धक्कादायक आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 03:34 AM2018-03-20T03:34:50+5:302018-03-20T03:34:50+5:30

गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला, त्या पार्श्वभूमीवर सबंध उत्तर प्रदेशातील लोकसभा क्षेत्राची आकडेवारी मांडून त्याविषयीचे भविष्यातील निकालांचे अंदाज त्या क्षेत्रातील अभ्यासकांनी वर्तविले आहेत.

 Stunning statistics | धक्कादायक आकडेवारी

धक्कादायक आकडेवारी

Next

गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला, त्या पार्श्वभूमीवर सबंध उत्तर प्रदेशातील लोकसभा क्षेत्राची आकडेवारी मांडून त्याविषयीचे भविष्यातील निकालांचे अंदाज त्या क्षेत्रातील अभ्यासकांनी वर्तविले आहेत. सध्याच्या लोकसभेत भाजपाचे ७३ खासदार उत्तर प्रदेशातून लोकसभेवर निवडून आले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे तीन पक्ष भाजपाविरुद्ध एकेकट्याने लढले. त्या लढतीत विरोधकांच्या झालेल्या मतविभाजनाच्या बळावर भाजपास त्यांचे एवढे उमेदवार निवडून आणणे जमले. नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही पक्षोपक्षांची स्थिती अशीच राहिली. त्या बळावर गोरखपूरचे महंत योगी आदित्यनाथ ३१४ आमदारांशी मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाले. परवा झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी आणि बहुजन समाज हे दोनच पक्ष भाजपाविरूद्ध संघटित झाले आणि त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना प्रत्यक्ष मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्याच मतदार संघात धूळ चारली. २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकांत हे दोनच पक्ष एकत्र आले आणि त्यांना आपली मते परस्परांना देता आली तर भाजपाच्या उत्तर प्रदेशातील जागा ५० ने कमी होऊन त्यांची त्या राज्यातील आजची ७३ ही खासदारसंख्या अवघी २३ वर येईल. काँग्रेस पक्षही त्यांच्यासोबत तेव्हा असेल तर ही आकडेवारी आणखीही खाली जाईल. गोरखपूर आणि फुलपूरच्या पोटनिवडणुकांचा खरा धडा हा आहे आणि त्यामुळे त्याची भाजपाने धास्ती घेतली आहे. देशातील धर्मनिरपेक्ष शक्ती नुसत्या एकत्र आल्या तरी त्या भाजपाला सत्तेवरून पायउतार करू शकतील, असे शरद पवार व अन्य नेते का म्हणतात, ते यातून कळण्याजोगे आहे. आकडेप्रमुखांनी २०१४ च्या निवडणुकीत समाजवादी व बहुजन समाज या पक्षांनी उत्तर प्रदेशातील ८० ही जागांची मते एकत्र करून ही आकडेवारी सिद्ध केली आहे. या आकडेवारीला जनमानसाचा असलेला आधार बिहारच्या अरेरका लोकसभा क्षेत्रानेही मिळवून दिला आहे. त्या राज्यात पूर्वी नितीशकुमारांचा जदयु आणि लालूप्रसादांचा राजद हे पक्ष एकत्र येऊन लढले व त्यांनी त्या राज्याच्या विधानसभेत दोन तृतीयांशाहून अधिक जागा मिळविल्या. पुढल्या काळात नितीशकुमारांनी भाजपाचा हात धरून लालूप्रसादांना लाथाडले. नुसते लाथाडलेच नाही तर ते तुरुंगात जातील, याचीही व्यवस्था केली. आता लालूप्रसाद तुुरुंगात आणि त्यांचा पक्ष एकाकी आहे. तरीही त्यांचा उमेदवार भाजपाला धूळ चारून या राज्यात विजयी झाला असेल तर भाजपाने व मोदींनी काळाची बदललेली पावले ओळखली पाहिजेत. आदित्यनाथांना मुख्यमंत्रिपदावर येऊन एकच वर्ष झाले. मोदींनी साडेतीन वर्षे पंतप्रधानपदावर काम केले. मात्र एवढ्या अल्पावधीत आदित्यनाथांची अहंता त्यांच्यातील संन्याशास पराभूत करून गेली आणि सगळा भाजपा ‘हा मोदींचा उत्तराधिकारी आहे’ असे म्हणू लागला. मोदींचा वट तर असा की ट्रम्प आणि झिपिंगपाठोपाठ आता आपणच असा त्यांचाही अविर्भाव राहिला. प्रत्येकास अभिमान जोपासण्याचा हक्क आपल्या घटनेने दिला आहे. त्यामुळे त्यांना स्वत:विषयी काय वाटावे हे कळणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, त्याचवेळी जनतेने काय समजायचे ते समजण्याचा अधिकार तिलाही आहे. मोदींचे सरकार तीन वर्षांत आणि आदित्यनाथांचे सरकार एक वर्षात जनतेपासून किती दूर गेले आणि त्यांनी त्यांच्या छुप्या अजेंड्याखाली लोकांना दडपण्याचा केवढा प्रयत्न केला, त्याचे उत्तर त्याविषयी उमटलेल्या प्रतिक्रियेच्या या आकडेवारीतून मिळणारे आहे. पुढाºयांना काही गोष्टी समजल्या तरी ते त्या बराच काळ मनावर घेत नाहीत. म्हणून सांगायचे, की अजून सावरा, दीड वर्षाचा कालावधी तुमच्या हाती आहे आणि जमलेच तर संघातील तुमच्या प्रचारकांनाही ते सांगा. कारण, त्यांचे अहंकार तुमच्या अहंताहून अधिक भारी आहेत.

Web Title:  Stunning statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.