दोघांच्याही लैंगिकतेत मोठा फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 04:57 AM2018-07-15T04:57:45+5:302018-07-15T04:58:04+5:30

स्त्री-पुरुषांची मनोलैंगिकता ही पूर्णपणे भिन्न असते. त्यांच्या लैंगिकतेमध्ये फरक असतो का, त्यामुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होतो का, आजच्या सदरात याच विषयी आपण जाणून घेऊ या.

There is a big difference between both sexes | दोघांच्याही लैंगिकतेत मोठा फरक

दोघांच्याही लैंगिकतेत मोठा फरक

Next

-डॉ. मिन्नू भोसले
स्त्री-पुरुषांची मनोलैंगिकता ही पूर्णपणे भिन्न असते. त्यांच्या लैंगिकतेमध्ये फरक असतो का, त्यामुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होतो का, आजच्या सदरात याच विषयी आपण जाणून घेऊ या.
स्त्री व पुरुष यांच्या लैंगिकतेमध्ये कोणता फरक असतो?
पुरुषाची लैंगिकता ही शरीरप्रधान आहे, तर स्त्रीची लैंगिकता ही हृदयप्रधान आहे. पुरुषांचे स्त्रीकडे असलेले लैंगिक आकर्षण हे प्रामुख्याने शारीरिक असते. स्त्रीचे सुंदर, कमनीय शरीर पुरुषाची कामवासना जागृत करायला पुरेसे असते. स्त्रीचा स्वभाव, संस्कार, चारित्र्य या गोष्टींना पुरुषाची लैंगिकता दुय्यम स्थान देते. स्त्रीकडे लैंगिकदृष्ट्या आकृष्ट होण्यासाठी तिचे विचार, तिचे ज्ञान, तिचे वागणे, तिचा पूर्वइतिहास जाणून घेण्याची गरज पुरुषाला जराही वाटत नाही. म्हणूनच पुरुषाला कुठल्याही परस्त्रीशी समागम करण्याकडे तीव्र ओढ असते. याउलट, स्त्रीची लैंगिकता मात्र शरीराभिमुख नाही. तिची लैंगिकता हृदयप्रधान आहे. केवळ पुरुषाचा सुंदर देह बघून स्त्री कधीच त्याच्याकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होत नाही. जोपर्यंत तिचे त्या पुरुषावर मनापासून प्रेम बसत नाही, तोपर्यंत ती त्या पुरुषाकडे लैंगिकदृष्ट्या कधीही आकृष्ट होत नाही.
हा फरक नेमका कसा असतो?
दोघांच्या लैंगिकतेमधील मुख्य फरक असा की, पुरुष ‘संभोगप्रधान’ आहे, तर स्त्री ही ‘प्रणयप्रधान’ आहे. पुरुष जेव्हा स्त्रीच्या जवळ येतो व प्रणयक्रीडेत उतरतो, त्या वेळी त्याची परिणिती संभोगात व्हावी, असा त्याचा तीव्र आग्रह असतो. प्रणयक्रीडा ही केवळ अखेरीस होणाऱ्या संभोगाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी लागणारी पूर्वतयारी आहे, असा त्याचा पवित्रा असतो. काही कारणामुळे प्रणयक्रीडेचा शेवट जर संभोगात होऊ नाही शकला, तर तो पुरुष निराश होतो. संभोग न होऊ शकण्यामागे मग तो कमी पडलेला असो किंवा ती, निराशा मात्र पुरुषच प्रामुख्याने अनुभवत असतो. स्त्रीची लैंगिकता मात्र प्रणयप्रधान आहे. प्रणयक्रीडा जितकी उत्कट व प्रदीर्घ होईल, तितकी स्त्री तृप्त होत जाते. प्रणयाची परिणिती संभोगात व्हावी, असा तिचा आग्रह नसतो.
दोघांच्याही लैंगिकतेचा समतोल कसा राखावा?
कामजीवनावर खोलवर परिणाम करणाºया राग, द्वेष, चीड, संताप, मत्सर, असूया यांसारख्या नकारात्मक भावना उपजतच प्रत्येक प्राणिमात्रामध्ये क्षणार्धात निर्माण होत असतात, त्यांची निर्मिती टाळता येत नाही. या सर्व नकारात्मक भावनांना दाबून न टाकता, नियंत्रित करायला शिकणे म्हणजेच परिपक्वता होय. काही प्रमाणात तरी प्रत्येक विवाहित स्त्री-पुरुषाने जाणीवपूर्वक कष्टाने व्यवहारिक पातळीवर हा सराव करणे गरजेचे आहे आणि ते शक्यही असते. नात्यामधल्या अशा आवश्यक असणाºया परिपक्वतेलाच रिलेशनल मॅच्युरिटी म्हणतात. लैंगिकतेच्या फरकात समतोल राखण्यासाठी ही मॅच्युरिटी महत्त्वाची असते. स्त्री व पुरुष यांच्या लैंगिकतेमधील फरक अनेकांना माहीत नसतो. हे अज्ञानच दाम्पत्य जीवनातल्या अनेक तणाव-तंट्याच्या मुळाशी असतात. प्रत्येक दाम्पत्याला स्त्री व पुरुष यांच्या लैंगिकतेमधील हा फरक माहिती असणे अत्यंत गरेजचे आहे. परस्परांच्या संदर्भातला हा फरक माहिती असेल, तरच वैवाहिक जीवन एकमेकांना प्रेमाने समजून, सांभाळून घेण्यात यशस्वी होऊ शकते.

Web Title: There is a big difference between both sexes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.