नक्षलविरोधी रणनीतीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:28 AM2017-11-18T00:28:30+5:302017-11-18T00:28:38+5:30

गडचिरोली जिल्हा हा नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. राज्यात सर्वाधिक नक्षली उपद्रव हा याच जिल्ह्यात होत असतो. परंतु यंदा मात्र चित्र बदलले आहे.

 The success of the anti-naxal strategy | नक्षलविरोधी रणनीतीचे यश

नक्षलविरोधी रणनीतीचे यश

Next

गडचिरोली जिल्हा हा नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. राज्यात सर्वाधिक नक्षली उपद्रव हा याच जिल्ह्यात होत असतो. परंतु यंदा मात्र चित्र बदलले आहे. या वर्षभरात नक्षल चळवळीची नांगी ठेचण्यात पोलिसांना लक्षणीय यश मिळाले आहे. विशेष म्हणजे पोलीस दलाच्या कारवाईसोबतच त्या भागातील लोकांनी नक्षल्यांविरुद्ध पुकारलेल्या एल्गाराने ही चळवळ निष्प्रभ करण्याच्या प्रयत्नांना बळ प्राप्त होत आहे. यावर्षी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून तब्बल ४० चकमकींमध्ये ९ नक्षलवादी ठार झाले आहेत. याशिवाय २० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणही केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत नक्षल्यांकडून आदिवासींच्या हत्येचे प्रमाणही निम्म्यावर आले आहे. याबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन करायला हवे. तसेच नक्षल्यांच्या हिंसाचारात होरपळलेल्या आदिवासी बांधवांच्या हिमतीलाही दाद द्यावी लागेल. गडचिरोली जिल्ह्यात १९८० साली नक्षलवादाने आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली होती. या काळात शेजारील आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येत नक्षलवादी गडचिरोलीत शिरले आणि हळूहळू तेथील जंगलांमध्ये त्यांनी आपले बस्तान बांधले. या काळात प्रचंड हिंसाचार, जाळपोळ आणि हत्याकांडांसोबतच या क्षेत्रातील तरुणतरुणींची दिशाभूल करून त्यांना चळवळीत खेचण्यासही ते बºयाच अंशी यशस्वी झाले. नक्षल्यांच्या रक्तपातात अनेक निष्पाप आदिवासींचा बळी गेला. परंतु आता परिस्थिती बदलत चालली आहे. तसे बघता नक्षलवाद्यांच्या तुलनेत शासकीय यंत्रणेकडे असलेले मनुष्यबळ आणि शस्त्रबळही जास्त आहे. असे असतानाही नक्षलवाद चिरडून काढण्यात आजवर अपयशच पदरी पडले. कारण नक्षली ध्येयाने प्रेरित होते आणि त्यांना स्थानिक लोकांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. निष्पाप आदिवासी त्यांच्यावर विश्वास ठेवत होते. परंतु त्यांचा हा विश्वास नक्षल्यांनी आता गमावला आहे. गेल्या महिन्यातील नक्षल सप्ताहादरम्यान याची प्रचिती आली. हा आठवडा नक्षलविरोधी सप्ताह म्हणूनच अधिक गाजला. लोक उघडपणे कुठल्याही भयाविना नक्षलवाद्यांविरुद्ध रस्त्यावर उतरले होते. शासनाच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेला मिळणारा प्रतिसादही तेच सांगतो. नक्षल्यांच्या रक्तपाताने लोक त्रस्त झाले असून त्यांची शांतीपूर्ण जीवन जगण्याची इच्छा आहे आणि नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. ही चळवळ उखडून काढायची असल्यास जनजागरुकता आणि जनआंदोलन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात हे दोन्ही घटक प्रभावी झाले आहेत. हा सकारात्मक बदल नक्षलवाद नक्की संपणार असा विश्वास देतो.

Web Title:  The success of the anti-naxal strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.