Stay alive; That junk Delhi ..? | रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला..?

टू बी आॅर नॉट टू बी...
रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?
हा एकच सवाल आहे...
प्रश्न बिकट आहे... सुटतही नाही...
आणि सोडवताही येत नाही...
या अस्वस्थ वातावरणात,
कसं समजावून विचारावं पोरांना की,
बाबांनो, तुम्ही गप्प राहण्याचं काय घ्याल...?
त्यांच्या वेळी अवेळी बोलण्यापायीच
झालेल्या नुकसानीचा हिशेब तरी
किती वेळा मांडावा, त्याच त्या कागदांवर...?
यांच्या अशा हट्टापायी काय काय गमावले,
याचा तरी कितीवार पाढा वाचावा...
रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?
हा एकच सवाल आहे...
टू बी आॅर नॉट टू बी...
गप्प गुमान घ्यावी अंगावर
खासदारकीची झुल पांघरुन...
आणि निवांत बसावं दिल्लीच्या
उबदार थंडीत... आयुष्याचे हिशेब मांडत...
की फेकून द्यावं
हे खासदारकीचं बेगडी ओझं...
त्यात गुंडाळलेल्या अनेकानेक आमिषांसह..!
राज्य मोठं की देश...?
कोकण मोठा की महाराष्टÑ....?
या प्रश्नांच्या खोल डोहात
फेकून द्यावं विचारांचं लक्तर...
त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह...
आणि करावा एकदाच काय तो शेवट...
एकाच प्रहारानं... सगळ्यांचा...
रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?
हा एकच सवाल आहे...
टू बी आॅर नॉट टू बी...
माझ्या, याच्या, त्याच्या, सगळ्यांच्या...
स्वाभिमानाला असा कुणी डंख मारावा
आणि मी हताशपणे पहात रहावं...
काहीच करता न येणाºया अभिमन्यूसारखं
की शरपंजरी झालेल्या भीष्मासारखं...
नसावा कोणताच किनारा
माझ्या स्वप्नांना आणि त्या निद्रेलाही..?
पुन्हा स्वप्न पडू लागलं तर,
तर-तर इथचं मेख आहे.
नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात
प्रवेश करण्याचा धीरही होत नाही
आणि शांतही बसवत नाही आताशा...
किती दिवसं हे जुने जागेपण
सहन करतोय निर्जीवपणाने
स्वाभिमानावर होणारे अत्याचार
अस्तित्वाच्या गाभाºयात असलेल्या
माझ्यातील सत्त्वाची परीक्षा किती घेणार..?
हे करुणाकरा... हे विधात्या...
आमच्याच विरोधकांच्या दाराशी
मला असा एकट्यालाच आणून सोडलय तू, विधात्या, तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला, आम्ही ज्यांच्या सोबत राहिलो
ते वांद्र्याचे सख्खे अस्तित्वावरच उठले...
आणि आम्हाला विसरुन गेले...
तर दुसºया बाजूला,
ज्यांनी आम्हाला शब्द दिला,
ज्यांच्या शब्दाखातर आम्ही
नंतरचा घरोबाही सोडून आलो,
ते ही विसरुन गेले आहेत सगळं काही...
हे करुणाकरा, आम्ही चार पाच जण,
कोणता झेंडा घेऊ हाती...?
हा सवाल तरी किती वेळा विचारायचा
स्वत:च्याच मनाला...
रहावं इथचं झुंज देत; की जावं दिल्लीला...?
हा एकच सवाल आहे...
टू बी आॅर नॉट टू बी...
 


Web Title:  Stay alive; That junk Delhi ..?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.