अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे प्रतिभावंत गीतकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 06:40 AM2018-10-31T06:40:56+5:302018-10-31T06:41:16+5:30

यशवंत देव हे अत्यंत शांत, निगर्वी, मिश्कील, अभ्यासू, नीटनेटके, ओशोप्रेमी आणि मित्रांवर - माणसांवर - कुटुंबीयांवर लोभ करणारे होते.

talented and versatile Lyricist yashwant dev has great personality | अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे प्रतिभावंत गीतकार

अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे प्रतिभावंत गीतकार

googlenewsNext

- अशोक चिटणीस (साहित्यिक)

जगभरातील मराठी सुगम संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांना गेली सहा दशके आपल्या गीतांनी आणि स्वररचनेने अविस्मरणीय आनंद देणाºया प्रतिभावंत यशवंत देवांनी आपल्याला लाभलेल्या ब्याण्णव वर्षांच्या आयुष्याचे सोनेच केले. यशवंत देवांसारखा देवदत्त प्रतिभेचा खºया आध्यात्मिक वृत्तीचा गीत-संगीतकार दुर्मीळच असतो.

यशवंत देवांनी ग.दि. माडगूळकर, बा.भ. बोरकर, बहिणाबाई, कुुसुमाग्रज, विंदा, अनिल, पाडगावकर, वसंत बापट, ग्रेस, शंकर वैद्य, इंदिरा, बी, सुरेश भट इत्यादी ६0 पेक्षा अधिक कवींची गीते स्वरबद्ध केलेली आहेत. सुमन कल्याणपूर, कृष्णा कल्ले, लता, आशा, सुधीर फडके, हृदयनाथ, मन्ना डे, महेंद्र कपूर, अनुप जलोटा, येशूदास, देवकी पंडित इत्यादी नामवंत ७0 गायकांनी यशवंत देवांनी स्वरबद्ध केलेली गीते गायलेली आहेत. त्यांनी संगीत वा पार्श्वसंगीत दिलेल्या आणि गीतलेखन केलेल्या एकूण नाटकांची संख्या ४0 आहे. ‘दी रेन’, ‘कथा ही रामजानकीची’ आणि ‘शिवपार्वती’ या तीन नृत्यनाट्यांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले होते. दहा मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत तरी दिले आहे वा त्या चित्रपटांसाठी गीतलेखन तरी केलेले आहे. काही हिंदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. निर्मात्यांकडे खेटे घालण्याची वा मार्केटिंगची वृत्ती नसल्याने ते हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावले नाहीत. त्याची खंतही त्यांना वाटली नाही. १९५0 पासून ५५ वर्षे त्यांनी सुगम संगीताच्या कार्यशाळा भारतात आणि परदेशात घेतल्या.

यशवंत देव हे अत्यंत शांत, निगर्वी, मिश्कील, अभ्यासू, नीटनेटके, ओशोप्रेमी आणि मित्रांवर - माणसांवर - कुटुंबीयांवर लोभ करणारे होते. हेवा, मत्सर, राग, स्वार्थ, हाव यांचा स्पर्शही त्यांना झाला नव्हता. विनोदावर प्रेम करणाºया यशवंतरावांचे म्हणणे होते, ‘‘माणसाच्या तळहातावर स्मितरेषा असावी. इतर भाग्यरेषा नसल्या तरी चालेल’ नर्मविनोद हा यशवंतरावांच्या स्वभावाचा अविभाज्य घटक होता. १९९१ साली मंगेश पाडगावकरांच्या वात्रटिकांनी प्रेरित होऊन ‘पत्नीची मुजोरी’ हा विडंबनगीतसंग्रह त्यांनी प्रकाशित केला. या गीतांना त्यांनी ‘खुदकनिका’ म्हटले होते. यशवंत देवांनी ‘देवांगिनी’ नामक रागाचीही निर्मिती केली. कोणत्याही गुरूकडे मांडी ठोकून बसून त्यांनी वाद्य वादनाचे वा गायनाचे धडे गिरवले नव्हते. अभ्यास व अवलोकन आणि अनुकरणाने त्यांनी उपजत लाभलेल्या प्रतिभेच्या ताकदीवर संगीत दिग्दर्शक म्हणून लौकिक मिळवला.

११ आॅगस्ट १९४८ रोजी कमल पाध्ये यांच्याशी यशवंत देवांचा विवाह झाला. सतारवादक म्हणून १९५0 ते ५२ या काळात त्यांनी एचएमव्हीत नोकरी केली. १९५६ मध्ये मुंबई आकाशवाणीच्या नोकरीत प्रवेश केला. १९८४ मध्ये तेथून सेवानिवृत्त झाले. कमल पाध्येंबरोबर ३३ वर्षे संसार झाला. नीलम प्रभू आणि बबन प्रभू, देव कुटुंबाचे अनेक वर्षीचे मित्र होते. फार्स लेखक व अभिनेते बबन प्रभूंचे निधन १९८१ मध्ये झाले. आकाशवाणीत सहकारी असलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री नीलम प्रभू यांच्याशी यशवंत देवांनी १८ जानेवारी १९८३ रोजी पुनर्विवाह केला. दोघांचे सूर अप्रतिम जुळले. २८ वर्षे ‘पुन्हा प्रपंच’चा सूर आळवून हृदयक्रिया बंद पडल्याने करुणा (नीलम) देव यांचे निधन झाले. ३१ मे २00३ रोजी यशवंत देव एकलव्याच्या भूमिकेतून ज्या अनिल विश्वास या थोर संगीतकारास गुरू मानीत त्यांचेही निधन झाले. यशवंत देव आता एकाकी पडले होते. संगीत आणि ओशोंच्या विचारांची साथ अखेरपर्यंत त्यांच्यासोबत होती.

Web Title: talented and versatile Lyricist yashwant dev has great personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :musicसंगीत