...म्हणूनच सत्काराचे त्यांना अप्रूप नाही

By गजानन जानभोर | Published: November 7, 2017 03:54 AM2017-11-07T03:54:54+5:302017-11-07T03:54:59+5:30

राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज आश्रमातील ध्यानमंदिराशेजारी एक कुटी आहे. केशवदास रामटेके तिथेच राहतात. साठ वर्षांपूर्वी तुकडोजी महाराज त्यांना इथे घेऊन आले.

... Therefore, they do not have any form of rituals | ...म्हणूनच सत्काराचे त्यांना अप्रूप नाही

...म्हणूनच सत्काराचे त्यांना अप्रूप नाही

Next

राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज आश्रमातील ध्यानमंदिराशेजारी एक कुटी आहे. केशवदास रामटेके तिथेच राहतात. साठ वर्षांपूर्वी तुकडोजी महाराज त्यांना इथे घेऊन आले. केशवदास पुन्हा घरी परतले नाहीत. घरचे म्हणाले, ‘परत चल’. केशवदासांनी सांगितले, ‘‘घरी येऊन तरी काय करु? मला इथेच राहायचे आहे, गुरुदेवांच्या सेवेत’’ राष्टÑसंतांचे अनेक सहकारी, अनुयायी नंतर आसक्तीच्या वाटेने गेले. काहींनी गुरुदेवांच्या नामस्मरणातून शिक्षणसंस्था उभारल्या तर काही राजकारणी झालेत अन् भगव्या टोप्या घालून सभा, संमेलनात मिरवू लागले. गुरुदेवभक्तांची निष्ठा आणि राष्टÑसंतांवरील लोकश्रद्धेचे भांडवल करीत ही मंडळी पुढे गडगंजही झाली. केशवदास मात्र गुरुदेवांजवळच अविचल, अनासक्त राहिले. आश्रमातील सकाळच्या ध्यानात, संध्याकाळच्या प्रार्थनेत केशवदास नित्यनेमाने येतात. किरकोळ बांधा, बेताची उंची आणि एक पाय अधू... आपले अस्तित्व जाणवू न देता एका कोपºयात त्यांचे ध्यान लागलेले... गुरुदेव सेवा मंडळांच्या कार्यक्रमांतही ते मंचावर थांबत नाहीत, मंडपाबाहेर मुलांना पुस्तकं वाटताना दिसतात.
केशवदास राष्ट्रसंतांचे सहकारी. महाराजांच्या भाषणाची ते टिपणे काढायचे. त्यातून ३० पुस्तकं प्रसिद्ध झालीत. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव हे त्यांचे गाव. वडील लहानपणीच वारले, आई मजुरीला जायची. लहानग्या केशवदासला दारिद्र्यासोबतच अस्पृश्यतेचे चटकेही बसायचे. आपल्या सारख्याच हाडामासाच्या माणसांना ग्लासात पाणी आणि आपल्याला ओंजळीत का? कुणाच्या घरचे लग्न असेल तर आपण शेवटच्या पंक्तीतच का बसावे? केशवदासला हे प्रश्न अस्वस्थ करायचे. भजनांचा छंद होताच. चवथीत असताना अभंगही लिहिले. ते दाखवण्यासाठी केशवदास मित्राजवळ गेला. मित्र म्हणाला, ‘अभंग महापुरुषांनी लिहायचे. आपण लिहिणे पाप आहे’. दुसºया दिवशी त्याने तुळशीसमोर सर्व अभंग जाळून टाकले. ‘हा विटाळ कशासाठी’? केशवदासचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. अशातच गावालगत तुकडोजी महाराजांचा एक कार्यक्रम होता. केशवदासने महाराजांना गाठले, ‘मला गुरुमंत्र द्या’ महाराज म्हणाले, ‘सर्वांचे कल्याण कर, हाच गुरुमंत्र तुझ्यासाठी’. ग्रामस्वच्छतेचा मंत्र अंगिकारून केशवदास गावपरिसरात काम करू लागला. केशवदासची सातवीनंतर शाळा सुटली आणि मग पुढचे आयुष्य राष्टÑसंतांच्या कार्याकडे कायमचे प्रवाहित झाले.
राष्ट्रसंतांच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल तर हा देश समजून घ्यावा, असे एक दिवस वाटले आणि केशवदास तडक भारत भ्रमणाला निघाले. १९५८ ते ६० असे दोन वर्ष, पदयात्रेचे अंतर ४,६०० किमी. एक अपंग मुलगा एकटाच फिरतो, साºयांनाच आश्चर्य वाटायचे. पदयात्रेच्या काळात एक मूल्य ते आवर्जून जपायचे, भूक लागली की संबंधितांच्या घरी श्रमदान करून त्यानंतरच माधुकरी मागायची. तरुणांसाठी संस्कार शिबिरे, ग्रामस्वराज्याचे प्रयोग राबवून केशवदासांनी शेकडो गावांना आदर्श केले. ‘ग्रामगीता जीवन विकास परीक्षा’ त्यांनीच सुरू केली. राष्ट्रसंतांनी त्यांना ‘प्राचार्य’ ही उपाधी दिली, ती यासाठीच. संतत्वाच्या असंख्य कसोट्यांवर उत्तीर्ण होऊनही या निष्काम कर्मयोग्याने आपल्यातील सामान्यपण कधी ढळू दिले नाही. हा माणूस कोणत्या मातीतून जन्मास आला, ठाऊक नाही, पण त्याच्या लोकसेवेचा प्रपंच अनासक्त आहे आणि जगणे विशुद्ध आहे. म्हणूनच आश्रमात झालेल्या परवाच्या सत्काराचे त्यांना अप्रूपही वाटत नाही.
(gajanan.janbhor@lokmat.com)

Web Title: ... Therefore, they do not have any form of rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.