काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शेकाप व समाजवादी पार्टी या प्रमुख विरोधी पक्षांनी काढलेली दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी संघर्ष यात्रा खान्देशात दोन दिवस मुक्कामी होती. $^४६ अंश सेल्सिअस तपमानात निघालेल्या यात्रेला प्रतिसाद जेमतेम मिळाला. या यात्रेची सरकार किती दखल घेते आणि कर्जमाफीचा निर्णय घेते किंवा नाही, हा प्रश्न कायम असला तरी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेसमध्ये निर्माण झालेला दुरावा काही प्रमाणात दूर झाला, हे यात्रेचे फलित म्हणायला हवे.
यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने जळगाव जिल्ह्यातील सर्व १५०१ गावांची पैसेवारी ५० च्यावर राहिली. मात्र धुळे जिल्ह्यात ६७६ पैकी ३६६, तर नंदुरबार जिल्ह्यात ९५१ गावांपैकी १५० गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. वाढलेला उत्पादन खर्च, शेतमालाला न मिळणारा हमीभाव, कर्ज थकबाकी यामुळे शेती आतबट्ट्याची होऊ लागली आहे. गेल्या १५ महिन्यात २९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नंदुरबारात आत्महत्येचे प्रमाण अत्यल्प होते. तेथेही ११ शेतकऱ्यांनी गळफास घेतला आहे.
ही पार्श्वभूमी असल्याने शेतकरी संघर्ष यात्रेला प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा होती. परंतु वास्तविकता वेगळी आहे. जिल्हा बँक, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या यावर अजूनही कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा अ‍ॅस्टेरिया हा खाजगी साखर कारखाना नंदुरबार जिल्ह्यात आहे. या संस्थांनी शेतकरी हिताचे किती निर्णय घेतले, हा प्रश्न शेतकऱ्यांचा मनात आल्याशिवाय राहिला नाही. राज्यस्तरीय नेत्यांसोबत स्थानिक नेते व्यासपीठावर होते, परंतु हे स्थानिक नेते अनेक वर्षे सत्तेत असताना शेतकरी हिताचे निर्णय का झाले नाही. सहकारी साखर कारखाने का बंद झाले किंवा विकले गेले, असे प्रश्न उपस्थित होतात. जलयुक्त शिवार योजनेमुळे मोठ्या प्रकल्पांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा संघर्ष यात्रेत मांडण्यात आला. त्यात तथ्य असावे. परंतु प्रकाशा, सारंगखेडा बंधारे बांधूनही १५ वर्षांनंतरही त्याचे पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचू शकले नाही, ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल. याची जबाबदारी कुणी घ्यायची, असा प्रश्न उपस्थित होतो. आता दोन्ही काँग्रेस विरोधी पक्षात असल्याने सरकारला हजार प्रश्न विचारत आहेत; पण अनेक प्रश्न आघाडी सरकारच्या काळाशी निगडित आहेत, हे नेते विसरत असले तरी जनता विसरत नाही. हे यात्रेला मिळालेल्या जेमतेम प्रतिसादावरून लक्षात येते.
मुळात यात्रेची वेळदेखील चुकली. खान्देशात ४२ ते ४६ अंश सेल्सिअस सरासरी तपमान या आठवड्यात राहिले. लग्नसराई, उन्हाळी सुट्या, उन्हाळी व रब्बी हंगामाची तयारी, पाणीटंचाई अशा गोष्टींमध्ये व्यग्र असलेला शेतकरी यात्रेसाठी येईल कसा? अर्थात उन्हाचा धसका नेते व आमदारांनीही घेतला. जळगाव आणि नंदुरबारात अशोक चव्हाण आले नाहीत तर नंदुरबारकडे अजित पवार यांनी पाठ फिरविली. मार्गावरील गावांमध्ये कार्यकर्त्यांनी वाहने अडवून कॉर्नर सभांचे आयोजन केले असता वातानुकूलित गाडीतून उतरण्यास अनेकांनी अनिच्छा दर्शवली. अबू आझमी, जितेंद्र आव्हाड यांनी जबाबदारी पेलली. दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महाविद्यालय, सूतगिरणीच्या आवारात यात्रेकरुंसाठी भोजनावळी घातल्या तर शासकीय विश्रामगृह, हॉटेलांमध्ये नेते आणि आमदारांची निवासव्यवस्था होती. वातानुकूलित वाहनांचा ताफा पाहण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक उत्सुकतेने जमत होते.
शेतकरी संघर्ष यात्रेत दोन्ही काँग्रेसचे शक्तिप्रदर्शनदेखील झाले. जळगावच्या जिल्हा परिषदेची निवडणूक दोन्ही कॉँग्रेसने एकत्रित लढविली. परंतु अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व म्हणजे चौघांनी पाठिंबा देऊन तर राष्ट्रवादीच्या तिघांनी अनुपस्थित राहून भाजपाला मदत केली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आले होते. आता यापुढे काँग्रेसची आघाडी नाही, सेनेशी जुळवून घेऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांनी केली होती. मात्र संघर्ष यात्रेच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेस पुन्हा एकत्र आले हे चांगले झाले. शतप्रतिशत भाजपाच्या वातावरणात विरोधी पक्ष एकत्र असणे आवश्यक आहे.
- मिलिंद कुलकर्णी