सुटलेलं पोट अन् खाजविणारी दाढी

By सचिन जवळकोटे on Thu, December 07, 2017 9:07am

‘व्यंगचित्रात माझं सुटलेलं पोट दाखवू नकाऽऽ’ अशी विनंती देवेंद्रपंतांनी करताच प्रमुख नेते एकत्र जमले.

‘व्यंगचित्रात माझं सुटलेलं पोट दाखवू नकाऽऽ’ अशी विनंती देवेंद्रपंतांनी करताच प्रमुख नेते एकत्र जमले. ‘व्यंगचित्रात कोणत्या नेत्याचा कोणता अवयव दाखविला जाऊ नये!’ याची चर्चा सुरू झाली. सर्वप्रथम नारायणदादांनी मागणी केली, ‘कार्टूनमध्ये माझे पाय दिसता कामा नयेत, कारण माझे पाय कधीही एका ठिकाणी स्थिर नसतात म्हणे,’ कधीकाळी ताठ मानेनं आंदोलन करणारे सदाभाऊ पंतांना अत्यंत विनम्रतेनं सांगू लागले, ‘कार्टूनमंदी माज्या पाठीचा वाकलेला मणका दिसला नाय पायजे. पंतसायेब, तेवढं तुमीच बगा कीऽऽ’ ही सदाभाऊंची आर्त स्वरातली विनंती ऐकून शेट्टींना आतल्या आत आनंदाची उकळी फुटली.

विषय हाताचा निघाला, तेव्हा अशोकराव नांदेडकरांनी आपला ‘आदर्श हात’ झटकन पाठीमागं लपवला. बाबा महाराज कऱ्हाडकरांनी मात्र हात तसाच पुढे ठेवला, तेव्हा अजितदादा पुटपुटले, ‘लकवा मारल्यानंतर हात हलणारच कसा?’ थोरले काका बारामतीकरांनी मात्र दादांच्या कॉमेंटकडं नेहमीप्रमाणं दुर्लक्ष करत सूचना केली, ‘माझी नजर तेवढी व्यंगचित्रात दाखवू नये, कारण माझी दृष्टी नेमकी कोणत्या वस्तूवर असते, हे ब्रह्मदेवालाही माहीत नसतं,’ मात्र हे सांगताना त्यांची नजर एकाचवेळी दिल्ली अन् मुंबईवर होती.

यानंतर ‘कमळ’वाले रावसाहेब सांगू लागले, ‘काहीही दाखवा, पण आमची घसरणारी जीभ तेवढी दाखवत जाऊ नका !’ या मागणीला अजितदादांनीही जोरदार पाठिंबा दिला. यानंतर साडेतीन वर्षे ओरडून बसलेला घसा खाकरत उद्धोंनी स्वत:च्या कपाळावरच्या रेषांकडं बोट दाखविलं, ‘सत्ता येऊनही आम्ही अधिकारापासून वंचितच राहतो. त्यामुळं कपाळ दाखवू नका म्हणावं.’

राज मात्र खर्ज्या आवाजात कार्टूनिस्टला धमकी देऊन माकळे झाले, ‘मराठी नेत्यांची बदनामी करणारं कार्टून काढून दाखवाच, आमच्या घरातली दगडं गायब होतील. शिशों के घरों मे रहनेवाले दुसरों पर पत्थर फेका नही करते!’ शेवटी रामदास भार्इंनी शांतपणे कविता ऐकविली, ‘माझ्या कवितांची लोकप्रियता वरचेवर वाढी... दाखवू नका हो माझी खाजविणारी दाढी ऽऽ’  

संबंधित

विश्वासाला फोड येऊ नये !
सहृदयता आणि स्वीकारार्हता
‘समृद्धी’तील अडचणींचा मार्ग खुला
आक्रित
बहुपक्षीय समतेच्या जुळणीकडे...

संपादकीय कडून आणखी

२४ जुलै १९४३ सांगलीच्या क्रांतिकारकांच्या उडीचा अमृतमहोत्सव! - रविवार विशेष - जागर
खडसेंची सरशी
मराठवाडा हिरवाकंच होणार
सार्वजनिक वाहतुकीचे मारेकरी
सरकार व विरोधक दोघांनाही अविश्वास प्रस्तावाचा लाभ

आणखी वाचा