पुरे झाला त्रागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:35 PM2018-08-10T12:35:48+5:302018-08-10T12:36:06+5:30

That's enough | पुरे झाला त्रागा

पुरे झाला त्रागा

Next

मिलिंद कुलकर्णी
भाजपा नेते एकनाथराव खडसे यांचा त्रागा रास्त असला तरी सातत्याने तो व्यक्त केल्याने गांभीर्य कमी होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाची हुलकावणी आणि जून २०१६ मध्ये मंत्रिपद गेल्यापासून खडसे नाराज आहेत. भाजपामध्ये ज्येष्ठ असूनही ज्येष्ठताक्रम डावलण्यात आल्याची खंत त्यांनी पुन्हा एकदा भुसावळमध्ये व्यक्त केली. त्यांचे पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनी नाशिकमुक्कामी विधान करुन आगीत तेल ओतले. खडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हावेसे वाटेल, पण पक्षाला तसे वाटायला हवे ना, असे महाजन म्हणाले. अर्थात महाजन काही चुकीचे विधान केलेले नाही. पण आता पक्षातील सहकारी त्यांना वास्तव लक्षात आणून देत असले तरी खडसे ते समजून घेत नाही, हे दुर्देव आहे. ४० वर्षे मी भाजपामध्ये आहे, भाजपाला वाढविण्यासाठी रक्ताचे पाणी केले, अनेकांना पदे देऊन संधी दिली, असे खडसे वारंवार म्हणत असतात. त्यांचे कथन पूर्ण सत्य आहे, कोणीही ते नाकारत नाही. परंतु पुन्हा त्यांनीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमक्ष म्हटल्याप्रमाणे, सद्यस्थितीत भाजपामध्ये ते चौकशीतील व्यक्ती आहे, क्लिन चिटमधील नाही, हे सत्य कटू असले तरी स्विकारावे लागणार आहे. शरद पवार यांच्या प्रसिध्द वाक्याचा आधार बहुदा भाजपाने खडसे यांच्याबाबत घेतला असावा. ‘भाकरी फिरवली नाही तर करपते’ या वाक्प्रचारानुसार भाजपाने खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांना बळ देण्याचे निश्चित केलेले दिसते. आणि महाजन यांनी या विश्वासाला पात्र ठरत पक्षाला अनुकूल असे निकाल दिले आहेत. जिल्हा परिषद निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक, जामनेर व जळगाव पालिका निवडणूक महाजन यांनी जिंकून दाखवली. जळगाव महापालिका निवडणुकीत खडसे यांनी केवळ समर्थक उमेदवारांसाठी दोन दिवस सभा घेतल्या तरी सहा पैकी केवळ एक उमेदवार निवडून आला. जामनेरात महाजन यांनी सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या. मात्र खडसे यांना मुक्ताईनगरात १७ पैकी १३ जागा जिंकता आल्या. राजकारणात नेतृत्वाची पिढी बदलत आहे. भाजपामधील तरुण पिढीला खडसे यांच्याविषयी आदर असला तरी महाजन यांच्याविषयी आपुलकी आहे. सत्ता असल्याने कामांसाठी कार्यकर्त्यांचे मोहोळ महाजन यांच्याभोवती असते. लागोपाठच्या विजयामुळे महाजन यांचा प्रभाव वाढत आहे, हे नाकारुन चालणार नाही. राजकारणाचे बदलते वास्तव पाहता खडसे अस्वस्थ आहेत. त्यातून पक्षाला अडचणीत आणणारी विधाने, कारवाया खडसे यांच्याकडून सुरु आहे. आमदारांच्या बनावट लेटरपॅडवरील तक्रार, प्रचाराची बनावट क्लिप, मराठा आंदोलनाला पाठिंबा देणारा भाजपातील पहिला आमदार असल्याचे विधान हे पाहता भाजपा आणि खडसे या दोघांनी समन्वयाने वाद टाळायला हवे, अशीच भावना हितचिंतकांमध्ये आहे.

Web Title: That's enough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.