हा विजय चमत्कार निश्चित नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:16 PM2019-05-24T13:16:38+5:302019-05-24T13:23:38+5:30

भाजप पुन्हा सत्तारुढ होण्याचे संकेत मिळाले आणि निकालानंतर शिक्कामोर्तब झाले

This victory is not sure about the miracle! | हा विजय चमत्कार निश्चित नाही!

हा विजय चमत्कार निश्चित नाही!

Next

मिलिंद कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आटोपला. दीड-दोन महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप, टीका असा सगळा धुराळा सुरु होता. एक्झीट पोल जाहीर झाल्यानंतर मोदी आणि भाजप पुन्हा सत्तारुढ होण्याचे संकेत मिळाले आणि निकालानंतर शिक्कामोर्तब झाले. भल्या भल्यांचे अंदाज चुकले. राजकीय पंडितांना भारतीय मानसिकतेचे अचूक आकलन करता आले नाही. निवडणूक आयोग, सक्तवसुली संचलनालय, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा सत्ताधारी भाजपने दुरुपयोग केल्याचा आरोप झाला. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी-शहा या जोडीने टीकेकडे कधी दुर्लक्ष केले तर कधी त्याचे भांडवल केले. यासोबतच सूत्रबध्द नियोजन करुन राज्यनिहाय, मतदानाच्या टप्पेनिहाय रणनीती आखत भाजपला यश मिळवून दिले. मोदी आणि भाजप केंद्रस्थानी राहतील, अशीच व्यूहरचना आखली आणि विरोधक आपसूक जाळ्यात अडकले. प्रचार आणि प्रसिध्दीमध्ये मोदी आणि भाजप प्रभावशाली राहिले. पत्रकार परिषदेतील मौन, बद्रिनाथ-केदारनाथचे दर्शन, हिमालयाच्या गुहेतील ध्यानधारणा, कलकत्यातील प्रचारसभा, वाराणसीतील रोड शो अशा प्रत्येक प्रसंगातून मोदी राष्टÑीय प्रसारमाध्यमांचे केंद्रबिंदू राहिले. मग ती प्रसिध्दी सकारात्मक असो की, नकारात्मक. त्याचा फायदा भाजपला निश्चित झाला.
२०१४ मध्ये लाट होती, आता तर त्सुनामी आली असा सूर आता माध्यमांमध्ये उमटत आहे. पण हा चमत्कार निश्चित नाही, हे लक्षात घ्यायला आहे. रा.स्व.संघ आणि भाजपने प्रयत्नपूर्वक केलेल्या कार्याची ही पावती आहे. संघटनात्मक कार्य, विचारधारा, धाडसी निर्णय, सर्वसमावेशकता या गुणांमुळे दोन जागांवरुन ३०३ हा पल्ला भाजपने गाठला आहे.
देशाचे जाऊ द्या, आपण खान्देशचे उदाहरण घेऊ. जळगाव जिल्हा हा गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्यापासून तर उन्मेष पाटील यांच्यापर्यंत भाजपने अनेकदा प्रयोग केले आणि ते यशस्वी झाले. भाकरी फिरवत राहिल्याने यशाचे सातत्य कायम राहिले. एकनाथराव खडसे, गिरीश महाजन यांनी नेतृत्व केले आणि पक्षाला यश मिळवून दिले. जळगाव मतदारसंघातील उमेदवारी नाट्याची चर्चा झाली. परंतु, महाजन यांनी आपत्ती व्यवस्थापन इतक्या उत्कृष्टपणे केले की, उन्मेष पाटील यांनी ए.टी.पाटील यांचा मताधिक्याचा विक्रम मोडीत काढला.
नंदुरबारात डॉ.हीना गावीत यांच्यारुपाने भाजपचा खासदार गेल्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आला. काँग्रेसने भाकरी फिरवली, भाजपमध्ये बंडखोरी झाली, या परिस्थितीतही डॉ.गावीत या दुसऱ्यांदा निवडून आल्या.
धुळ्यात उत्तमराव पाटील हे जनसंघातर्फे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. रामदास गावीत, प्रतापराव सोनवणे हे त्यानंतर खासदार झाले. डॉ.सुभाष भामरे यांच्यापुढे आव्हाने होतीच. स्वपक्षीय आमदार अनिल गोटे यांचे बंड आणि रोजचा टीकेचा भडीमार, मालेगावातील सामाजिक गणित या आव्हानांवर मात करीत भामरेंनी चांगला विजय मिळविला.
विपरीत परिस्थितीतून मार्ग काढण्याचे तंत्र आता भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांना अवगत झाले आहे. इतर पक्षांमधील सक्षम उमेदवारांना तिकीटे देऊन निवडून आणणे, युतीतील घटक पक्षांची मदत घेण्यासोबतच प्रतिस्पर्धी पक्षांमधील नाराज, असंतुष्ट मंडळी, गटांची मदत ‘अदृश्य’रुपाने घेणे हे भाजप लीलया करु लागला आहे. शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपण्यापूर्वी दिल्लीतील भाजप मुख्यालयात राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या संघटनात्मक कार्याची माहिती दिली, तो खरा भाजपचा आत्मा आहे. सत्तेचा उपयोग हा पक्ष, संघटना विस्तारासाठी करण्यात भाजप अग्रेसर आहे. त्यामुळे नित्यनवीन यशोशिखर हा पक्ष गाठत आहे. व्यक्तीपेक्षा पक्ष, संघटना महत्त्वाची या संघविचाराची दिशा जाणून घेत या पक्षाची वाटचाल सुरु असल्याने विक्रमांची नोंद या पक्षाच्या नावावर होत आहे. हा निश्चितच चमत्कार नाही. हे तपाचे फळ आहे.

Web Title: This victory is not sure about the miracle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.