औषध खरेदीतील भ्रष्टाचाराच्या अनेक कहाण्या लोकमतने यापूर्वी उजेडात आणल्या आहेत. आपल्याकडे वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालकल्याण, आदिवासी, शालेय शिक्षण असे अनेक विभाग त्यांना लागणाऱ्या औषधांची खरेदी सतत करत असतात. यासाठी ते सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग अशा दोन विभागांच्या दरकराराचा आधार घेत असतात. सरकार एकच; पण त्याच सरकारचे पाच वेगवेगळे विभाग या दोन दरकरारांचा आधार घेत कायम खरेदी करत आले आहेत. कंपन्या आणि ठेकेदार या दोन कराराचा आधार घेत सरकारला फसवत आले आहेत. अर्थात अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याशिवाय हे असे होणे अशक्य. या सगळ्यांवर मात करण्यासाठी पहिल्यांदा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने धाडसी पाऊल उचलले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आणि राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी पोलीस महासंचालकांना शासनाने औषध खरेदीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या व गुंतागुंतीच्या समितीचे अध्यक्षपद देऊ केले आहे. त्याशिवाय डॉ. संजय ओक आणि डॉ. सुरेश सरवडेकर यांच्यासारखे अत्यंत अभ्यासू आणि तज्ज्ञ अभ्यासू लोक या समितीवर घेतले आहेत. पारदर्शी कारभाराचा हवाला देताना तो प्रत्यक्षात कृतीतही उतरवण्याची हिंमत दाखवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले पाहिजे. पण ज्या विभागाची खरेदी सर्वात जास्त आहे त्या सार्वजनिक आरोग्य विभागावरही अंकुश आणण्याची भूमिका या विभागाचे मंत्री डॉ. दीपक सावंत काही केल्या घेण्यास तयार असल्याचे दिसत नाही. आरोग्य विभागात औषध खरेदीचा घोटाळा झाल्यानंतर आरोग्य संचालनालयाचे आरोग्य आयुक्तालय करण्यात आले. संचालकांची दोन पदे तयार केली गेली. मात्र त्यांच्या कामाचे वाटप करण्याची सवड आरोग्यमंत्र्यांना मिळू नये, हे त्यांच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित करण्यास पुरेसे ठरावे. प्रवीण दीक्षित यांनी पोलीस महासंचालक म्हणून उत्तम कामगिरी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असताना त्यांनी केलेले काम कायम लक्षात राहावे, असे आहे. राज्यस्तरीय खरेदी समितीच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने त्यांना दुसरी खेळी करण्याची मोठी संधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी देऊ केली आहे. त्याचे सोने करणे म्हणजे राज्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची शंभर टक्के हमी घेणे आहे. दीक्षित, सरवडेकर आणि डॉ. ओक यांनी ही हमी घेतली पाहिजे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ज्या हेतूने ही समिती स्थापन केली आहे, त्या हेतूनेच त्यांना काम करू देण्यासाठी पोषक वातावरण तयार केले पाहिजे. तसे झाले तर ही राज्याच्या निकोप आरोग्यासाठीच्या चांगल्या पर्वाची सुरुवात ठरेल.