वाट्टेल ते बोलणारे नेते वाचाळवीर की वाचस्पती?

By संदीप प्रधान | Published: April 17, 2019 07:00 PM2019-04-17T19:00:21+5:302019-04-17T19:27:53+5:30

राजकारणात प्रसिद्धी, पैसा काही मंडळींच्या डोक्यात जाते. असे हे नेते अनेकदा समोरच्या व्यक्तींना गृहीत धरून बेलगाम बोलून मोकळे होतात.

Vatelvar leaders who tell the reader? mayavati and yogi adityanath speech | वाट्टेल ते बोलणारे नेते वाचाळवीर की वाचस्पती?

वाट्टेल ते बोलणारे नेते वाचाळवीर की वाचस्पती?

Next

संदीप प्रधान

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री मायावती, सपचे नेते आझम खान अशा काही नेत्यांवर निवडणूक आयोगाने प्रक्षोभक, बेताल वक्तव्य केल्याबद्दल कारवाई केली. राजकारणात अनेक नेते अनेकदा बेताल, बेजबाबदार वक्तव्ये करतात. त्यामुळे काहींवर कायदेशीर कारवाईची आफत येते, तर काही माफी मागून मोकळे होतात. काही वारंवार बेताल वक्तव्ये करून चर्चेत राहतात. काही नेत्यांकडून कळत-नकळत बोलताना चूक होते, तर काही नेते हे हेतुत: अशी विधाने करतात.

राजकारणात प्रसिद्धी, पैसा काही मंडळींच्या डोक्यात जाते. असे हे नेते अनेकदा समोरच्या व्यक्तींना गृहीत धरून बेलगाम बोलून मोकळे होतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे राम कदम यांनी दहीहंडीच्या व्यासपीठावरून मुली पळवून आणून आपल्या कार्यकर्त्यांना देण्याचे वक्तव्य केलेले आहे. काहीवेळा पक्षातील काही मंडळींवर अडचणीच्या काळात वादग्रस्त मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याकरिता बेलगाम वक्तव्य करण्याची जबाबदारी सोपवली जाते. ही मंडळी आपल्या वक्तव्याने वाद निर्माण करतात आणि त्यामध्ये मूळ मुद्दा बाजूला पडतो. काँग्रेसमधील दिग्विजय सिंग, संजय राऊत, संबित पात्रा वगैरे नेते मंडळी ही जबाबदारी अनेकदा चोखपणे पार पाडतात. जेव्हा केवळ वृत्तपत्रे हेच माध्यम उपलब्ध होते, तेव्हा काही नेते वादग्रस्त वक्तव्य करायचे व त्यानंतर आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला किंवा विपर्यास केला गेला, असा बचाव करण्याची संधी त्यांना उपलब्ध असायची.

अर्थात, एकाचवेळी १० ते १२ पत्रकारांनी चुकीचे ऐकले असेल, हे संभव नसले तरी बचावाची संधी होती. मात्र, असा बचाव गो.रा. खैरनार यांच्यापासून शरद पवार यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी अनेकदा करून डझनभर पत्रकारांना खोटे पाडले आहे. जेव्हापासून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रभाव वाढला, तेव्हापासून मी हे असे बोललोच नाही किंवा माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे बोलायची सोय उरली नाही. काँग्रेसचे नेते नटवर सिंग हे जेव्हा वादात अडकले, तेव्हा त्यांनी सलग सात दिवसांत आपली विधाने कशीकशी बदलली, हे सात वेगवेगळ्या चौकटींत अनेक वाहिन्यांनी दाखवून नटवर सिंग यांच्यासारख्या मुत्सद्दी राजकीय नेत्याची कोंडी केली होती. अनेक राजकीय नेते जे आज साठी किंवा त्या पलीकडचे आहेत, त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाची ही ताकद उमजलेली नाही. ते आजही जुने बचावाचे पवित्रे घेतात आणि फसतात. आपण जे बोललो, त्यामधील मागचेपुढचे संदर्भ कापून आपला व्हिडीओ चालवला गेला, असा बचाव काही प्रकरणांत नेते करतात. अर्थात, तो पूर्णपणे दुर्लक्षित करण्यासारखा नाही. मात्र, एखाद्या नेत्याबाबत वारंवार हेच घडू लागले, तर मग संशयाला जागा उरते. वारंवार असा बचाव करणाऱ्या नेत्यांची यादी बरीच मोठी आहे. किंबहुना, माझ्या राजकीय विरोधकांनी माझ्या वक्तव्याचा व्हिडीओ मोडूनतोडून दाखवला, हा इलेक्ट्रॉनिक मीडियाबाबत सर्रास घेतला जाणारा बचावात्मक पवित्रा आहे.

सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यापासून प्रसिद्धीचे सर्व नियम बदलले आहेत. पूर्वी प्रसिद्धीस पावणे म्हणजे सकारात्मक प्रसिद्ध होणे, असा अर्थ होता. मात्र, सोशल मीडियावर नकारात्मक प्रसिद्धीदेखील लाभदायक असते. आलिया भट हिने एका टीव्ही शोमध्ये खुळ्यासारखी उत्तरे दिल्यानंतर तिच्या नावाने खुळचट विनोदांचे पेव फुटले होते. मात्र, या विनोदांमुळे आलियाचे नुकसान झाले नाही. उलटपक्षी, तिचा टीआरपी वाढला. आलियासारख्या अभिनयाची उत्तम जाण असलेल्या अभिनेत्रीला या मार्गाचा अवलंब का करावा लागला, ते कोडेच आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर सकारात्मक लेखनाची पोस्ट टाकली, तर ती वाचणारे मोजके असतात. मात्र, समजा एखाद्याने राज्यकर्त्यांवर तोंडसुख घेणारी, एखाद्या चित्रपटावर झोड उठवणारी किंवा एखाद्या उद्योगपतीचे वस्त्रहरण करणारी पोस्ट टाकली असेल, तर त्याला अल्पावधीत हजारो लाइक्स व शेकडो कॉमेंट्सचा पाऊस पडून मोठ्ठा प्रतिसाद लाभतो. नियमित अशा आक्रमक पोस्ट टाकणाऱ्यांना फॅन फॉलोइंग प्राप्त होते. समजा, एखाद्या नेत्याला झोडून काढणारी पोस्ट त्या व्यक्तीने टाकली असेल, तर त्यावर विरोधी प्रतिक्रिया टाकणाऱ्याला ट्रोल केले जाते. कारण, विशिष्ट विचारसरणीच्या आक्रमक शैलीत भाष्य करणाऱ्या मंडळींचा कंपू तयार होतो. रेल्वेच्या डब्यात पाकीटमार सापडल्यावर त्याच्यावर जसा लोक हात साफ करतात, तसाच हात साफ करण्याची संधी सोशल मीडियावरील ही नवी कंपूशाही सोडत नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियावर अशा काही वाचाळवीरांना जबरदस्त फॅन फॉलोइंग लाभते. लाखो रुपये खर्च करून त्यांनी जाहिरात दिली किंवा अनेक ग्रंथ वाचून अभ्यासपूर्ण लेख लिहिला, तरी जेवढी प्रसिद्धी मिळणार नाही, त्याच्या कितीतरी पट अधिक प्रसिद्धी त्यांना मिळते. सोशल मीडियावर असे ब्लॉग लिहिणाऱ्यांना किंवा व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांना लाभणारे फॅन फॉलोइंग पाहून यू-ट्युब, फेसबुक व तत्सम कंपन्या त्यांना पैसे देतात.

समाजात बेरोजगारी, दारिद्रय, कामाच्या ठिकाणी असलेला ताण, आरोग्याच्या गंभीर समस्या यामुळे मोठ्या प्रमाणावर नैराश्य आहे. अनेक तरुणांना सहनशक्तीच्या अभावी स्ट्रेस येतो. अशावेळी कुणी व्यवस्थेतील सर्वोच्च पदावरील व्यक्तीवर दुगाण्या झाडत असेल किंवा आघाडीच्या अभिनेत्याला किंवा उद्योगपतीला बेलगाम भाषेत बोल सुनावत असेल, तर ते भावणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले हे अशा वादग्रस्त वक्तव्यांकरिता प्रसिद्ध असलेले, पण मीडिया, सोशल मीडियात टीआरपी असलेले अव्वल नाव. त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाइलमुळे ते इतके प्रसिद्धीस पावले आहेत की, अलीकडे एका जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही उदयनराजे यांच्यासारखी कॉलर उडवून टाळ्या घेण्याचा मोह आवरला नाही. हाच मोह पवार यांना यापूर्वी निवडणुकीत दोन वेळा मतदान करा, असे भाषण करायला लावून गेला. त्यामुळे समाजातील एका वर्गाकरिता वाचाळवीर असलेली व्यक्ती काही विशिष्ट समानशीलाच्या व्यक्तीकरिता वाचस्पती असू शकते.

Web Title: Vatelvar leaders who tell the reader? mayavati and yogi adityanath speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.