रोटरी ‘अन्नपूर्णा’ची अखंडित दहा वर्षे

By राजा माने | Published: August 4, 2017 12:38 AM2017-08-04T00:38:49+5:302017-08-04T00:38:49+5:30

 Ten years of rotary 'Annapoorna' | रोटरी ‘अन्नपूर्णा’ची अखंडित दहा वर्षे

रोटरी ‘अन्नपूर्णा’ची अखंडित दहा वर्षे

googlenewsNext

मुला-बाळांना वाढविण्यात आयुष्य वेचल्यानंतरही निराधार व विकलांग बनलेल्या माता-पित्यांची आधाराची काठी बनण्याचे काम सोलापूर रोटरी क्लबची अन्नपूर्णा योजना करीत आहे. तिची आज दशकपूर्ती...
समाजातील कोणत्याही आर्थिकस्तरात वार्धक्य आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न हा एक सामाजिक प्रश्न बनला आहे. आयुष्यभर कष्ट वेचायचे आणि मुला-बाळांना वाढवायचे. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली की, केवळ कर्तव्यपूर्तीचा आनंद उराशी जतन करत राहायचे. त्या आनंदापर्यंत पोहोचताना शरीराने सोसलेल्या वेदना आणि वाढलेल्या वयाने निसर्गत:च डोक्यावर लादलेले आरोग्याच्या समस्यांचे ओझे वहायचे! या प्रवासात मुला-बाळांनी साथ दिली तर ठीक नाही तर निराधार बनून उपासमारीच्या खाईत निपचित पडायचे. दुर्दैवाने असे जीवन जगावे लागलेल्यांची संख्या आपल्या देशात कमी नाही. सरकारने त्यावर कायद्याचे हत्यार उगारले तरी प्रबोधन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव याशिवाय त्या खाईतून बाहेर काढणे शक्य होणार नाही.
खरं तर या सामाजिक प्रश्नांवर कायदा हा एकमेव उपाय नाही, याची जाणीव झाल्यानेच अनेक सामाजिक संस्था वृद्ध, विकलांग आणि निराधार लोकांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे येत असताना आपण अनुभवतो. नेमक्या याच प्रश्नाचे गांभीर्य ८१ वर्षांची सेवा परंपरा असलेल्या सोलापूरच्या रोटरी क्लबने दहा वर्षांपूर्वीच जाणले. २००७ साली तत्कालीन अध्यक्ष राज मणियार आणि त्यांच्या सर्वच सदस्यांनी या प्रश्नांवर कृतिशील पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आयुष्यभर सुबत्ता आणि वैभवात जगलेल्या वृद्ध माता-पित्यांना बाजारबुणग्या नात्या-गोत्यांनी वाºयावर सोडल्यानंतर त्यांचा आधार म्हणून आपली संस्था पुढे आली पाहिजे, या भावनेतून ते कामाला लागले. आचार्य किशोरजी व्यास यांच्याकडून प्रेरणा घेऊन ‘अन्नपूर्णा’ ही निराधारांच्या मुखात खात्रीचा घास भरविणारी योजना साकार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक चळवळींचे अभ्यासक प्रा. विलास बेत यांच्या मदतीने विद्यार्थ्यांची फळी तयार करून अशा निराधार माता-पित्यांचा शोध घेण्यात आला. त्या शोधातूनच शंभर वृद्ध माता-पित्यांची निवड करण्यात आली. राज मणियार, जयेश पटेल, या उपक्रमाचे अध्यक्ष खुशाल देढिया, किशोर चंडक यांच्यासारखी मंडळी जिद्दीने कामाला लागली. दररोज सकाळ-संध्याकाळ शंभर जणांना दर्जेदार जेवण घरपोच देणे ही सोपी गोष्ट नव्हती. अन्नधान्यापासून स्वयंपाक व डबे वितरणाच्या यंत्रणेपर्यंत प्रत्येक ठिकाणी खर्चाची बाजू होती. रोटरीचे सर्व सदस्य आर्थिक बाजू सक्षम बनविण्यासाठी पुढे सरसावले. पहिल्या वर्षी ‘सुगरण’ या संस्थेच्या मीनाबेन शहा यांनी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर मोठ्या निष्ठेने स्वयंपाकाची जबाबदारी पेलली. त्यानंतर या कामाला दिशा देण्याचे काम उद्योगवर्धिनी महिला गटाचे काम करणाºया सामाजिक कार्यकर्त्या चंद्रिका चौहान व शुभांगी बुवा यांनी केले. त्यांनी दिलेल्या दिशेमुळेच आजवर एकही दिवस वृद्धांना मिळणाºया भोजनात खंड पडलेला नाही.
या कामाला शिस्तबद्ध आणि पारदर्शी राखण्यासाठी रोटरी क्लबने एक विशेष समिती कार्यरत केली. ती समिती या योजनेच्या दैनंदिन व्यवहाराकडे अत्यंत काटेकोरपणे लक्ष देते. सोलापूर रोटरी क्लबला ७५ वर्षे झाल्यानिमित्ताने एक विशेष टपाल पाकीट डाक खात्यामार्फत काढण्यात आले होते. त्या पाकिटावरही ‘अन्नपूर्णा’ योजनेला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले. दरवर्षी या योजनेवर सुमारे १२ लाख रुपये खर्च होतो. या खर्चाची जुळणी करण्यासाठी एका वृद्ध व्यक्तीच्या एक वर्षाच्या अन्नदानाचा आठ हजार ५० रुपये एवढा खर्च येतो. हे गणित ध्यानात घेऊन देणगीदारांना आवाहन करण्यात येते.
लाभार्थ्यांची वेळोवेळी करावी लागणारी निवड, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत कराव्या लागणाºया आरोग्य तपासण्या व औषधे, जेवणाची भांडी तसेच चादरीसह सर्व कपडे या बाबींची विशेष काळजी घेण्यात येते. रोटरी कम्युनिटी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून निधी संकलन व अन्नपूर्णा योजनेची वाटचाल अखंडित राखली जाते. या योजनेच्या यशाचे खरे वाटेकरी म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे सेवाभावी वृत्तीने काम करणारे रिक्षाचालक कुमार पाटील व शरणय्या हिरेमठ यांचा! अशाच सेवाभावी लोकांमुळे ‘अन्नपूर्णा’ सोलापूरची नवी ओळख ठरत आहे.
 

 

 

Web Title:  Ten years of rotary 'Annapoorna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.