देशातली उत्तरेकडची राज्ये जेवढी भ्रष्ट तेवढीच दक्षिणेतील राज्येही भ्रष्टाचाराने लिप्त आहेत. त्यातल्या काहींची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीला आली तर काहींची अजून पुरती यायची आहेत, एवढेच. जयललिता, शशिकला आणि त्यांचे पुतणे दिनकरन यांनी तामिळनाडूचे नाव यासंदर्भात सर्वतोमुखी करून दक्षिण भारताच्या इतिहासाला एक काळेकुट्ट पानच स्वतंत्रपणे जोडले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत जयललितांच्या बंगल्यावर व अनेक निवासांवर आर्थिक नियंत्रण विभागाने घातलेल्या धाडीत कोट्यवधींची बेहिशेबी रोकड मिळाली. हजारो साड्या आणि हजारोंच्या संख्येने पादत्राणे, दागिन्यांचे मोठे साठे आणि त्याखेरीज त्यांनी खरेदी केलेली घरे व जमिनी यांचाही मोठा तपशील हाती आला. त्या साऱ्या किटाळातून जयललिता कशा सुटल्या याची रोचक कहाणी अजून गुलदस्त्यात राहिली आहे. त्यांच्याच सहकारी व त्यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचा ध्यास घेतलेल्या शशिकला तशाच आरोपापायी आता कर्नाटकच्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावरचे आरोपही जयललिता यांच्यावरील आरोपांवर ताण करणारे आणि एवढ्या साध्या दिसणाऱ्या बाई देशाच्या व जनतेच्या केवढ्या मोठ्या संपत्तीचा अपहार करू शकतात हे सांगणारी आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राजकारण करणारे त्यांचे पुतणे दिनकरन यांनी प्रत्यक्ष निवडणूक आयोगालाच ६० कोटी रुपयांची लाच, आपल्या पक्षाला ‘दोन पाने’ हे जयललितांच्या अण्णाद्रमुक या पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी देऊ केल्याचे उघड होऊन तो सत्पुरुषही आता तुरुंगाच्या वाटेवर आहे. तिकडच्या करुणानिधींचा द्रमुक हा पक्षही या प्रकारात मागे नाही. ए.राजा या त्याच्या मंत्र्याने व कणिमोळी या करुणानिधींच्या कन्येने किती हजार कोटींचा भ्रष्टाचार त्यांच्या सत्ताकाळात केला हेही जगजाहीर आहे. या दोन्ही पक्षांतील भ्रष्टाचार शिरोमणींना तामिळनाडूची साक्षर जनता नेतेपदी का निवडते आणि त्यांच्यातील काहींना पार दैवतांचा दर्जा कशी देते, हा मानसशास्त्रीय संशोधनाचा विषय ठरावा असा आहे. शशिकला व दिनकरन यांची अशी वाट लागल्यानंतर आणि जयललिता यांना त्यांच्या मृत्यूमुळे शिक्षा करता येत नाही हे निश्चित झाल्यानंतर अण्णाद्रमुक या पक्षाच्या, शशिकला व पनीरसेल्वम या दोन शकलांचे एकीकरण करण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. राजकीय एकीकरणासाठी प्रयत्न करणारे हे गट पक्षाच्या शुद्धीकरणासाठी कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत हे येथे लक्षात घ्यायचे आहे. भ्रष्ट असो वा तुरुंगवास, तो आपल्याजवळ येण्याने आपली ताकद वाढत असेल तर त्याचे स्वागत करायचे हा कित्ता आता देशाच्या राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षांनीही गिरविणे सुरू केले आहे. परिणामी भ्रष्टाचार आहे आणि तो खपवून घेतला जात आहे, तोवर जयललिता, शशिकला किंवा दिनकरन यांना आणि ए. राजापासून कणिमोळींपर्यंतच्या कुणालाही राजकीय मरण नाही, हे उघड आहे. पंजाबचे बादल पितापुत्र, उत्तर प्रदेशचे मुलायमसिंह पुत्र, पौत्र, बंधू, जावई व इतर आणि बिहारचे लालूप्रसाद या भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्यांनाही या देशात तसे राजकीय मरण आले नव्हते. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर, उमा भारती, कल्याणसिंह आणि ऋतुंभरा इत्यादींनाही त्यांच्यावरील राजकीय, सामाजिक व धार्मिक अपराधांपासून मुक्तता आहे. खुनापासून खंडणीखोरीपर्यंतचे आरोप डोक्यावर असणारी माणसे ज्या देशात राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षपदी येतात, तेथे याहून काही वेगळे व्हायचेही नसते. बंगालमधील सारदा घोटाळा, मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळा, महाराष्ट्रातील खडसे घोटाळा किंवा केंद्र व राजस्थानातील ललित मोदी घोटाळा या साऱ्यांचीच या संदर्भात नोंद घ्यावी लागणार आहे. दक्षिणेतील राजकारणात नेतृत्वाविषयीचा भक्तिभाव आहे. तो थेट पेरियर रामस्वामींपासून अण्णादुरार्इंपर्यंत आणि एम.जी.आर.यांच्यापासून करुणानिधींपर्यंत साऱ्यांच्या वाट्याला आला आहे. ही राजकीय अंधश्रद्धा जोवर संपत नाही, तोवर दक्षिणेतल्या भ्रष्टाचाराचाही शेवट होणार नाही. कायदे लागले, बेड्या पडल्या आणि गजाआड राहूनही आसारामबापूंना त्यांचा शिष्यगण जसा सोडत नाही तोच या पुढाऱ्यांच्या राजकारणातल्या भाग्यशाली असण्याचा प्रकार आहे. शशिकला तुरुंगात आणि दिनकरन तुरुंगाच्या वाटेवर असताना त्या दोघांना व त्यांच्या कुटुंबातील साऱ्यांना पक्षाबाहेर काढाल, तरच अण्णाद्रमुक या पक्षात
ऐक्य घडून येईल अशी भूमिका त्याच्या दुसऱ्या शकलाचे नेते पनीरसेल्वम यांनी घेतली असल्याने काही
काळ त्या राज्यात एक अस्थिरता राहणार आहे. मात्र भ्रष्टाचार व त्यातून आलेला पैसा हे साऱ्यांना जोडणारे जगातले सर्वात मजबूत सिमेंट आहे. त्याचा परिणाम व चमत्कार येत्या काही दिवसात तामिळनाडूमध्ये दिसेल याविषयी कुणाच्या मनात शंका राहू नये. मात्र हा सारा लोकशाहीला लावला जाणारा कलंक आहे हेही त्या राजवटीतल्या कुणी विसरण्याचे कारण नाही. जयललिता, शशिकला आणि दिनकरन यांच्या तीन धड्यांनंतर तरी दक्षिणेला राजकीय शुद्धतेचे भान यावे ही अपेक्षा.