विद्यार्थी संप, एफटीआयआय अभ्यासक्रमात बदल अन् नसीरुद्दीन शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 03:29 AM2019-06-11T03:29:56+5:302019-06-11T03:31:17+5:30

उत्तम लेखक, अभिनेता म्हणून ओळख असलेल्या गिरीश कर्नाड यांनी एफटीआयआयचे संचालक असताना विद्यार्थ्यांचे आंदोलन शांत केले होते़ त्याचा संदर्भ देत ‘खेळता खेळता आयुष्य’ या आत्मचरित्रावर आधारित लेख...

Student affair, change in FTII curriculum and Naseeruddin Shah | विद्यार्थी संप, एफटीआयआय अभ्यासक्रमात बदल अन् नसीरुद्दीन शाह

विद्यार्थी संप, एफटीआयआय अभ्यासक्रमात बदल अन् नसीरुद्दीन शाह

Next

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेचे संचालक असताना विद्यार्थी संपाचा अनुभव गिरीश कर्नाड यांनाही आला होता. या संपावर त्यांनी तोडगा काढलाच; पण त्यानिमित्ताने एफटीआयआयच्या अभ्यासक्रमातही बदल केला.
दिग्दर्शन आणि अभिनयाच्या विद्यार्थ्यांच्या संघर्षातून एफटीआयआयमधील हा संप झाला. दिग्दर्शनाचे विद्यार्थी डिप्लोमा चित्रपटांना अभिनयाच्या विद्यार्थ्यांना संधी द्यायचे नाहीत. बाहेरील कलाकारांना घेत असत. अभिनयाच्या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे नसीरुद्दीन शाह आणि जसपाल यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. एफटीआयआयच्या स्वायत्ततेबाबत सुरू असलेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नट-नट्यांनी उपोषण करायला सुरुवात केली. एक आठवडाभर सत्याग्रह करून बैठकीच्या शेवटच्या दिवशी सदस्यांना घेराव घातला. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अब्दुल जमाल किडवाई, हृषीकेश मुखर्जी, मृणाल सेन यांना कार्यालयातून बाहेर पडू न देता आत्ताच्या आता नियम बदलण्याची मागणी केली. संस्थेत तातडीने नियम बदलणे शक्य नव्हते. विद्यार्थी ऐकत नसल्याने पोलिसांना कळवावे लागले. मोठ्या फौजफाट्यासह पोलीस आले. संस्थेत पोलीस येणे म्हणजे विद्यार्थ्यांना आवरण्यास आपण असमर्थ असल्याचे जाणवल्याने कर्नाड मुख्य दरवाजाकडे धावले. सईद मिर्झा आणि त्यांच्यासोबतच्या इतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना आत सोडू नका, आम्ही कडे करून सदस्यांना सुरक्षितपणे बाहेरपर्यंत पोहोचवू, असे सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांतच दोन गट पडून मारामारी झाली असती. त्यामुळे कर्नाड यांनी सर्व सदस्यांना मागच्या प्रवेशद्वारातून बाहेर काढले.

यानंतरही दिग्दर्शनाचे विद्यार्थी आणि विशेष करून गिरीश कासारवळ्ळी यांनी हट्ट सुरू ठेवला. अभिनयाच्या विद्यार्थ्यांनी ‘आम्हाला दिग्दर्शक विद्यार्थ्यांच्या चित्रपटात काम मिळालेच पाहिजे; अन्यथा चित्रीकरण करून देणार नाही, असे सांगितले. दिल्लीहून नसीर आणि जसपालची हकालपट्टी करण्याचे सुचविण्यात आले. पण विद्यार्थी संस्थेत असेपर्यंत काही करणे अवघड होते. त्यामुळे कर्नाड यांनी संस्थेची बस करून विद्यार्थ्यांना मुंबईला आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवासाठी पाठविले. संस्था रिकामी झाल्याची खात्री झाल्यावर पत्रकारांना बोलावून दारे बंद करत असल्याची माहिती दिली. ‘जोपर्यंत माझे बोलणे, मी घातलेले करार पाळण्याची हमी मिळणार नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही,’ असे सांगितले. यामुळे अभिनयाचे विद्यार्थी नि:शस्त्र होऊन त्यांच्या मुठीत आले. नसीरुद्दीन शाह यानेही माझे म्हणणे बिनशर्त मान्य करीत असल्याचे पत्र दिले. मात्र, व्यवस्थेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भूमिका न्यायाचीच होती, असेही त्यांना सांगितले. यानंतर दुसºया वर्षाच्या सुरुवातीपासून कर्नाड यांनी तेथील अभ्यासक्रम बदलला. दिग्दर्शक, छायालेखन, संकलन यांचा परस्परांशी काहीही संबंध न येता त्यांचे वेगवेगळे अध्ययन करणे ही जुनी पद्धत आचरली जात होती. जगात सर्वत्र असलेली एकाच विद्यार्थ्याने सगळे विषय एकत्रितपणे शिकायची पद्धत अवलंबण्यात आली.

विद्यार्थ्याने पटकथा लिहून चित्रीकरण करायचे, संकलन करून पूर्ण करायचे. विद्यार्थ्यांनी दोन वर्षांसाठी एक समान अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि त्यानंतर आपल्याला रस वाटेल त्या विषयात पारंगत व्हायचे अशी व्यवस्था झाली. त्याला संस्थेतील सगळ्या शिक्षकवर्गाने पाठिंबा दिला. ज्यांना फक्त नट-नटी व्हायचे अशांना या व्यवस्थेत स्थान नव्हते. पण दिल्लीच्या राष्टÑीय नाट्यशाळेत भरपूर संधी असतात. त्यांना एफटीआयआयच्या डिप्लोमा फिल्ममध्ये काम करण्याची संधी मिळाली. याच काळात श्याम बेनेगल यांनी ‘निशांत’ चित्रपटात भूमिका करण्यासाठी कर्नाड यांना बोलावले होते. त्यांना यासाठी एका तरुण नटाची गरज होती. नट प्रतिभावान असावा; पण हिंदी चित्रपटात असतो तसला गोजीरवाणा नट नको, अशी त्यांची मागणी होती. संस्था सुरू झाल्यावर कर्नाड यांनी नसीरला बोलवून बेनेगल यांना भेटून यायला सांगितले. त्यांची या भूमिकेसाठी निवड झाली. या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध असणारा वैरभाव विरघळून गेला. त्यानंतर श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ चित्रपटातही नसीरला स्थान मिळाले. कलात्मक चित्रपटांत नसीरुद्दीन शाहांची कारकिर्द सुरू झाली.

(सौजन्य - राजहंस प्रकाशन)
 

Web Title: Student affair, change in FTII curriculum and Naseeruddin Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.