Vidhbha Yashwant Sinha | विदर्भात यशवंत सिन्हा

अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व अर्थ अशी दोन महत्त्वाची खाती भूषविलेले भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा हे शेतक-यांच्या मागण्यांसाठी विदर्भातील अकोला येथे जिल्हाधिका-यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतात हीच मुळात एक राष्ट्रीय महत्त्वाची बातमी आहे. शेतकºयांचे प्रश्न सनातन आहेत. ते सोडविण्याचे प्रयत्न देश स्वतंत्र झाल्यापासून सुरू आहेत आणि आणखी पुढची काही दशके ते तसेच चालणार आहेत. त्यांच्या आंदोलनाची सूत्रेही शरद जोशींपासून उत्तरेच्या महेंद्रसिंग टिकैतपर्यंत अनेकांनी अलीकडे हाताळली. त्याआधी सरदार पटेलांनी बारडोलीसह साºया गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाचा डोंब उसळविला. आताच्या अकोला आंदोलनाचे वैशिष्ट्य, ते ज्या सरकारविरुद्ध उभे आहे त्याच सरकारात ज्येष्ठ मंत्रिपद भूषविलेल्या सिन्हा यांचे नेतृत्व हे आहे. सिन्हा यांचे आंदोलन कुणा चिल्लर मंत्र्याने उत्तर देऊन थांबवावे असे नाही. सिन्हा हे एकेकाळी बिहारच्या प्रशासनाचे मुख्य सचिवही राहिले आहेत. त्यामुळे राजकारण, अर्थकारण व प्रशासन या साºयाच क्षेत्रांचे ते सर्वज्ञ आहेत. शिवाय ज्येष्ठत्वामुळे त्यांच्या शब्दाला देशात वजनही आहे. गेले काही दिवस ते, अरुण शौरी व राम जेठमलानी या जुन्या मंत्र्यांसोबत मोदी सरकारवर टीका करीत आहेत. त्यांनी जेटलींना हाकला, अशी सरळ मागणीच केली आहे. मोदी हे कुणाचे ऐकून घेणारे पुढारी नाहीत. त्यातून नोटाबंदीच्या त्यांच्या फसलेल्या प्रयोगावर त्यांना साथ देण्याचे थोडेसे बळ एकट्या जेटलींनीच काय ते दाखविले आहे. आज यातली महत्त्वाची बाब बिहारच्या सिन्हांनी विदर्भातील शेतकºयांसाठी आंदोलन करणे ही आहे. येथे शेतकºयांच्या संघटना आहेत. त्यांचे नेते आणि आंदोलनेही आहेत. तरीही सिन्हांसारख्या दूरच्या नेत्याला या आंदोलनाची धग कायम ठेवण्याच्या जिद्दीने येथे आणणे ही महत्त्वाची बाब आहे. विदर्भातील शेतकºयांनी आजवर फार मोठ्या संख्येने आत्महत्या केल्या आहेत. यवतमाळ, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यात या आत्महत्यांची संख्या हजारोंच्या घरात जाणारी आहे. पूर्वी एकदा पी. साईनाथ या पत्रकाराने महाराष्ट्र ही शेतकºयांची स्मशानभूमी आहे, असे म्हटले होते. खरेतर ही स्मशानभूमी विदर्भ ही आहे. इथला कापूस मौल्यवान आहे, संत्री विख्यात आहेत, ज्वारी, गहू व तांदूळ ही पिके मुबलक होणारी आहेत. तरीही त्या साºयांनी इथल्या शेतकºयांना कधी श्रीमंत होऊ दिले नाही आणि त्यांना मदतीचा हात द्यावा असे पुढाºयांनाही कधी मनातून वाटले नाही. त्यामुळे आत्महत्या आहेत, नापिकी आहे, सिंचन नाही आणि दारिद्र्य पाचवीला पुजलेले आहे. यशवंत सिन्हांसारख्या समंजस माणसाला त्यामुळे या प्रदेशाने खुणावले असेल तर ती बाब त्यांचे मन व या प्रश्नाचे विक्राळ स्वरुप या दोन्ही बाबी लक्षात घ्याव्यात अशी आहे. सिन्हा हे भाजपाचे नावडते पुढारी आहेत. त्यांच्या वजनाचा फायदा घ्यायला पक्षाने त्यांच्या मुलाला केंद्रात राज्यमंत्रिपद देऊन त्यांच्याविरोधात बोलायला लावण्याचा एक कुटील प्रकार मध्यंतरी केला. आता जेटली त्यांच्यावर उखडले आहेत. त्यांनी सिन्हांना राजकीय बेकार म्हणून ‘ते नोकरीच्या शोधात आहेत’ असे म्हटले आहे. तशीही जेटलींची जीभ चळली आहे. राहुल गांधींचा उल्लेख त्यांनी ‘क्लोन्ड हिंदू’ असा अत्यंत हीन पातळीवरून अलीकडेच केला आहे. देशाच्या आजवरच्या एकाही अर्थमंत्र्याने आपल्याच पदावर कधीकाळी राहिलेल्या माणसाविषयी असे असभ्य उद््गार काढल्याचे दिसले नाही. एक वयोवृद्ध राष्ट्रीय नेता विदर्भातील शेतकºयांसाठी लढायला तेथे ठाण मांडून बसतो ही बाब सामान्य नाही. विदर्भातील सर्वपक्षीय पुढाºयांनाही ती बरेच काही शिकविणारी आहे. हे पुढारी थकले असतील असे म्हणावे तर त्यांनी या क्षेत्रात फारसा व्यायाम केल्याचेही कधी दिसले नाही. दूरच्या नेत्यांना जी स्थानिक दु:खे दिसतात ते येथील पुढाºयांना दिसत नसतील तर त्यांचाही परामर्श जरा वेगळाच घेणे गरजेचे आहे. यशवंत सिन्हा यांना सक्रिय पाठिंबा देणे जमत नसले तर त्यांच्या भावनांविषयी किमान सहमती दाखवणे या पुढाºयांना अवघड नाही. तसे न करणे हा शुद्ध करंटेपणा आहे.


Web Title: Vidhbha Yashwant Sinha
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.