गाव कारभारी दिल्लीकर !

By सचिन जवळकोटे | Published: May 3, 2018 05:05 AM2018-05-03T05:05:14+5:302018-05-03T05:06:18+5:30

‘आमच्या उमेदवाराचा निर्णय दिल्लीत ठरतो,’ हे गुपित थोरले काका बारामतीकरांनी ओपन करताच इरसालवाडीचा गण्या चपापला. गण्या तसा अत्यंत घड्याळप्रिय.

Villagers steward Delhi! | गाव कारभारी दिल्लीकर !

गाव कारभारी दिल्लीकर !

Next

‘आमच्या उमेदवाराचा निर्णय दिल्लीत ठरतो,’ हे गुपित थोरले काका बारामतीकरांनी ओपन करताच इरसालवाडीचा गण्या चपापला. गण्या तसा अत्यंत घड्याळप्रिय. पक्का एकनिष्ठ कार्यकर्ता. मात्र त्याच्यासाठी पार्टीची ओळख फक्त गल्लीपुरतीच. त्यामुळं त्यानं गावच्या सरपंचाला पकडलं, ‘दादाऽऽ... आपली पार्टी दिल्लीमंदी कवापास्नं शिरली?’ या प्रश्नावर सरपंचही दचकला. वॉर्डातल्या गटारांची घाण विसरून डोकं खाजवू लागला, ‘काय की बाऽऽ.. सोसैटी चेरमनलाच म्हैती,’ हे ऐकून गण्या गावच्या सोसायटीत गेला. ‘नवं-जुनं’ करून शंभर टक्के कर्जवसुलीचा शेरा व्यवस्थितपणे रजिस्टरला मारल्यामुळं चेअरमनही खुशीत होता. ‘आपल्या पार्टीचं मेन हापिस दिल्लीमंदी कुठंशी हाय चेरमन सायबऽऽ?’ या प्रश्नावर त्यानंही आ वासला. ‘सातबारा, बोजा अन् बँक डायरेक्टर सांगतील तिथंच शिक्का’ एवढंच जग माहीत असणाऱ्या या गाव पुढाºयानं दूध केंद्राकडं बोट केलं. गण्या तिकडं गेला. ‘दुधात फॅट अन् गोणीत मिक्स पावडर’ याचा मेळ घालणाºया दूध मॅनेजरलाही दिल्लीच्या गूढ प्रश्नानं गोंधळून टाकलं. गेल्या आठवड्यात कमाविलेल्या मार्जिनचा आकडाही त्याच्या डोक्यातून गेला. ‘लेकाऽऽ अगुदर आपल्या गल्लीचा ईचार कर. गल्लीमदला कार्यकर्ता इस्ट्रॉँग जाला तरच पार्टी मजबूत हुतीया, आसं आपलं मोठं सायब सांगत्याती.’ गायी-म्हशीचं कार्ड खिशात टाकून मॅनेजर बुलेटवरून दिमाखात निघून गेला.
... गण्यानं थेट पंचायत समिती गाठली. सभापतीलाही तोच दिल्लीचा प्रश्न विचारला, ‘भाऊऽऽ आपली पार्टी दिल्लीत काय करतीया?’ मतदारसंघातल्या ग्रामपंचायत इलेक्शनच्या खर्चाची गोळाबेरीज करणारा सभापतीही दचकला. डोक्यावरची तिरकी टोपी सरळ करत त्यानं गण्याकडं खालून वर बघितलं, ‘का रं गड्याऽऽ आता तुला खासदारकीचं सपान पडू लागलं हाय की काय?’ गण्यानं मग झेडपी मेंबर गाठला. ‘गावोगावच्या श्रमदानात आपण पुढं-पुढं केलं तर किती मतांचा गठ्ठा वाढेल?’ या विचारात दंग असणाºया मेंबरनंही गण्याला आमदाराकडं पिटाळून लावलं. आमदारांच्या बंगल्यात हूं म्हणून गर्दी. पोरांच्या शिक्षणासाठी फॅमिली पुण्याला शिफ्ट केल्यापासून ते आठवड्यातून दोनच दिवस मतदारसंघात. गण्यानं विचारलं, ‘आपल्या पार्टीचं तिकीट कुठंशी फिक्स हुतं?’ हे ऐकून आमदारांनी आश्चर्यानं विचारलं, ‘एवढी वर्षे कार्यकर्ता आहेस तू... अन् एवढंही माहीत नाही का तुला? केडर बेस असलेल्या आपल्या पार्टीचा प्रत्येक निर्णय बारामतीच्या बंगल्यातच. ध्येय-धोरणंही बारामतीतच.’ आता मात्र गण्या पुरता भंजाळला. ‘आपल्या पार्टीला धेय धोरनंंबी असत्याती की काय? मला वाटलं... गावातला जो गबरगंड, त्योच पार्टीचा नेता. जो निवडून येतुया, त्योच आपला उमेदवार. येवढीच आपली पॉलिशी असतीया,’ असंच काहीतरी पुटपुटत तो बाहेर आला. किमान खासदारांकडे तरी माहिती मिळेल म्हणून त्यानं मोबाईल लावला... परंतु ‘नॉट इन कव्हरेज’चाच मेसेज. आता गण्याला कुठं माहीत होतं की पार्टीचे ईन-मीन चार खासदार. त्यापैकी तिघांचा एक पाय घड्याळाच्या मळ्यात... तर दुसरा पाय कमळाच्या तळ्यात!
- सचिन जवळकोटे

 (sachin.javalkote@lokmat.com)

Web Title: Villagers steward Delhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.