थोरल्या काकांची ‘रेल्वे’

By सचिन जवळकोटे | Published: August 2, 2018 04:08 AM2018-08-02T04:08:49+5:302018-08-02T04:09:05+5:30

बंड्या अन् गुंड्या तसे भलतेच इरसाल. नको त्या गोष्टीत नको तेवढं नाक खुपसण्याची दोघांनाही भलतीच आवड. आता याला जग ‘घाण सवय’ म्हणतं, यात या बिच्चाऱ्यांचा तरी काय दोष? मध्यंतरी ‘मातोश्री’वर घोषणा झाली होती की, ‘आमचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात...’

Thorley Kako's 'Railway' | थोरल्या काकांची ‘रेल्वे’

थोरल्या काकांची ‘रेल्वे’

Next

बंड्या अन् गुंड्या तसे भलतेच इरसाल. नको त्या गोष्टीत नको तेवढं नाक खुपसण्याची दोघांनाही भलतीच आवड. आता याला जग ‘घाण सवय’ म्हणतं, यात या बिच्चाऱ्यांचा तरी काय दोष? मध्यंतरी ‘मातोश्री’वर घोषणा झाली होती की, ‘आमचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात...’ हे ऐकताच दचकलेले बंड्या अन् गुंड्या कामाला लागले. ‘धनुष्य’ पार्टीच्या मेळाव्यात त्यांनी गर्दीचा फायदा घेऊन काही जणांच्या खिशात हात घातला... नंतर हाती आलेल्या चिठ्ठ्या-चपाट्या घरी जाऊन निवांतपणे वाचल्या, तेव्हा ते जाम हसले.
‘पाच वर्षे माझी खुर्ची टिकू दे रे देवाऽऽ’ अशी प्रार्थना करणा-या आशयाच्या काही चिठ्ठ्या होत्या तर एक चपाटी चक्क देवेंद्रपंतांच्या नावानं लिहिलेली होती, ‘राजीनामा देण्याची वेळ या जन्मी तरी येणार नाही, असं वाटतं. मात्र, दुर्दैवाने आम्ही स्वत:च्या पायावर दगड पाडून घेतलाच तर माझे हात कायमस्वरूपी आपल्या चरणाशी असतील. आम्हाला दूर सारू नका...’ त्याक्षणी या दोघांच्या लक्षात आलं की, ‘मातोश्री’कारांचं गेल्या चार वर्षांतलं नेमकं दुखणं काय होतं. असो.
‘थोरले काका बारामतीकर तब्बल २८ वर्षांनी रेल्वेत बसले,’ ही ब्रेकिंग बातमी नुकतीच सोशल मीडियावर गरागरा फिरू लागताच बंड्या-गुंड्यानं झटकन् वेगवेगळे ‘व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप’ चाळायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या नजरेला पडू लागला, फुल्ल टाइमपास करणारा एक से एक मजकूर.
एका ‘कमळ’छाप ग्रुपवर पोस्ट पडलेली, ‘अठ्ठावीस वर्षांनी का होईना बारामतीकर जमिनीवर आले. अखेर त्यांचे विमान खाली उतरले. अब की बारी, पंढरपूर की वारी...’ हे वाचताना बंड्या गोंधळला, ‘थोरले काका पुन्हा माढ्यातून उभे राहाणार की काय...?’ तेव्हा गुंड्यानं त्याला समजावून सांगितलं, ‘ही पोस्ट तयार करणाºया मीडिया सेलवाल्यानं नुकतीच मन की बात ऐकली असावी... म्हणूनच त्याच्या डोक्यात पंढरपूर की वारी भिरभिरली असावी.’ हे ऐकून बंड्याला वाटलं, ‘बिच्चारे देवेंद्रपंत वारी चुकल्यामुळं अगोदरच नाराज असताना नरेंद्रभाई मुद्दामहून वारी करण्याचं सांगून जखमेवर मीठ चोळताहेत की काय?’
यानंतर दुसºया ‘घड्याळ’छाप ग्रुपवर पोस्ट झळकू लागलेली, ‘नेहमी लेट असणारी रेल्वे केवळ साहेबांच्या पदस्पर्शानं वेळेवर धावली. अगदी घड्याळाच्या काट्यावर... हे शक्य झालं केवळ आमच्या साहेबांमुळंच!’
‘इंजिन’छाप ग्रुपवरही मेसेज फिरलेला, ‘होय... बारामतीकर अखेर रेल्वेत बसले. आमच्या इंजिनशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या विषयावरची महामॅरेथॉन मुलाखत ऐका... लवकरच आमच्या फेसबुकवर !’
‘हात’छाप गु्रपवाल्यांनी तर कमालीची प्रतिक्रिया व्यक्त केलेली, ‘आमचे राहुलबाबा जर उद्धोंना हॅपी बड्डेऽऽ म्हणत असतील तर थोरले काका रेल्वेत बसले म्हणून काय बिघडलं होऽऽ कुठून तरी विरोधकांचे सारे डबे एकत्र आले पाहिजेत. विरोधकांची एक्स्प्रेस सुसाट निघाली पाहिजे.’
शेवटचा ग्रुप होता ‘रामदास’ चाहत्यांचा. या ग्रुपला मात्र मस्तपैकी एक काव्य आठवले, ‘काकांची दक्षिण महाराष्ट्र एक्स्प्रेस, भलेही मुंबईपर्यंत पोहोचू दे... माझी डायरेक्ट फ्लाईट मात्र, थेट दिल्लीतच उतरू दे!’

(तिरकस)

Web Title: Thorley Kako's 'Railway'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.