जगण्यातील घुसमट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 03:40 AM2018-06-25T03:40:40+5:302018-06-25T03:40:43+5:30

आयुष्यभर नोकरी करूनही स्वत:चे घर घेता न आल्याची खंत आणि पुरेसे शिक्षण दिल्यानंतरही मुलांच्या भविष्याची सतावणारी चिंता

Survival Intrusion | जगण्यातील घुसमट

जगण्यातील घुसमट

Next

आयुष्यभर नोकरी करूनही स्वत:चे घर घेता न आल्याची खंत आणि पुरेसे शिक्षण दिल्यानंतरही मुलांच्या भविष्याची सतावणारी चिंता यातून वांद्रे येथील सरकारी वसाहतीत एकाच कुटुंबातील चौघांनी जीवन संपवल्याची घटना सुन्न करणारी आहे. मुंबईसारख्या महानगरात एकीकडे उंच इमले आणि अब्जाधीशांची वाढती संख्या दिसत असली, तरी त्याखाली रोजच्या जगण्याची भ्रांत असलेल्यांच्या किंवा फक्त एकाच्याच नोकरीवर चालणाऱ्या कुटुंबाच्या आयुष्याचा डोलारा किती पोकळ होत चालला आहे, याचे भीषण वास्तव समोर आणणारी आहे. महागडे होत गेलेले, तरीही जगण्यासाठी उपयोगी न पडणारे शिक्षण; उच्च शिक्षणानंतरही नोकरीची भ्रांत, सध्या असलेल्या नोकºया किती टिकतील याबद्दलची अनिश्चितता, परवडणाºया घरांचे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले स्वप्न यातून जगण्यावर उदासीनतेची दाट छाया पसरलेली आहे. जवळपास ३५ टक्के मुंबईकर अशा निराशेच्या गर्तेत हेलकावे घेत असल्याची आकडेवारी मध्यंतरी समोर आली होती. त्यातून मुंबापुरीच नव्हे, तर तिच्या परिघातील सारी महानगरे ओढग्रस्तीचे, तणावाखालील जीवन जगत असल्याचे ढळढळीत वास्तव उघड झाले होते. असह्य होत असलेल्या धावपळीत कुटुंबातील सदस्यांचीच चौकशी करण्याइतकी फुरसत नसल्याने परस्परांची चौकशी करून धीर देणे, संकटातून मार्ग काढण्यासाठी दिलासा देणे, ‘हेही दिवस जातील,’ असे सांगत सांत्वन करण्यासाठी हक्काचे कोणी नसल्याने जगण्यातील ही घुसमट साचत जाते. ती असह्य झाल्यावर आयुष्य संपवण्याच्या वळणावर घेऊन जाते. आत्महत्या हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग नाही, हे पटत असूनही भविष्यात जर अंधकार दिसत असेल तर कोणत्या आशेच्या किरणाकडे पाहून दिवस ढकलायचे, याचा मार्ग सापडत नाही. वांद्रे येथील कुटुंबातील कर्ता सरकारी नोकरीत असला आणि पत्नी दळणाच्या कामातून कुटुंबाला हातभार लावत असली, तरी त्यातून मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही ही खंत, दुसºया मुलाचे शिक्षण; दोन्ही मुलांच्या भविष्याची पोखरत गेलेली चिंता यातून कुटुंबाने आयुष्यच खुडून टाकले. प्रामाणिकपणे नोकरी करून आयुष्यातले अनेक प्रश्न सुटत नाहीत, अशी काहीशी अवस्था या कुटुंबाची झाली. आहे त्या स्थितीत जगता येत नाही आणि परिस्थिती आमूलाग्र बदलेल असा कोणता मार्ग समोर दिसत नाही, अशा कोंडीत हे कुटुंब सापडले. त्यातून शहरी मध्यमवर्गीयांची जगण्याची कमी होत गेलेली उमेद, क्षीण होत गेलेली सहनशक्ती, मनाची ढासळलेली ताकद यामुळे कचकड्याच्या बनलेल्या जगण्यावर दाटलेले हे मळभ परस्परांच्या सहकार्यानेच दूर करण्याची गरज आहे.

Web Title: Survival Intrusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.