील घडामोडींवर नजर टाकू...

बरोबर तीन वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेटच्या अबू बकर अल् बगदादी याने इराकच्या मोसुल या शहरातून स्वत:ला जगाचा खलिफा घोषित केले होते. त्याआधी त्याने इराक आणि सिरियामधील मोठा प्रदेश काबीज केला होता व त्यावेळी मोसुलमधून बगदादीला हुसकावून लावण्याची ताकदही इराकच्या सैन्यात शिल्लक राहिलेली नव्हती. आपल्या ताब्यात आलेल्या प्रदेशाचा बगदादीने जणू कत्तलखाना केला. इस्लामिक स्टेटच्या हत्याकांडांमध्ये नेमके किती निरपराध नागरिक मारले गेले याची नक्की आकडेवारी नाही. परंतु ही संख्या काही लाखांत असावी, असा अंदाज आहे. आता आढळून येत असलेल्या सामूहिक दफनस्थळांवरून त्यावेळच्या क्रौर्याची जगाला थोडीफार कल्पना येऊ लागली आहे.
बगदादीच्या नराधमांनी कित्येक हजार महिलांवर बलात्कार केले, त्यांची शरीरे विद्रुप केली. एकेकाळी युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन हा जगात नरराक्षस म्हणून ओळखला जाई. पण मला वाटते की आज इदी अमीन असता तर बगदादीचे क्रौर्य पाहून तोही खजिल झाला असता. गेल्या वर्षी इराकी सैन्य आणि कुर्द लढवय्यांनी अमेरिकी सैन्याच्या मदतीने इस्लामिक स्टेटविरुद्ध प्रतिहल्ला सुरू केला. सुमारे नऊ महिन्यांच्या घनघोर युद्धानंतर इराकी सैन्याने मोसुल शहर पुन्हा ताब्यात घेतले खरे, पण आज त्या शहरात काहीही शिल्लक राहिलेले नाही. मोसुल दाट लोकवस्तीचे शहर असल्याने या युद्धात अनेक नागरिक मारले गेले व लाखो विस्थापित झाले. भग्नावस्थेतील मोसुलवर आता इस्लामिक स्टेटऐवजी इराकचा झेंडा फडकतो आहे, पण हा आनंदोत्सव साजरा करायलाही तेथे कुणी नाही.
आता सिरियाकडे वळू....
सिरियामध्ये निकराचे गृहयुद्ध सुरू आहे. तेथे बशर अल असद यांचे सरकार सत्तेवर आहे. असद यांच्याविरुद्धच्या उठावाची सुरुवात सुमारे सहा वर्षांपूर्वी झाली. हळूहळू तो महाशक्तींच्या लढाईचा अड्डा झाला. अमेरिकेला असद यांना सत्तेवरून खाली खेचायचे आहे तर असद याची खुर्ची सलामत राहावी यासाठी रशिया त्यांच्या पाठीशी उभा आहे. या दोघांच्या संघर्षात सिरिया उजाड झाले आहे.
आंतरराष्ट्रीय संस्थांच्या आकडेवारीनुसार सिरियाच्या २ कोटी ३० लाख लोकसंख्येपैकी किमान १ कोटी १० लाख लोक सिरिया सोडून परागंदा झाले आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक नागरिक विविध युरोपीय देशांत निर्वासित म्हणून आश्रयाला गेले आहेत. सन २०१४ मध्येच सुमारे अडीच लाख निर्वासित युरोपला पोहोचले होते. त्यानंतर ही संख्या सतत वाढत गेली. समुद्रमार्गे युरोपला जाताना अनेकांना प्राणास मुकावे लागले. ज्यांनी लिबियामार्गे इटालीला जाण्याचा प्रयत्न केला ते लिबियातील दहशतवादी बंडखोर गटांच्या हाती लागले व गुलाम झाले. हंगेरीमार्गे आॅस्ट्रिया, स्वीडन आणि जर्मनीला जाऊ पाहणाऱ्यांचा रस्ता हंगेरीने रोखला. नाईलाजाने लोकांनी क्रोएशियामार्गे जाण्याचा प्रयत्न केला पण त्या मार्गावरील ६८० किमी क्षेत्रात १९९० च्या बाल्कन युद्धाच्या वेळी भूसुरुंग पेरलेले होते. या भूसुरुंगांच्या स्फोटांनी हजारो विस्थापितांचे प्राण गेले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार जगभरात ६.५ कोटी लोक निर्वासिताचे जीणे जगत आहेत. एक दशकापूर्वी हा आकडा तीन कोटी होता.
मला या मानवी संकटाच्या आणखी एका पैलूकडेही लक्ष वेधावेसे वाटते. युरोपमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने स्थलांतरित जात आहेत की काही देशांचे सांस्कृतिक व वांशिक चित्रच पार बदलून जाण्याचा धोका आहे. काही देश मुस्लिम बहुसंख्य होतील, अशी स्थिती आहे. शिवाय हे स्थलांतरित आल्यापासून युरोपमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. खास करून पर्यटकांच्या बॅगा लंपास करून पळून जाण्याचे प्रकार वरचे वर होऊ लागले आहेत. माझ्या अगदी जवळच्या काही लोकांना याचा फटका बसला आहे. बाहेर फिरताना आपल्या बॅगेकडे खास करून लक्ष ठेवा, असे तेथील मित्रांनी मलाही युरोप दौऱ्याच्या वेळी सावध केले होते. निर्वासितांकडे उजळ माथ्याने उपजीविका करण्याचे काही साधन नसल्याने ते अशा चोऱ्यामाऱ्या करीत आहेत.
या स्थलांतरितांचे जीवन सुसह्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने पुढाकार घेऊन सतत प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मध्य पूर्वेतील सध्याची परिस्थिती पाहता या निर्वासितांना नजिकच्या भविष्यात आपल्या मायदेशी कधी परतता येण्यासारखी स्थिती निर्माण होईल, असे दिसत नाही. या गृहकलहांची आणि युद्धांची सर्वाधिक झळ लहान मुलांना बसली आहे. सिरियाच्या अलेप्पो शहरात जन्मलेल्या आणि सध्या तुर्कस्तानमध्ये राहात असलेल्या बाना आलाबेद नावाच्या मुलीने या संकटग्रस्त मुलांची व्यथा आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवरून जगापुढे मांडली आहे. ते वाचून जगभरातील अनेकांची मने हेलावली, पण त्यामुळे अलेप्पीचा विध्वंस टळू शकला नाही. आलाबेदला ज्या ठिकाणी आसरा मिळाला आहे तेथे तिचे शिक्षण तरी सुरू आहे. पण ज्यांना शाळेचे तोंडही पाहायला मिळत नाही अशा मुलांच्या भवितव्याचा विचार करा. त्या मुलांसाठीही मनात कणव ठेवा ज्यांची युद्धात कुटुंबापासून ताटातूट झाली आहे व जी अनाथासारखी एखाद्या निर्वासित छावणीत राहात आहेत किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीने त्यांना दत्तक घेतले आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या इस्राएल भेटीचा मी मुद्दाम उल्लेख करेन. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात मातापित्याचे छत्र हरपलेल्या मोशे या लहान मुलाची मोदींनी तेथे मुद्दाम भेट घेतली. मोदींनी दाखविलेली ही सहृदयता उल्लेखनीय आहे, कारण हीच भारताची संस्कृती आहे. अशा प्रकारे मानवता जीवनाचा अविभाज्य भाग बनावा, एवढे भाग्य जगातील अनेक देशांचे नाही.
आफ्रिका खंडातील अनेक छोट्या देशांमध्येही अराजकाची स्थिती आहे. नाजयेरियात बोको हराम नावाच्या राक्षसी संघटनेने संपूर्ण देशाची घडी विस्कटून टाकली आहे. ‘बोको हराम’ याचा अर्थ होतो ‘बुक’ (पुस्तक) हराम म्हणजे निषिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी या बोको हरामने ३०० हून अधिक शालेय विद्यार्थिनींचे अपहरण करून त्यांना आपल्या दहशतवादी सदस्यांना ‘वाटून’ दिले!
जगभरात होत असलेल्या युद्धांनी सर्वांनाच होरपळून टाकले आहे. निरागस बालकांचे बालपण लुटले गेले आहे, तरुण पिढीचे आयुष्य नरकासमान झाले आहे आणि हे सर्व धर्माच्या नावाने होत आहे. विज्ञान, तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात मानवता लुप्त होत आहे. मला एका जुन्या गाण्याची आठवण येते...‘ देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान... कितना बदल गया इन्सान..’ युद्धाने फक्त विनाशच होतो, त्यातून कधीच काही चांगले हाती लागत नाही हे जगाने समजून घ्यायला हवे. युध्द आणि संघर्षाने केवळ दुश्मनी पसरते व रक्ताची चटक आणखी वाढते.
हे लिखाण संपविण्यापूर्वी......
जपानमध्ये ओकिनोशिमा नावाचे एक बेट आहे. तेथे समुद्रदेवीचे मंदिर आहे, पण आश्चर्य म्हणजे तेथे स्त्रियांना पूर्ण प्रवेशबंदी आहे. म्हणजे असे बुरसटलेले विचार फक्त आपल्याकडेच नाहीत. जपानसारख्या प्रगत व वैज्ञानिकदृष्ट्या पुढारलेल्या देशातही असे विचार प्रचलित आहेत. मंदिर देवीचे आहे तर मग तेथे महिलांच्या जाण्याने काय बिघडते, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. परंतु श्रद्धेच्या बाजारात अशा विज्ञाननिष्ठ प्रश्नांना जागा नसते हेच खरे!