Understand that the wise men should take it | कारस्थानी प्रज्ञावंतांनी घ्यावा असा बोध

काही प्रज्ञावंतांना प्रतिभेसोबतच एक शाप चिकटलेला असतो. ही माणसे आत्मकेंद्रित, घाबरट आणि सतत असुरक्षित असतात. आपल्यासमोर कुणी जाऊ नये असे त्यांना नेहमी वाटत असते. त्यातच त्यांची आसुरी महत्त्वाकांक्षा दडलेली असल्याने ही माणसे लबाड्या, कटकारस्थाने रचून आपले इप्सित साध्य करीत असतात. वाङ्मय चौर्य प्रकरणात नाचक्की झालेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा या प्रतिभावंताचेही असेच झाले आहे. त्यांनी गांधी विचारधारा अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदविका वाङ्मयचौर्य करून मिळविल्याचे कधीचेच सिद्ध झाले पण आपल्या दुष्कृत्यांवर पांघरुण घालण्याची त्यांची केविलवाणी धडपड अखेरपर्यंत सुरूच राहिली. खरे तर ही बदमाषी करण्याची या ज्ञानवंताला काहीच गरज नव्हती. प्रामाणिकपणे, गुणवत्तेने ती संपादन करण्याइतपत डॉ. मिश्रा बुद्धिमान आहेत. पण अतिरेकी महत्त्वाकांक्षेने त्यांना नीतिभ्रष्ट केले. चारित्र्याचे एवढे धिंडवडे निघूनही हा माणूस उजळ माथ्याने समाजात वावरत आहे, ही गोष्ट त्यांच्याबद्दल एकाच वेळी किळस आणि कणव वाटायला लावणारी आहे.
२६ वर्षांपूर्वीच्या या कृत्याबद्दल डॉ. मिश्रांनी समाजाची माफी मागून प्रायश्चित घेण्याची तयारी दर्शविली असती तर साºयांनीच त्यांना माफ केले असते. पण माणूस अशा पदव्या आणि पुरस्कारांचा वापर आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्यासाठी करतो तेव्हा त्याला अशा गुन्ह्यांचा कधीच पश्चाताप होत नाही. डॉ. मिश्रा हे नामांकित वक्ते आहेत. उत्तम प्रशासक आहेत. विविध विषयांचे सखोल ज्ञान असलेल्या या प्रज्ञावंताने आपल्या प्रतिभेचा उपयोग नकारात्मक आणि विध्वंसक कामासाठीच अधिक केला आहे. सतत कटकारस्थाने करीत राहणे, विरोधकांना खालच्या स्तरावर जाऊन नामोहरम करणे, या कामातच डॉ. मिश्रा यांनी आपली ऊर्जा वाया घालवली. त्यांच्या स्वभावात ही विकृती नसती तर ते जागतिक स्तरावर कीर्तिवंत ठरले असते. वर्तमानात डॉ. मिश्रा ही व्यक्ती राहिली नसून ती प्रवृत्ती झाली आहे. त्यांच्यासारखी असंख्य माणसे समाजात मोक्याच्या जागेवर अढळपणे बसून आहेत. तळी उचलणारे चेलेचपाटे आणि आश्रितांवरच त्यांचा कृपाळू आशीर्वाद आहे. जी माणसे त्यांना शरण जात नाहीत, त्यांच्या नालस्तीचे, बदनामीचे ती कुभांड रचतात. डॉ. गौरीशंकर पाराशर हेसुद्धा मिश्रांसारखेच कटकारस्थानी. हे दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू. पण त्यांच्या कंपूशाहीने नागपूर विद्यापीठातील वातावरण अक्षरश: नासवले.
पूर्व विदर्भातील एक माजी खासदार अशाच प्रवृत्तीचे. इतरांना सतत शिव्या देणे आणि आपली थोरवी कार्यकर्त्यांना जबरीने गायला लावणे हा आजार लोकनेत्याची क्षमता असलेल्या या नेत्याला जडला आहे. तो असाध्य असल्याचे अलीकडच्या काळातील अनेक घटंनानी सिद्धही झाले आहे. पश्चिम व-हाडातील एक खासदार तर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना चिता जळत असलेल्या माणसाबद्दलच वाईट बोलत असतात. या घाणेरड्या सवयीमुळे त्यांच्या शेजारी बसायला लोकं घाबरतात. नागपुरातील एका ख्यातनाम कवीला आपणच जगातील सर्वश्रेष्ठ कवी असल्याचे सारखे वाटत असते. ही प्रवृत्ती अलीकडे पत्रकारितेतही धुमाकूळ घालत आहे. ज्येष्ठ पत्रकारांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल अवमानकारक लिहिणारे नालस्तीखोर पत्रकार याच माळेतील मणी. मिश्रा, पाराशर समाजातील अशा नासक्या प्रवृत्तींचे प्रतिनिधी आहेत. ज्ञानवंतांचा समाज चाहता असतो. पण, यातील जे नीतिमान असतात त्यांनाच समाज स्मरणात ठेवतो. इतरांना मात्र विसरून जातो. डॉ. मिश्रांच्या वाङ्मयचौर्य प्रकरणातून या अपप्रवृतींनी घ्यावा असा हा बोध आहे.
 


Web Title: Understand that the wise men should take it
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.