दानवे-खोतकरांच्या जोर-बैठका अन सत्तारांची गांधीटोपी 

By सुधीर महाजन | Published: February 8, 2019 12:17 PM2019-02-08T12:17:54+5:302019-02-08T12:18:42+5:30

खोतकरांच्या जोडीला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीसुद्धा दानवेंना पराभूत करण्यासाठी डोईवरचे केस न वाढविण्याची प्रतिज्ञा घेतली.

tussle between Danawe - Khotkar and Sattars Gandhitopi | दानवे-खोतकरांच्या जोर-बैठका अन सत्तारांची गांधीटोपी 

दानवे-खोतकरांच्या जोर-बैठका अन सत्तारांची गांधीटोपी 

Next

- सुधीर महाजन

आपल्या जिल्ह्यातील राज्यमंत्री विकासाच्या गप्पा मारतात. त्यांनी पारध ते धामणगाव या रस्त्याचे काम करून दाखवावे, असे आव्हान खासदार रावसाहेब दानवेंनी देताच राज्यमंत्री अर्जुन खोतकर कामाला लागले. काम सुरू करण्यापूर्वी दानवेपुत्र आमदार संतोष यांनी रात्रीच घाईघाईत कामाचे उद्घाटन करून प्रारंभ केला. दानवे-खोतकर यांच्या राजकीय वैमनस्याचे हे ताजे उदाहरण; पण यामुळे का होईना, हा रस्ता चांगला झाला. जालन्याच्या राजकीय आखाड्यात सध्या हे दोघे भिडले आहेत. खोतकरांच्या जोडीला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीसुद्धा दानवेंना पराभूत करण्यासाठी डोईवरचे केस न वाढविण्याची प्रतिज्ञा घेतली. गेल्या दीड वर्षापासून या निमित्ताने का होईना गांधी टोपीचे दर्शन होते.

खोतकर गेल्या काही दिवसांपासून दानवेंच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी करताना दिसतात. परवा तर मुख्यमंत्र्यांनी दोघांच्या भांडणात जाहीर शिष्टाईचा प्रयत्न केला; परंतु खोतकर माघार घ्यायला तयार नाहीत. माघार घेतली तर ती राजकीय आत्महत्या ठरेल असे ते म्हणतात आणि आता तर दोघेही इरेला पेटले असल्याने शह-काटशहाच्या राजकारणाने जोर धरला आहे. मराठवाडा पॅकेजअंतर्गत पालकमंत्री या नात्याने खोतकरांनी ‘वैयक्तिक गाय वाटप योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला. ५० टक्के अनुदानावर गायीचे वाटप करण्याचे नियोजन केले. तसा हा पथदर्शी प्रकल्प होता; पण दानवेंनी त्यात खोडा घातला आणि ही योजना बासनात गेली. ही निवडणूक खोतकरांसाठी राजकीय अस्तित्वाची आहे. गेल्या वेळी ते २८६ इतक्या अल्पमतांनी विजयी झाले होते आणि गेल्या दीड-दोन वर्षांपासून त्यांनी जो दानवेंच्या विरोधात उघड पवित्रा घेतला, तो पाहता ते म्हणतात त्याप्रमाणे आता माघार घेणे ही राजकीय आत्महत्या ठरू शकते. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष त्यांच्या उमेदवारीसाठी पायघड्या टाकतील, अशी स्थिती आहे.

या राजकीय संघर्षाला २०१६ ची जिल्हा परिषद निवडणूक कारणीभूत आहे. भाजपचे २२ उमेदवार निवडून आले असताना खोतकरांनी शिवसेना-काँग्रेस अशी युती करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यांची ही खेळी दानवेंच्या जिव्हारी लागली. कारण त्यांची कन्या आशा मुकेश पांडे या जि.प. अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार होत्या. त्यामुळे हे अपयश त्यांनी वैयक्तिक घेतले. पुढे बाजार समितीतही त्यांनी भाजपला फारसे स्थान दिले नाही.

दुसरीकडे दानवेंनी जिल्हा व जालना शहरात विविध योजना  आणून खोतकरांना शह देण्याचा प्रयत्न केला जिल्हाभर रस्त्याची कामे हाती घेतली. ड्राय पोर्ट, रसायन संस्थासारखे महत्त्वाचे प्रकल्प आणले. कामाचा झपाटा दाखवून दिला. राजकारणाचा विचार केला, तर भोकरदन, बदनापूर या तालुक्यांवर त्यांचे राजकीय वर्चस्व आहे. तरी भोकरदनमध्ये कुठेतरी सत्तेच्या केंद्रीकरणावर नाराजी  दिसते. त्यांच्या मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघ येतो. आजवर त्यांचे व अब्दुल सत्तार यांचे ‘आतून’ साटेलोटे होते. दोघेही एकमेकांना रसद पुरवत असत; पण अचानक काय बिघडले याची वाच्यता झालेली नाही; पण आज दोघेही एकमेकांच्या विरोधात दिसतात. सत्तार यांनी ‘भीष्म प्रतिज्ञा’ केली आहे; पण या दोघांच्या भांडणावर सामान्य माणसाचा विश्वास नाही. वेळेवर दोघे हातमिळवणी करतील, असे त्यांना वाटते.  मुख्यमंत्र्यांनी परवा दोघांनाही जाहीरपणे समजुतीच्या चार गोष्टी सांगितल्या. त्या किती मनावर घेतल्या जातील, याचा लवकरच उलगडा होईल. घोडा-मैदान जवळच आहे. दोघे खरेच एकमेकांना भिडतात की, नुसते शड्डू ठोकत मतदारांचे मनोरंजन करतात, हे कळेलच.

Web Title: tussle between Danawe - Khotkar and Sattars Gandhitopi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.