या कट्टरपंथीयांना आवरा, अन्यथा देश बरबाद होईल !

By विजय दर्डा | Published: November 20, 2017 03:10 AM2017-11-20T03:10:15+5:302017-11-20T03:10:53+5:30

‘पद्मावती’ चित्रपटावरून सुरू असलेला वादंग आणि त्यात काही संघटना व नेत्यांकडून वापरली जात असलेली हिंसाचाराची भाषा याने मी बेचैन आहे.

These fundamentalists will be scared, otherwise the country will be ruined! | या कट्टरपंथीयांना आवरा, अन्यथा देश बरबाद होईल !

या कट्टरपंथीयांना आवरा, अन्यथा देश बरबाद होईल !

Next

‘पद्मावती’ चित्रपटावरून सुरू असलेला वादंग आणि त्यात काही संघटना व नेत्यांकडून वापरली जात असलेली हिंसाचाराची भाषा याने मी बेचैन आहे. ज्या चित्रपटास अद्याप सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालेले नाही व जो अद्याप लोकांनी पाहिलेला नाही त्यावरून कट्टरवाद्यांनी ओरड सुरू केली. ऐकीव माहितीवर गोंधळ घालायचा, फतवे काढायचे, हीच हिंदुस्तानची संस्कृती आहे का? आपण एका लोकशाही देशात राहत आहोत, हे विसरून चालणार नाही. येथे सर्व धर्म, सर्व भाषा आणि इतिहासाचा सन्मान करणारे लोक राहतात. खरं काय ते समजून न घेता, कोणताही विचार न करता गोंधळ घालणाºया मूर्खांचा तर हा देश नक्कीच नाही!
कुरापतखोरांचे हे उद्योग आणि त्याबाबत सरकारचा नाकर्तेपणा पाहिला की, आपण नक्की कोणत्या देशात राहत आहोत, असे विचारावेसे वाटते. आपण दहशतवाद्यांच्या देशात तर राहत नाही ना? कोणीही उठून त्याला वाटेल तसा फतवा काढायला आपण तालिबानी होत चाललो आहोत की ‘इसिस’ची सल्तनत येथे स्थापन झाली आहे? असे फतवे काढले जाण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही असे अतिरेकी प्रकार अनेकवेळा झाले आहेत. पण आपली सरकारे याकडे डोळेझाक करतात, हे दुर्दैव आहे. कधी धर्माच्या नावाने तर कधी जातीच्या नावाने मते मिळविण्याच्या स्पर्धेमध्ये अशा लोकांना लगाम घालण्याचा विचार राजकीय पक्षांच्या किंवा नेत्यांच्या मनातही येत नाही. भारतासारख्या देशात हे प्रकार सर्वस्वी अमान्य आहेत, हे मला निक्षून सांगावेसे वाटते. धर्म किंवा जातीचा विचार न करता दमदाटीची आणि अतिरेकी भाषा बोलणाºयांवर सरकारला सक्तीने कारवाई करावीच लागेल, अन्यथा या शक्तींचा बोलबाला होईल व त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील.
आपण लोकशाही देशात राहत असल्याने येथे प्रत्येकाच्या विचाराचा आदर ्व्हायलाच हवा. ‘पद्मावती’ चित्रपटाविषयी बोलायचे तर हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यात काही गडबड आहे असे वाटले तर तेवढा भाग त्यातून काढून टाकायला हवा. आधी चित्रपट पाहू द्या, मगच त्याच्याविषयी बोलता येईल, असे बूंदीच्या राणीनेही म्हटले आहे. मला वाटते की, एखाद्या समाजवर्गाचा अपमान होत असेल, कोणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर त्यास विरोध करणे समजू शकते. कोणाच्याही भावना न दुखावण्याची भारताची संस्कृती आहे, शिकवण आहे. पण काही झाले तरी ‘पद्मावती’ हा एक चित्रपट आहे, हे विसरून चालणार नाही. तो काही ऐतिहासिक माहितीपट नाही. त्यामुळे ‘पद्मावती’ चित्रपट एक नाट्य म्हणूनच पाहायला हवा. जेव्हा चित्रपट तयार करणे सुरू झाले व कोणाला त्याची माहितीही नव्हती तेव्हाही काही संघटना त्याविरुद्ध अस्तन्या वळून पुढे आल्या, याने मी चक्रावून गेलो. जयपूरच्या महालात घूमर नृत्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी या चित्रपटाच्या सेट््सची नासधूस केल्या गेली. लाखो रुपयांचे नुकसान झाले. संजय लीला भन्साळी यांनी याकडे एक आव्हान म्हणून पाहिले व मुंबईच्या मेहबूब स्टुडिओत सेट उभे केले. ४५ दिवसांच्या सलग चित्रीकरणानंतर चित्रपट तयार झाला. या चित्रपटावर १६० कोटी रुपयांचा खर्च झाला. संजय लीला भन्साळी हे आरडाओरड करणारी व्यक्ती नाहीत. ते कुठल्या पार्टीला जात नाहीत की राजकारणातही पडत नाहीत. त्यांचे आजवरचे सर्वच चित्रपट एकाहून एक सरस आहेत. त्यांनी प्रत्येक संस्कृतीवर चित्रपट काढला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर ‘बाजीराव-मस्तानी’, गुजरातच्या ंसंस्कृतीवर ‘हम दिल दे चुके सनम’. राजस्थानच्या संस्कृतीवर आता त्यांनी ‘पद्मावती’ तयार केला आहे. याआधी त्यांनी ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ हा चित्रपट काढला होता. सर्व धर्मांना एका सूत्रात बांधण्याचे काम त्यांनी केले आहे. ‘अल्झायमर’ आजारावर त्यांनी ‘ब्लॅक’ हा चित्रपट काढला.
‘पद्मावती’ चित्रपटासाठी दीपिका पदुकोण हिने ३० किलो वजनाचे दागिने व ३० किलो वजनाचा पोशाख घालून घूमर नृत्य केले आहे. अंगावर ६० किलोचे वजन घेऊन नृत्य करणे हे येरा गबाळ्याचे काम नाही. खरं तर कलाकारांना आपण प्रोत्साहन द्यायला हवे. परंतु काही कट्टरपंथी शक्ती आपले हित साधण्यासाठी विरोधाच्या क्रूर मार्गांचा अवलंब करतात, हे मोठे दुर्दैव आहे. अशा लोकांना किती महत्त्व द्यायचे, याचे भान प्रसारमाध्यमांनीही राखायला हवे. मी पुन्हा एकदा निक्षून सांगेन की, सरकार व सर्व राजकीय पक्षांनी या कट्टरपंथी शक्तींविरुद्ध कठोर पावले उचलायलाच हवीत, नाही तर त्या देश बरबाद करून टाकतील!
नाव नाही, परिस्थिती बदला
आणखी एक बातमी चर्चेत आहे. मध्य प्रदेशच्या ऐतिहासिक व व्यापारी शहराचे नाव ‘इंदौर’ ऐवजी ‘इंदूर’ असे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. लवकरच त्यासंबंधीचा प्रस्ताव मध्य प्रदेश सरकारकडे जाईल. महापालिका, राज्य व केंद्र या सर्व ठिकाणी एकाच पक्षाची सत्ता असल्याने येत्या काही महिन्यांत ‘इंदौर’चे ‘इंदूर’ झल्यास आश्चर्य वाटायला नको. पण मला असे विचारायचे आहे की, नाव बदलून काय होईल? कलकत्त्याचे कोलकाता झाले, बंगलोरचे बंगळुरू झाले, मद्रासचे चेन्नई झाले, बम्बईचे मुंबई झाले, पूनाचे पुणे झाले आणि मेंगलोरचे मंगळुरू झाले. पण काय फरक पडला? या सर्व शहरांपुढील प्रश्न पूर्वी होते तसेच आजही कायम आहेत. नाव बदलल्याने लोकांचे जीवन सुसह्य झाले का? तेथे २४ तास पिण्याचे शुद्ध पाणी मिळू लागले का? की तेथील प्रदूषण कमी झाले? हे सर्व झाले नसेल तर नाव बदलून फायदा काय? माझ्या मते, शहरांचे नामांतर ही एक निव्वळ राजकीय चाल आहे. एका गाण्यात म्हटल्याप्रमाणे, ‘ये पब्लिक है सब जानती है!’
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

Web Title: These fundamentalists will be scared, otherwise the country will be ruined!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.