(अ) सत्याचे प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:12 AM2018-03-06T00:12:08+5:302018-03-06T00:12:08+5:30

पुण्यात राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी सत्याच्या प्रयोगात महात्मा गांधींनाही मागे टाकले, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांना या ‘सत्याच्या प्रयोगा’विषयी भलतीच उत्सुकता लागून राहिली. हे प्रयोग आहेत तरी, काय? या उत्सुकतेपोटी...

 (A) the use of truth! | (अ) सत्याचे प्रयोग!

(अ) सत्याचे प्रयोग!

Next

- - नंदकिशोर पाटील
पुण्यात राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी सत्याच्या प्रयोगात महात्मा गांधींनाही मागे टाकले, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांना या ‘सत्याच्या प्रयोगा’विषयी भलतीच उत्सुकता लागून राहिली. हे प्रयोग आहेत तरी, काय? या उत्सुकतेपोटी त्यांनी पुस्तक मागवून घेतले. गांधीजींच्या आत्मकथनातून प्रेरणा घेत त्यांनीही मग आत्मकथन लिखाणाचा घाट घातला. आपणही आपल्या आयुष्यातील काही ‘प्रयोग’ शब्दबद्ध केले तर आपलाही नावलौकिक होईल, ही त्यामागची भावना. आत्मचरित्राशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही, म्हणून या मंडळींनी चांगली ऐसपैस ‘बैठक’ मारली. पण गरिबीतील दिवस, शाळेतील हुशारी, घराण्याचा वारसा, सामाजिक कार्याचे बाळकडू इत्यादी मजकुराने प्रस्तावनेची आठ-दहा पाने खरडल्यानंतर मूळ विषयावर घोडे अडले. सुरुवात नेमकी कुठून करावी? हे काही त्यांना सूचेना. ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही!’ अशा एखाद्या दमदार ‘लोकमान्य’ वाक्याने आत्मकथनाची सुरुवात झाली पाहिजे, या आग्रहामुळे आत्मकथन प्रस्तावनेच्या पुढे काही सरकेना. अनेकदा खाडाखोड, डोकेफोड केल्यानंतर ‘मंत्रिपदाची शपथ घेताना मला माझे जुने दिवस आठवले...’ अशी सुरुवात एका महोदयांनी केली. पण जुने दिवस म्हणजे नेमके कोणते? आपला भूतकाळ तर राडेबाजी, खंडणीखोरी, दलाली, फसवाफसवी आणि दंगेखोरी अशा अजामीनपात्र घडामोडींनी भरलेला! आज आपण पदावर आहोत म्हणून हा ‘इतिहास’ लोकांच्या विसराळी पडला म्हणून काय झाले? उद्या आपले हे आत्मकथन वाचून कोणी खोलात शिरले तर उगीच पंचाईत व्हायला नको म्हणून त्यांनी त्या वाक्यावर फुली मारली आणि गदिमांच्या गीतातील ‘बंदीवान आहे जगती...’ या भुतकाळाशी साजेशा ओळीने सुरुवात करून टाकली!
एका शिक्षणमहर्र्षींनी तर ‘शाळेची घंटा वाजायला उशीर, सर्वांत अगोदर मी वर्गात हजर असे!’ अशी सुरुवात केली. ते वाचून त्यांच्या सौभाग्यवतींना हसू आवरेना. बंटीचे बाबा फेकाफेकीत मास्टर आहेत, हे ठाऊक होते. पण या वाक्यावर तर त्यांना ज्ञानपीठच मिळायला हवे. कारण, यांनीच तर शाळेची घंटा चोरून लोहाराला विकली होती अन् त्या पैशातून आम्ही दोघांनी चोरून सिनेमा पाहिला होता! नमनालाच पत्नीकडून असा अपशकुन झाल्यामुळे त्यांनी ते वाक्य बदलून ‘शिक्षणाने माणूस मोठा होतो’ अशी सुरुवात केली. पण ‘बाबा तुमची डिग्री बोगस आहे’, अशी बंटीनं आठवण करून देताच त्यांनी तेही वाक्य खोडले अन् ‘शहाणपणासाठी शिक्षणाची गरज नाही!’ अशी वास्तवदर्शी सुरुवात करून पत्नी अन् मुलगा दोघांचीही दाद मिळवली!
सावकारीच्या पैशातून दुस-यांचा सातबारा स्वत:च्या नावे केलेल्या समाजसेवी नेत्याने लिहिले, ‘...अखेर वडिलोपार्जित पडिक जमिनीला कष्टाची फळं लागली!’
तर अतिक्रमणं आणि अवैध बांधकामात नावलौकिक मिळविलेल्या रिअल इस्टेटीच्या धंद्यातील एका दातृत्ववान नेत्याने आपल्या आत्मकथनाला नाव दिले, ‘कष्टाचे इमले!’
(ता.क. लवकरच या आत्मकथांचा अभ्यासक्रमात समावेश होणार आहे म्हणे!)

Web Title:  (A) the use of truth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.