आध्यात्म - दीपावली

By लोकमत न्यूज नेटवर्क on Mon, October 16, 2017 12:16am

दीपावली हा खरा शब्द. आवली म्हणजे रांग, ओळ दिव्यांची आवली, रांग म्हणजे दीपावली म्हणून घरभर दिवे लावायचे. दिव्यांनी घर सजवून टाकायचे. म्हणजेच घर उजळायचे, उजळून टाकायचे.

- किशोर पाठक दीपावली हा खरा शब्द. आवली म्हणजे रांग, ओळ दिव्यांची आवली, रांग म्हणजे दीपावली म्हणून घरभर दिवे लावायचे. दिव्यांनी घर सजवून टाकायचे. म्हणजेच घर उजळायचे, उजळून टाकायचे. सूर्ये अधिष्ठिली प्राची क जगा राणीव दे प्रकाशाची कक ही ज्ञानदेवांची दिवाळी. त्यांचे सूर्याचे नातेबंध फार तीव्र होते. म्हणून प्रत्येक दिव्यात त्यांना सूर्य दिसतो. तिमिरातून तेजाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे दीपावली. बघा गोरगरीब, श्रीमंत कुणीही दिवा लावतो, फटाके फोडतो. आता बरेच जण फटाक्यांचे आवाज कमी व्हावेत हे म्हणतात. खरोखर आसपासच्या आवाजांना घाबरणारी मुलं आणि म्हातारे यांना सांभाळा. एखाद्या वृद्धाला चकली कुटून द्या. तुम्ही म्हणाल काय हा खाण्याचा सोस, पण तोही हवा. जगण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्फुल्लं जगायला हवे. दिव्यांच्या तेजावर कविता लिहायला हवी. तूच तुझा दिवा हो. ‘अत्त दीप भव’चा अर्थ हाच म्हणजे संत आपल्याला बाहेरून आत डोकावयाला लावतात. आत म्हणजे हृदयात आत खूप काही घडते आहे. प्रकाशाची रांगोळी आपण बघू शकतो. एरवी कळकट चेहरे प्रकाशमान होतात. या दिवाळीत आपण काही नियम करायला हवा. अगदी वसुबारसपासून धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असा पाचच दिवसांचा खेळ, पण तो सर्वांना हवा हवा वाटतो. फराळाचे वेगवेगळे पदार्थ बनविणे आणि खाऊ घालण्यात मोठ्ठा आनंद आहे. हा आनंद प्रत्येकाला मिळायला हवा. प्रत्येक माणूस या आनंदात सहभागी व्हायला हवा. मग पाड्यावर जा आपली एक करंजी तिथे द्या, वेगळ्या वस्तीवस्तीत पदार्थांच्या रूपाने आनंद वाटा. काही नाही तर आपुलकीने त्याच्या खांद्यावर हात ठेवा आणि म्हणा हे नूतन वर्ष तुला भरपूर आनंदाचे जावो हा निसर्ग तुला कायम ताजातवाना ठेवो तू स्वत: तर आनंदी राहाच पण इतरांना आनंदी कर हे कौतुक प्रत्येक डोळ्यात दिसायला हवं. आपण माणसाला माणूस म्हणून घडवू या समाजातले भेद, कलह, तंटे कमी व्हायला हवेत. ते पूर्ण बंद होणार नाहीत. कारण कायम छिद्रे पाहणारी माणसे समाजात असतातच. त्यांची ती वृत्ती कमी होवो. पणतीचा मंद प्रकाश त्यांच्या अंतरात उजळो. पणतीला माहीत कधीतरी तेल संपणार, पण तरीही ती शेवटच्या थेंबापर्यंत प्रकाश देते. तसे आपण शेवटच्या श्वासापर्यंत आनंद वाटू या, प्रकाश वाटू या, शुभ दीपावली !

संबंधित

जगा पोटभर....आपल्या शरीराचंच भरणपोषण नसेल तर आपल्या मनाचं काय पोषण होणार?
सेलिब्रेशन...ही चार दिवसांची आतषबाजी, रोषणाई तर आहेच
तिमिर जावो!
लाऊडस्पीकरवर होणा-या अजानवर गप्प का आहेत सेक्युलर ? फटाकेबंदीवरुन संतापले त्रिपुराचे राज्यपाल 
जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे 'दिवाळी पहाट'चा कार्यक्रम

संपादकीय कडून आणखी

धम्म संस्कृती जपण्याचा खरा अर्थ
अकबर यांची गच्छंती!
धारावी पुनर्विकासाचा ‘काला’ इतिहास
गोव्यातील भाजपा काँग्रेसचीच प्रतिकृती
प्रार्थिल्यावाचोनि आलासी का...

आणखी वाचा