Swami Sanand - Ganges to Panchganga | स्वामी सानंद - गंगा ते पंचगंगा
उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील देवप्रयाग येथे अलकनंदा (डावीकडील) आणि भागिरथी या नद्यांचा संगम होतो, येथूनच गंगेचा जन्म होतो.

ठळक मुद्देप्राणाची आहुती देणाऱ्या एका विद्वान, संन्यासी आणि शिक्षकाच्या निधनाने कोणालाही खंत वाटली नाही.स्वामी सानंद यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. त्यात त्यांनी चार मागण्या मांडल्या होत्या.

- वसंत भोसले

गंगा नदी वाचली पाहिजे यासाठी उपोषणास बसलेल्या डॉ. जी. डी. अग्रवाल ऊर्फ स्वामी ग्यानस्वरुप सानंद यांचे निधन झाले. निसर्ग, संस्कृती आणि प्राणिमात्राच्या संवर्धनासाठी, गंगा नदीचे जिवंतपण राहिले पाहिजे, यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या एका विद्वान, संन्यासी आणि शिक्षकाच्या निधनाने कोणालाही खंत वाटली नाही. स्वामी सानंद यांच्या निधनाने या देशातील नद्यांच्या संवर्धनाची चळवळ गतिमान व्हायला हवी आहे..

भारतातील सर्वाधिक मोठे गंगेचे खोरे आहे. देवप्रयाग येथे अलकनंदा आणि भागिरथीचा संगम होतो आणि गंगा नावाने जगातील एका मोठा नदीचा प्रवास सुरू होतो. ती वाहत वाहत सदुसष्ठ किलोमिटवर ऋषिकेशला येते. उत्तराखंडच्या गढवाल पर्वतरांगातून ती हरिद्वारला पोहोचते. तिचा तो खळखळाट संपतो आणि नदीच्या विस्तारीत खोºयात संथ वाहत ती पुढे बांगला देशापर्यंत पोहोचते. असंख्य उपनद्या तिला येऊन मिळतात. वर्षातील तीनशे पासष्ट दिवस वाहणारी गंगामय्या ही एक नैसर्गिक देणगीच आहे. ती वाचली पाहिजे म्हणून गंगा महासभेतर्फे १९०५ पासूनच मदनमोहन मालवीय यांनी प्रयत्न सुरू केले. गंगा नदीचे प्रदूषण ही आता एक राष्ट्रीय समस्या झाली आहे आणि तिच्या संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांत सतराशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, मात्र परिणाम फारसा जाणवत नाही. गंगा ही हिंदूनी पवित्र नदी म्हणूनसुद्धा मानली आहे. तिचे भारतीय उपखंडाच्या इतिहास वेगळेच स्थान आहे.

गंगा नदीची ही अवस्था पाहता आपण आपल्या आजूबाजूच्या नद्याही पाहतो. तेव्हा वेगळा अनुभव येत नाही. नद्यांचे प्रदूषण, मानवी हस्तक्षेप आणि नद्याच नष्ट होणे, आदी प्रकार पाहायला मिळतात. नद्यांचे प्रदूषण रोखण्याबरोबरच नद्यांच्या पुनर्जीवनाचे कार्यक्रमही घ्यावे लागले, हा किती घोर लज्जास्पद मानवी व्यवहाराचा परिपाक आहे. अनेक नद्या वाहत्या राहिलेल्या नाहीत, त्या आटून गेल्या आहेत. महाराष्ट्रात अशा नद्यांची संख्या शंभराहून अधिक असेल. अहमदनगर शहर ज्या सीना नदीच्या काठावर वसले आहे, तिचे उदाहरण देता येईल. सांगली जिल्ह्यातील बोर, नांदणी किंवा येरळा, अग्रणी नद्यांची उदाहरणे मांडता येतील. गंगा नदीचे पात्र अनादी काळापासून कधी आटलेले नाही. तिचा प्रवास पतित आहे. मात्र, तिचे आरोग्य बिघडलेले आहे. हरिद्वारनंतर ती जेव्हा सपाटी प्रदेशात प्रवेश करती होते, तेव्हापासून तिच्या अंगा-खांद्यावर खेळून पालनपोषणासाठी अवलंबून असणाºयांनी प्रदूषणाचा विषारी विळखा घातला आहे. पुढे पुढे अलाहाबाद (उर्फ प्रयागराज्य)पर्यंत ती येईपर्यंत पाणी पूर्णत: प्रदूषित होऊन जाते.

गंगामय्या वाचली पाहिजे म्हणून यासाठी सलग एकशे बारा दिवस उपोषणास बसलेले पर्यावरणवादी अभियंते गुरू दास अग्रवाल ऊर्फ डॉ. जी. डी. अग्रवाल ऊर्फ स्वामी ग्यानस्वरुप सानंद यांचे वयाच्या ८६व्या वर्षी गेल्या १२ आॅक्टोबरला निधन झाले. गंगा नदीच्या संवर्धनासाठी सरकारने पावले उचलावीत म्हणून त्यांनी गेल्या २२ जून रोजी आमरण उपोषणास सुरूवात केली होती. त्यांचे हे चौथे उपोषण होते. यापूर्वी त्यांनी तीन उपोषणे करून सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडले होते. २००८ मध्ये पहिले उपोषण केले होते. भागिरथी आणि अलकनंदा नद्यांच्या संगमातून देव प्रयागपासून गंगेचा जन्म होतो. त्या भागिरथी नदीवर जलविद्युत उत्पादनासाठी धरण बांधण्यात येणार होते. त्याच्या विरोधात उपोषणास बसून गंगा नदीच्या पाण्याचा प्रवास पतित राहिला पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. ती सरकारने मान्य करून जलविद्युत प्रकल्प रद्द केला. दुसऱ्यांदा त्यांनी राष्ट्रीय गंगा खोरे प्राधिकरण स्थापन करून नदीचे प्रदूषण रोखण्याची मागणी केली होती.

३८ दिवसांच्या उपोषणानंतर ही मागणी मान्य करण्यात आली. डॉ. अग्रवाल यांच्या उपोषणाच्या आंदोलनानंतरही त्यांच्या मान्य केलेल्या मागण्या अमलात येत नव्हत्या. म्हणून २०१० मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा उपोषणाचा मार्ग पत्करला. गंगोत्री आणि उत्तराकाशी नद्यांवर तीन नवे प्रकल्प घेण्यात येणार होते. ते रद्द करून भागिरथी नदीचे पात्र पर्यावरण संवेदनशील विभाग म्हणून जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. ती सरकारने मान्य केली.

डॉ. जी. डी. अग्रवाल कोण होते? त्यांच्या एकशे बारा दिवसांच्या आमरण उपोषणाने निधन झाले. मात्र, त्याची एखादी बातमी येण्यापलीकडे काहीही तरंग उमटले नाहीत. मी टू च्या काळात अग्रवाल यांच्या आमरण उपोषणाची आणि मृत्यूची नोंद कोणी घेतली नाही. उत्तर प्रदेशातील मुझफ्फर जिल्ह्यातील कांनहला गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले गुरू दास अग्रवाल उच्चशिक्षित होते. त्यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण रूरकी येथील आयआयटीमध्ये पूर्ण केले आणि अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये बर्क्ली विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली. अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी कानपूरच्या आयआयटीमध्ये प्राध्यापक म्हणून अध्ययनाचे कार्य सुरू केले.

तत्पूर्वी काही काळ त्यांनी उत्तरप्रदेश सरकारच्या पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून नोकरीही केली होती. केंद्र सरकारने १९७४ मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन केले. तेव्हा त्याचे पहिले सदस्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले. अभियंते तयार केले. पर्यावरणप्रेमी उभे केले. जलधोरणासाठी झटणारे कार्यकर्ते तयार केलेत. आयआयटी मुंबईचे हुनू रॉय, विज्ञान व पर्यावरण केंद्राची स्थापना करणारे अनिल अग्रवाल, ज्येष्ठ पर्यावरणवादी रवि चोप्रा आणि जलदूत राजेंद्र सिंह आदींची उदाहरणे देता येतील. हे सर्व त्यांचे विद्यार्थी आहेत.

गंगा नदी आणि तिच्या खोऱ्यातील प्राणिजीव यांचे संवर्धन व्हावे यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. महात्मा गांधी यांच्या विचारावर निष्ठा असणाºया अग्रवाल यांनी चारवेळा उपोषणाच्या मार्गाने लढाई लढले. पहिल्या तिन्ही लढाईत त्यांना प्रचंड यश आले. सरकारला आपली भूमिका बदलावी लागली. अलीकडच्या काळातील सरकारचा व्यवहार पाहून त्यांना नैराश्यही आले होते. त्यांच्यावर हिंदू तत्त्वज्ञानाचाही प्रभाव होता. त्यांनी २०११ मध्ये संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत त्यांनी संन्यास घेऊन डॉ. जी. डी. अग्रवालचे स्वामी ग्यानस्वरुप सानंद असे नाव परिधान केले. ते आश्रमात राहत असत. साधे कपडे (संन्यासाचे) वापरत होते. जेव्हा प्राध्यापक होते तेव्हाही ते कॉलेजमध्ये सायकलने जा-ये करीत होते. बाहेरचा प्रवास प्रवाशी एस.टी. गाडीने किंवा रेल्वेच्या दुसºया दर्जाच्या डब्यातूनच त्यांनी कायमपणे प्रवास केला. त्यांची अत्यंत साधी राहणी होती.

गेल्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवण करून दिली की, २०१४च्या निवडणुकीत वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या सभेत बोलताना आपण म्हणाला होता की, ‘‘ना मैं आया हॅूँ, ना ही भेजा गया हॅूँ, मुझे तो गंगा माँने बुलाया हैं!’’ त्या उद्गाराची आठवण करीत एक सविस्तर पत्र स्वामी सानंद यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिले होते.

त्यात त्यांनी चार मागण्या मांडल्या होत्या.

१) गंगा नदीच्या संवर्धन व संरक्षणासाठी गंगा महासभेने २०१२ मध्ये जो प्रस्ताव तयार केला आहे, त्याच्या आधारे एक विधेयक संसदेत मांडून कायदा करावा.
२) गंगा नदीच्या अप्पर भागात आणि तिच्या सहा उपनद्यांवर उभारण्यात येणारे सर्व जलविद्युत प्रकल्प रद्द करण्यात यावेत.
३) गंगा नदीच्या मुख्य प्रवाहात वाळू उपसा करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात यावी.
४) गंगा नदीच्या संवर्धनासाठी एक स्वायत्त मंडळ स्थापन करण्यात यावे, त्यावर योग्य आणि नदीच्या संवर्धनाची बांधीलकी असणाºयांची नियुक्ती करण्यात यावी.

स्वामी सानंद यांच्या पत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. चर्चा केली नाही. मंत्र्यांना किंवा अधिकाºयांना पाठवून त्यांच्या प्रस्तावाचा विचार होत आहे किंवा मार्ग काढत आहोत, असे आश्वासित केले नाही. त्यांनी अखेरीस आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला. २२ जून रोजी उपोषण सुरू केले. गेल्या ९ सप्टेंबर रोजी त्यांनी पाणीही घेणार नसल्याचे जाहीर केले. तरीदेखील सरकारला जाग आली नाही.

गंगा नदीच्या संवर्धनासाठी एका हिंदू आश्रमात राहून लढणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभियंता अखेर ११ आॅक्टोबर रोजी मरण पावला. त्यांच्या निधनाने आंध्र प्रदेशाच्या निर्मितीसाठी ५४ दिवस आमरण उपोषणास बसलेले पी. श्रीरामूलू यांचे स्मरण होते. त्यांचे निधन झाल्यावर तिसºया दिवशी तेलगू भाषकांसाठी आंध्र प्रदेश राज्याची मागणी मान्य करण्यात आली. हीच मागणी दोन-चार दिवस आधी मान्य केली असती तर आंध्र प्रदेशचे गांधी म्हणून ज्यांची ओळख होती त्या श्रीरामूलू यांचे प्राण वाचले असते. ते देखील अभियंते होते आणि त्यांचे वय केवळ ५१ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने प्रचंड आगडोंब उसळला आणि आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करीत असल्याची घोषणा पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केली.

स्वामी स्वानंद यांचे ११२ दिवस उपोषण झाले. त्यातच त्यांचे निधन झाले. ‘गंगा माँ ने मुझे बुलाया हैं ’ म्हणणारे गंगा नदीच्या काठावरील वाराणसीचे प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ओळीचा शोकसंदेश काढण्याव्यतिरिक्त अधिक काही केले नाही. निसर्ग, संस्कृती आणि प्राणिमात्राच्या संवर्धनासाठी, गंगा नदीचे जिवंतपण राहिले पाहिजे, यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या एका विद्वान, संन्यासी आणि शिक्षकाच्या निधनाने कोणाला खंतही वाटली नाही. त्यांच्या चार मागण्यांपैकी एकही मागणी अवास्तव नव्हती. दुसरी मागणी ही सरकारला अडचणीची वाटली असणार आहे. अनेक उद्योजकांशी करार मदार करून गंगा आणि तिच्या उपनद्यांवर अनेक प्रकल्प उभे करायचे असणार आहे. विकास पुरुषाला केवळ विकास दिसतो आहे आणि निवडणुका समोर आल्या की, धर्म, संस्कृती आणि देशाभिमान दिसतो आहे. स्वामी सानंद यांच्या निधनाने या देशातील

नद्यांच्या संवर्धनाची चळवळ गतिमान व्हायला हवी आहे.
गंगा ते पंचगंगा म्हणताना, हीच भावना उफाळून येते. सह्याद्रीच्या दºया-खोºयात उगम पावणाºया कृष्णा नदीच्या खोºयातील सर्व उपनद्यांची हीच अवस्था आहे. त्यापैकी पंचगंगा ही नदी सर्वाधिक प्रदूषित झाली आहे. गंगेप्रमाणे तिलाही उगम नाही. गंगा अडीच हजार किलोमीटर वाहते. अनेक गावे, शहरे आणि कोट्यवधी माणसे ती झेलते. पंचगंगा ही भोगावती, कुंभी, कासारी नद्यांच्या संगमातून कोल्हापूरच्या पश्चिमेस प्रयाग चिखलीतून प्रवास सुरू करते. केवळ ६५ किलोमीटरचा प्रवास करीत नृसिंहवाडीत कृष्णेत सामावून जाते. केवळ एवढ्या छोट्या प्रवासात तिचे प्रदूषण गंगेइतकेच भयानक होते आहे. कोल्हापूरशहरापासून कोणत्याही गावाने किंवा इचलकरंजीसारख्या शहराने पाणी पिऊ नये, अशी तिची अवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे असंख्य कार्यकर्ते स्वामी सानंदासारखे आवाज उठवित आहेत. शेकडो बैठका होतात. तुटपुंजा निधी मंजूर होतो. काम काही होत नाही. पंचगंगेचे प्रदूषण करणाºयांची गय केली जाणार नाही, असा दम दिला जातो आणि प्रत्येक जण थेट पाईपलाईनचा समर्थक होतो. त्यासाठी आग्रही राहतो. गंगेप्रमाणे पंचगंगेचे संवर्धन होण्यासाठी कृष्णा खोरे संवर्धन प्राधिकरण स्थापन केले पाहिजे. कृष्णा महाबळेश्वरला उगम पावते आणि तिचे विद्रुप रूप वाई शहराजवळच पाहावे लागते. स्वामी सानंद यांच्या बलिदानातून आपण काहीतरी नवा विचार घेऊन कृती करायला हवी आहे.

 


Web Title: Swami Sanand - Ganges to Panchganga
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.