सूर्यावर थुंकण्याचा वेडसरपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:46 AM2017-12-19T00:46:34+5:302017-12-19T06:35:31+5:30

१९७५च्या आणीबाणीत कुणा भुक्कड सत्ताधा-याने लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना तो देशभक्त नेता म्हणाला ‘मी देशद्रोही असेल तर या देशात कुणीही देशभक्त असणार नाही’. जयप्रकाशांच्या या उद्गारांची आठवण आज येण्याचे कारण नरेंद्र मोदींनी नेमका तसाच आरोप डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केला आहे.

 The spatiness to spit on the sun | सूर्यावर थुंकण्याचा वेडसरपणा

सूर्यावर थुंकण्याचा वेडसरपणा

Next

१९७५च्या आणीबाणीत कुणा भुक्कड सत्ताधा-याने लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना तो देशभक्त नेता म्हणाला ‘मी देशद्रोही असेल तर या देशात कुणीही देशभक्त असणार नाही’. जयप्रकाशांच्या या उद्गारांची आठवण आज येण्याचे कारण नरेंद्र मोदींनी नेमका तसाच आरोप डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केला आहे. पाकिस्तानचे एक निवृत्त सेनाप्रमुख जन. कसुरी यांची भेट घेऊन पाकिस्तान सरकारने गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करावा व अहमद पटेल या काँग्रेस नेत्याला त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर आणावे असे विनविल्याचे मोदी म्हणाले. मोदींच्या भगतांनी जराही शहानिशा न करता त्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळून त्याचे तात्काळ घोषगीतही केले. या दुय्यम गायकात अरुण जेटलींसारख्या अर्थमंत्र्यानेही आपले कायदेपांडित्य गहाण टाकून आपला आवाज मिसळला. डॉ. मनमोहनसिंग यांचे चरित्र व चारित्र्य गेली ४० वर्षे देशाला चांगले ज्ञात आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद अवघा एक रुपया पगार घेऊन सांभाळणारे त्यागी पदाधिकारी, देशाच्या अर्थव्यवस्थेला नवे व उर्ध्वगामी वळण देणारे दूरदृष्टीचे अर्थसचिव, पी.व्ही. नरसिंहरावांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशाचे आर्थिक नेतृत्व करून त्याच्या विकासाचा दर ९ टक्क्यांच्या पुढे नेणारे अर्थतज्ज्ञ आणि काँग्रेस पक्ष व संयुक्त पुरोगामी आघाडीने एकमुखाने देऊ केलेले पंतप्रधानपद नाकारणा-या सोनिया गांधींच्या शब्दाचा आदर करून देशाचे पंतप्रधानपद दहा वर्षे सांभाळणारे व त्याला विकासाच्या नव्या वाटा व उदारीकरणाचा मंत्र देणारे नेते हा त्यांचा प्रवास देशातीलच नव्हे तर जगातील सगळ्या जाणकारांना नतमस्तक करणारा आहे. या सबंध काळात त्यांच्यावर कुणी कोणता आरोप करू शकले नाही. आरोप करणाराच ज्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या तेजामुळे बदनाम होईल असे लखलखीत चारित्र्य घेऊन मनमोहनसिंग जगले. असा नेता देशाच्या एका राज्याचे मुख्यमंत्रिपद आपल्या पक्षातील कुणा एकाला मिळावे म्हणून पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राशी बोलणी करतो हा आरोपच बेशरमपणाचा कळस सांगणारा आहे. चीनचे हुकूमशहा शी झिनपिंग भारतात आले तेव्हा त्यांनी साबरमतीला जाऊन चरख्यावर सूत कातले आणि मोदींनी केलेल्या पाहुणचारातला ढोकळाही तेथे खाल्ला. रशियाच्या दौ-याहून परत येताना याच नरेंद्र मोदींनी वाकडी वाट करून पाकिस्तान गाठले आणि त्या देशाचे पंतप्रधान नवाब शरीफ यांच्या घरच्या लग्नाच्या मेजवानीत पाहुणचार घेतला. या भेटी नुसत्याच खासगी नव्हत्या. त्यांना राजकीय बाजूही होत्या. त्यांचा गाजावाजाही मोठा केला गेला. मात्र त्या काळात मोदींनी शत्रूंशी हातमिळवणी केली असे म्हणण्याचे पाप कुणी केले नाही. देशाचा पंतप्रधान हा त्याचा नुसता हितरक्षकच नसतो, तो त्याचा संरक्षकही असतो. मोदींबाबत मनमोहनसिंगांसह त्यांच्या पक्षाने दाखविलेली ही प्रगल्भता व स्वच्छ दृष्टी मोदींना दाखविता न येणे हा सरळ वृत्ती आणि कृतघ्न बुद्धी यातील फरक आहे. राजकारणात स्वच्छता राखण्याची सहज साधी सवय आणि राजकारणासाठी काहीही करण्याची हीनवृत्ती यातलाही तो फरक आहे. मोदींचे हे वाचाळपण सा-यांनी हसण्यावारी नेले असले तरी त्याने मनमोहनसिंगांच्या मनावर केलेली जखम मोठी आहे. ‘तसल्या’ आरोपासाठी मोदींनी माझी नव्हे तर देशाची माफी मागावी असे संतप्त उद्गार त्यांनी काढले आहेत. एरवी कधीही न रागावणारे डॉ. सिंग यांचा अशा आरोपाने संताप उडाला असेल तर तो स्वाभाविकही म्हटला पाहिजे. कारण मोदींच्या त्या बाष्कळ आरोपाने देशातील जाणकारांचा मोठा वर्गही खोलवर दुखावला गेला आहे. वास्तव हे की डॉ. मनमोहनसिंग आणि कसुरी यांची भेट परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार झाली होती. तिला देशाचे तत्कालिन सेनाप्रमुख दीपक कपूर, परराष्ट्र मंत्री के.नटवरसिंग व परराष्ट्र खात्याचे अनेक वरिष्ठ अधिकारी हजर होते. पाकिस्तानात भारताचे उपउच्चायुक्त राहिलेले मणिशंकर अय्यरही यावेळी उपस्थित होते. ही बोलणी सुरक्षाविषयक व पाकिस्तानने सीमेवर चालविलेल्या कारवाया रोखण्यासंबंधी होती. गुजरातच्या निवडणुका तेव्हा आसपासही नव्हत्या. त्यांची घोषणा नव्हती आणि कोणत्याही पक्षाने त्या निवडणुकीच्या तयारीला आरंभही केला नव्हता. या स्थितीत डॉ. मनमोहनसिंगांनी पाकिस्तानला गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मदत मागितली असा आरोप करणे हे सडकछापपणालाही लाज आणणारे आणि तो करणा-या इसमाला पंतप्रधान पदाची आब राखता येत नाही हेही सांगणारे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने त्यांना मदत केली असा आरोप आज त्यांच्यावर होत आहे. ट्रम्प यांचे व्यक्तिमत्त्व एवढे वादग्रस्त आहे की त्यांच्यावर होत असलेला हा आरोप त्यांच्याच देशाला आता खरा वाटू लागला आहे. मनमोहनसिंग हे ट्रम्प नाहीत. कोणत्याही परदेशी प्रवृत्तीला भारतीय राजकारणात हस्तक्षेप करू द्यायला ते तयार होतील या आरोपावर त्यांचा शत्रूही कधी विश्वास ठेवणार नाही. मोदींनी तसे करून स्वत:एवढीच देशाचीही प्रतिष्ठा घालविली आहे.
-सुरेश द्वादशीवार
(संपादक, नागपूर)

 

Web Title:  The spatiness to spit on the sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.