देवेंद्रपंत कॉलिंग सुधाकरपंत !

By सचिन जवळकोटे | Published: October 21, 2018 01:25 AM2018-10-21T01:25:25+5:302018-10-21T01:25:58+5:30

‘सोलापूर म्हणजे केवळ दोन देशमुखांच्या जिरवाजिरवीची साठमारी’, एवढीच ओळख आपल्या जिल्ह्याची सध्या महाराष्ट्रात झालेली.

Two Deshmukhs criticize each other in Solapur | देवेंद्रपंत कॉलिंग सुधाकरपंत !

देवेंद्रपंत कॉलिंग सुधाकरपंत !

Next

सोलापूर म्हणजे केवळ दोन देशमुखांच्या जिरवाजिरवीची साठमारी’, एवढीच ओळख आपल्या जिल्ह्याची सध्या महाराष्ट्रात झालेली. या पार्श्वभूमीवर परवा मुंबईहून थेट सोलापुरात देवेंद्रपंत आले. दिवसभर इथं ठाण मांडून सारं मंत्रालय हलवून टाकलं. ‘विकास कसा करायचा असतो’, याची प्रचिती त्यांनी दोन्ही देशमुखांनाच नव्हे तर विरोधकांनाही आणून दिली. पंत संध्याकाळी परतले, परंतु जाता-जाता त्यांनी अजून एक गंमत केली. पंढरीच्या ज्येष्ठ पंतांशी संवाद साधला. हे अनोखं ‘पंत कॉलिंग पंत’ दृष्य पाहून आम्हा पामरासमोर भविष्यातला बदलणारा जिल्हा खूप छानपैकी तरळून गेला.

नागपुरी संत्र्याला म्हणे चंद्रभागेच्या पाण्याचा गोडवा !

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका आटोपून देवेंद्रपंत बाहेर आले. पोर्चमध्ये पंढरीचे प्रशांत मालक त्यांचीच वाट पाहत उभे होते. त्यांच्या खांद्यावर थोपटत पंत पुढे सरकले. बोलता-बोलता देवेंद्रपंतांनी एक वेगळाच धक्का दिला, ‘आज सुधाकरपंतांचा वाढदिवस आहे ना? तो सोडून तुम्ही इथं का आलात?’ मुंबईच्या पंतांचा तो सवाल ऐकताच पंढरीचे धाकले पंत अवाक् झाले. आपल्या घराण्याची खडा न् खडा माहिती समोरच्या पंतांना आहे, हे लक्षात येताच चमकले. त्यांनी तत्काळ आपल्या खिशातून मोबाईल काढून काकांना कॉल केला. फोन लागताच तो थेट देवेंद्रपंतांच्या हातात दिला.
 मग काय..... एवढ्या धावपळीतही तब्बल तीन मिनिटं एक पंत दुस-या पंतांशी बोलले. इकडं त्यांच्या पी. ए. ला घाई लागली होती. अंधार पडायच्या आत विमान ‘टेक आॅफ’ करायचं होतं. परंतु, देवेंद्रपंतांना पंढरीत कमळाचं विमान कसं ‘लँडिंग’ करता येईल, याची चिंता लागली होती. ‘तुमच्या दोन्ही धाकल्या पंतांची मी जबाबदारी घेतलीय. तुम्ही फक्त तुमचीही भूमिका आता जाहीर करा’, असंच इनडायरेक्ट हे पंत सुचवित होते. मात्र सुधाकरपंत कुठं तिकडून सांगू शकत होते की, ‘काही महिन्यांपूर्वीच त्यांची भेट बारामतीच्या थोरल्या काकांनी घेतलीय!’ आलं का लक्षात? लगाव बत्ती...

गढीवरचे देशमुख... 
...वाड्यावरचे देशमुख !


 ब-याच वर्षांनंतर दोन देशमुख बराच वेळ एकाच व्यासपीठावर बसल्याचं दृष्य सोलापूरकरांना पाहायला मिळालं... वॉवऽऽ किती हे आमचं परमभाग्य. अहोभाग्य. देवेंद्रपंतांच्या दौ-यामुळंच ही सारी किमया घडली. पण विशेष म्हणजे दोघंही शेवटपर्यंत एकमेकांशी बोलले नाहीत म्हणे. दोघांच्या ‘गट्टी फूऽऽ’ खेळात एकानंही शेवटपर्यंत ‘टॅम्प्लिजऽऽ’ म्हटलं नाही म्हणे.
  पंतही तसे खूप हुश्शाऽऽर, एका बाजूला त्यांनी विजय मालक अन् बनसोडे वकिलांना बसवलं तर दुस-या बाजूला सुभाषबापू अन् साबळेंना. संघातला शिस्तीचा बॅलन्स त्यांनी इथंही वापरला. विरोधकांना मात्र शेवटपर्यंत बैठकीच्या बाहेरच ठेवलं. ध्यानी-मनी नसताना देवेंद्रपंतांचा हा अकस्मात सोलापूर दौरा अनेकांसाठी चक्रावून टाकणारा; मात्र यातली खरी मेख अस्मादिकांना ठाऊक. मध्यंतरी पार्टीच्या गुप्त सर्वेक्षणात राज्यातील काही लोकसभा मतदारसंघ धोक्यात आल्याची खबर देवेंद्रपंतांना लागलेली. त्यातलाच एक म्हणजे सोलापूर. त्यामुळं तातडीनं ‘पॅचअप’ करण्यासाठी पंत सोलापुरी आले. ‘वन डे ट्रीप’मध्ये पार्टीची प्रतिमा उजळवून गेले. हाच प्रयोग आता ते इतरत्रही करतील... परंतु, सर्वाधिक गरज ज्याची होती, त्या दोन देशमुखांमधल्या ‘पॅचअप’चं काय? गढीतले सुभाषबापू अन् वाड्यातले विजय मालक यांनी सोलापूरच्या विकासासाठी तरी एकत्र यावं, या लोकभावनेचं काय? है किसके पास इसका करारा जवाब?’  लगाव बत्ती.....

दिलीपरावांचा ‘दुष्काळ’

सोलापूरच्या पंत दौ-यात बार्शीचे दिलीपरावही चमकून गेले. त्यांनी दुष्काळ निवारणाचं निवेदन देवेंद्रपंतांना दिलं. खरं तर, हीच भेट तशी मुंबईतही ते घेऊ शकले असते. बंगल्यात कार्यकर्त्यांसमोर मुंबईची ईश्टोरी कथन करताना दिलीपराव म्हणे नेहमी सांगत असतात, ‘मी आज त्याच्या संपर्कात. तो काल माझ्या संपर्कात.’ सर्वच पक्ष आपल्यासाठी कसे पवित्र आहेत, हे नेहमी पटवून देणाºया दिलीपरावांनी देवेंद्रपंतांना दुष्काळाचीही जाणीव करून दिली.. पण त्यांच्या गटाच्या दुष्काळाचं काय?
 दिलीपरावांच्या कुंडलीत सत्तेचा योग नेहमीच स्ट्राँग असला तरी सहकारी संस्थांचे ग्रह म्हणे नेहमीच वक्री बनलेले. भोगावती असो की डीसीसी... ते सत्तेवर येताच या संस्थांभोवती जणू साडेसातीचा फेराच सुरू झालेला. त्यांच्या खासगी कारखान्याचीही पुरती वाट लागलेली. बार्शीतली बँक कशीबशी तग धरून, ही त्यांच्या मॅनेजमेंटच्या कार्यकुशलतेची पोचपावतीच. सांगण्याचा मुद्दा एवढाच, जिल्ह्यातील दुष्काळाचं काय होईल, हे माहीत नाही. मात्र त्यांच्या गटाचा ‘दुष्काळ’ संपणं अधिक गरजेचा. त्यासाठी ‘कमळस्पर्श’ महत्त्वाचा. मात्र रौतांनी अगोदरच त्या पार्टीत जागा बळकावलेली. त्यामुळं तेही सध्या अशक्य. मात्र, दिलीपराव ‘अनहोनी को होनी’ करण्यात पटाईत.

विजयदादांचा चमचा... दीपकआबांचा काटा !

‘दुस-याच्या राजवटीत ढवळाढवळ करण्याची चटक लागली की, आपलंं आहे ते साम्राज्यही खालसा होण्याची प्रक्रिया सुरू होते, हे अकलूजकरांचं जिवंत उदाहरण पाहून तरी माढ्याच्या संजयमामांनी करमाळ्यात सावध पावलं टाकावीत’, असा सल्ला यापूर्वी ‘लगाव बत्ती’ सदरातून दिला गेला होता. मामा यातून किती शिकले... हे माहीत नाही. मात्र सांगोल्याच्या दीपक आबांना या समीकरणाचा फटका बसण्याची चिन्हं अधिक प्रमाणात दिसू लागलीत. दरवेळी ‘ही माझी शेवटचीच निवडणूक !’ म्हणणा-या गणपतरावांनी त्यांच्या महान (!) परंपरेनुसार यंदाही निवडणुकीची तयारी सुरू केली, तसं पाण्यात देव ठेवून बसलेले दीपकआबा सांगोल्याच्या देव्हा-यातून बाहेर पडून माढा लोकसभेच्या मंदिरात तिकिटाचं भजन-कीर्तन-प्रवचन करू लागले.
 एक तर आधीच 'देशमुखांचे प्रभाकर' अकलूजच्या दादांची झोपमोड करू लागलेले. त्यात पुन्हा दीपकआबांचा चेहराही पहाटेच्या स्वप्नात चमकू (!) लागलेला. मात्र, आबा नेमके फोनवरच्या संभाषणात अडकले. राजकारण्यांच्या खिंडीत सापडले. अक्कलकोटमधल्या एका भगिनीबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर केली गेलेली शेरेबाजी ‘रेकॉर्ड’सहित महाराष्ट्रभर पोहोचली. विशेष म्हणजे ही आॅडिओ क्लिप थेट थोरले काका बारामतीकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी अकलूजपासून सोलापूरपर्यंत सा-यांचीच जणू स्पर्धा लागलेली.
 फोनवरच्या याच संभाषणात  ‘विजयदादांचा चमचा’ असाही एक वाक्यप्रयोगकेलेला. खरंतर, जिल्ह्याच्या राजकारणानं आजपावेतो कैक चमचे बघितलेले. अकलूजच्या नावावर किती जणांनी आपली ताटं भरून घेतलेली, याची मोजदादही लागू न शकलेली. किती जणांनी वाट्या पळविलेल्या, याचाही थांगपत्ता न लागलेला. अधिक माहितीसाठी हसापुरेंच्या सुरेशना कधीतरी भेटा. सविस्तर डाटा मिळू शकेल. असो, आता हाच ‘चमचा’ शब्द आबांसाठी ‘काटा’ ठरू शकतो. लोकसभेचं तिकीट तर सोडाच, आहे ती खुर्चीही खिळखिळी करण्यासाठी याच चमच्याचा वापर होऊ शकतो. आबा... जरा जपून; कारण लगाव बत्ती!
( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत. )

Web Title: Two Deshmukhs criticize each other in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.