सांगोपांग विचारांतीच मताधिकार बजावण्याची वेळ

By किरण अग्रवाल | Published: April 25, 2019 08:36 AM2019-04-25T08:36:50+5:302019-04-25T10:33:21+5:30

लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत राज्यात यापूर्वीच्या तीन टप्प्यात ३१ जागांसाठी मतदान होऊन गेले असून, २९ एप्रिल रोजी शेवटच्या टप्प्यात १७ जागांकरिता मतदान होऊ घातले आहे.

The time to vote after thinking and making descision | सांगोपांग विचारांतीच मताधिकार बजावण्याची वेळ

सांगोपांग विचारांतीच मताधिकार बजावण्याची वेळ

googlenewsNext

- किरण अग्रवाल


प्रचाराचा गलबला असा काही शिगेस पोहोचला आहे की, मतनिश्चितीबाबत संभ्रमाचीच स्थिती उत्पन्न व्हावी; परंतु साऱ्यांचेच सारे काही ऐकून व बरेचसे अनुभवूनही झालेले असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. विशेषत: यंदा स्थानिक उमेदवार व भोवतालच्या समस्या अगर विकासाविषयी फारशी चर्चा न झडता सर्वांचाच प्रचार अधिकतर राष्ट्रीय विषयाला धरून तसेच परस्परांच्या नीती-धोरण व वर्तनावर आरोप-प्रत्यारोप करीत घडून आला, त्यामुळे आता दुसऱ्या कुणाचे ऐकून नव्हे, तर आपल्या स्वत:शीच ‘मन की बात’ करीत मत निर्धार करायचा आहे.

लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत राज्यात यापूर्वीच्या तीन टप्प्यात ३१ जागांसाठी मतदान होऊन गेले असून, २९ एप्रिल रोजी शेवटच्या टप्प्यात १७ जागांकरिता मतदान होऊ घातले आहे. त्यासाठीचा प्रचार आता चरणसीमेवर पोहचला आहे. आणखी दोन दिवसांनी जाहीर प्रचार आटोक्यात येईल. त्यानंतर ख-या अर्थाने मतदारराजास मतनिश्चितीसाठीच्या विचाराला उसंत मिळेल. कारण आज रोजच अनेकविध मुद्दे त्याच्या मन:पटलावर येऊन आदळताहेत. सत्ताधारी व विरोधकही सारख्याच त्वेषाने व अहमहमिकेने मतदारांसमोर जात असून, आपणच कसे योग्य आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे, यंदा आपली योग्यता सांगताना समोरच्याची अयोग्यता अगदी टोकाला जाऊन प्रतिपादिली जाते आहे. यात कुणीही कुणापेक्षा मागे नाही की कमी नाही. शिवाय जाहीर प्रचाराखेरीज सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लढाई लढली जाते आहे. त्यामुळे प्रचारात रंग भरून गेले आहेत. अशा स्थितीत, म्हणजे जेव्हा सारेच एका माळेचे... दिसू लागतात तेव्हा निर्णय करणे अवघड होऊन बसते हे खरे; परंतु त्यातल्या त्यात विचारधारा, भूमिका व पूर्वानुभव लक्षात घेऊन योग्य कोण याचा फैसला करणे गरजेचे असते. कुणीही योग्य नाही असे म्हणत मतदानापासूनच दूर राहणे हे चुकीचे असून, आहे त्यात निवड करणे हीच मतदारांची कसोटी आहे.

अर्थात, तसे पाहता काही मते निश्चितही असतात. व्यक्ती अ की ब याच्याशी त्यांना देणे-घेणे नसते. पूर्वधारणा किंवा मान्यतेने ते चालत असतात. अशी झापडबंद अवस्था खरे तर धोकेदायकच असते; पण हा वर्ग आपल्या भूमिकांपासून ढळताना दिसत नाही. राजकीय भक्त संप्रदाय त्यातूनच आकारास येतो. जो अध्यात्मातील भक्तांपेक्षाही अधिकचा अंधश्रद्धाळू असतो. कुणाचीही असो, डोळे मिटून होणारी भक्ती ठेचकाळायलाच भाग पाडते असा अनेकांचा अनुभव आहे. तेव्हा या भक्त परिवारानेही भलत्या भ्रमात न राहता वस्तुस्थिती तपासून बघायला हवी. पक्षावर किंवा व्यक्तीवर निष्ठा असायलाच हवी, हल्ली तीदेखील आढळत नाही हा भाग वेगळा; परंतु त्या निष्ठेला विवेकाची जोड हवी. विवेक हा चिकित्सेला भाग पाडणारा असतो, ‘कथनी’ व ‘करनी’तील अंतर शोधणारा असतो. म्हणूनच विवेकनिष्ठ राहात निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने व सत्तेत आल्यानंतरची त्यांची पूर्तता, याहीदृष्टीने विचार केला जाणे गरजेचे ठरावे.

महत्त्वाचे म्हणजे, यंदा विकासाच्या मुद्द्याची फारशी चर्चा न करता आरोप-प्रत्यारोपांवरच भर दिला गेल्याचे दिसून येते. त्यात एकीकडून चौकीदार चोर है सांगितले जात आहे, तर दुसरीकडे विरोधक हे पाकधार्जिण्या फुटीरवाद्यांना पाठिंबा देणारे असल्याचे आरोप केले जात आहेत. अशा स्थितीत संभ्रम वाढीस लागणे स्वाभाविक असते. सुजाण व निवडणूक प्रचारातील चिखलफेकीला सरावलेल्यांना त्यात काही वाटत नाही, त्यांची मते निश्चित असतात; परंतु एक वर्ग असतोच जो गडबडतो. नेमके खरे काय असेल याचा विचार करतो. अशावेळी स्व. प्रमोद महाजन नेहमी उद्धृत करीत त्या मुद्द्याची आठवण येते, तो म्हणजे ‘फर्स्ट वोट फॉर प्रिन्सिपल्स, देन पार्टी अ‍ॅण्ड लास्ट फॉर पर्सन’, म्हणजे धोरणे, पक्ष व नंतर उमेदवार अशा क्रमाने विचार करून मतनिश्चिती करता यावी. आज प्रिन्सिपल्सच्या बाबतीतच आनंदी आनंद गडे अशी स्थिती आहे व ‘मतांसाठी काहीपण’ चालवून घेतले जाताना दिसत असले तरी दिशा निश्चितीसाठी हे सूत्र उपयोगी ठरू शकणारे आहे. देशाला सक्षमपणे पुढे नेऊ शकण्याची क्षमता असणा-या, सर्वधर्मसमभावाची जपणूक करणा-या आणि संविधानाच्या उद्देशिकेत उल्लेखिलेल्या समता व बंधुत्वाच्या भूमिकेला बांधील राहणा-या नेतृत्वकर्त्यांची निवड करायची तर ती विचारपूर्वकच केली जावयास हवी. राज्यातील मतदार आता त्याचदृष्टीने निर्णायक टप्प्यातून जात आहेत. मताधिकार बजावण्याची वेळ चार दिवसांवर आली आहे. म्हणूनच लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ही निर्णयप्रक्रिया गांभीर्यपूर्वक घडून यावी इतकेच यानिमित्ताने.  

Web Title: The time to vote after thinking and making descision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.