Solapur lok sabha election | कपबशी खळखळली.. ..हातही थरथरला !
कपबशी खळखळली.. ..हातही थरथरला !

 

- सचिन जवळकोटे

सोलापूरच्या रणांगणात ‘अगा जे नवलचि’ घडले. गेल्यावेळी ‘मोदी लाट’ होती; तरीही यंदा मतदानाचा टक्का वाढला. पुण्या-मुंबईची चाकरमानी मंडळी ‘गाड्या भरभरून’ आपापल्या गावी आली. ‘भरभरून मतदान’ करून पुन्हा परतली. ध्यानी-मनी नसताना खेडोपाडी ‘कपबशी’ खळखळली. हे लक्षात येताच ‘हात’ थरथरला. ‘कमळ’ही केवळ आपल्या पाकळ्या जपण्यातच रमलं.


राजवाड्यात विरोधकांचे पोलिंग एजंटही नव्हते..

एखादी निवडणूक भावनिक बनली तर काय होऊ शकतं, याचं चित्र ‘शहर उत्तर’मध्ये स्पष्टपणे दिसलं. आजपावेतो एकमेकांचं तोंडही न पाहणारी मंडळी बुधवारपेठेत हातात हात घालून कामाला लागली. थोरल्या राजवाड्यापासून ते धाकट्या राजवाड्यापर्यंत अशीच परिस्थिती राहिली. बुधवारपेठ परिसरातल्या काही मतदान केंद्रांवर तर म्हणे विरोधकांचे पोलिंग एजंटही दिसत नव्हते, इतकी एकी ‘वंचित’वाल्यांनी करून ठेवली होती.


‘शहर उत्तर’ म्हणजे आपल्या कसब्यातला जुना वाडाच, असं वर्षानुवर्षे समजत आलेल्या देशमुखांच्या मानसिकतेला हा अनुभव सर्वाधिक धक्का देणारा ठरला. त्यामुळं राजवाड्याचा नाद सोडून ‘कमळ’वाल्यांनी आपली परंपरागत मतं जपण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. तरी बरं, ‘साधू संत येती घराऽऽ तोचि दिवाळी दसरा,’ समजणारी मंडळी शेळगीत जास्त असल्यानं गौडगावच्या महाराजांची चलती इथं स्पष्टपणे दिसून आली. राहता राहिला विषय ‘हाता’चा. त्यांची चर्चा ‘शहर मध्य’मध्ये केली, तर अधिक उत्तम.


पोट्टे के डोस्के में
हैैदराबादच बैैठेला..

  ‘शहर मध्य’मध्ये ‘विजापूर वेशी’पासून ‘नई जिंदगी’पर्यंत जागोजागी ‘अपना हात’ दिसून आला; मात्र ‘हमरे जवाँ पोट्टे के डोस्के में हैदराबादच बैठेला है वोऽऽ’ असं एखादी ‘खाला’ आपल्या शेजारणीला मतदानावेळी सांगून जायची, तेव्हा इथला ‘तरुण मोहल्ला’ सरळ-सरळ ‘कपबशी’तून चहा पिण्यात रमलाय, हे स्पष्ट होऊन जायचं. त्याचबरोबर ‘बाबांचं रक्त’ हा ‘इमोशनल टच’ डॉयलॉग ‘कुमठा नाक्यापासून सेटलमेंट वस्ती’पर्यंत जोरदार ‘व्हायरल’ झालेला. मात्र इतर काही ठिकाणी ‘प्रणितीतार्इं’चं कामच ‘प्लस’मध्ये गेलेलं.


  ‘विडी घरकूल’ परिसरातला हा एक संवाद. बटन दाबून परतणाºया एका वृद्धेला ओळखीच्या कार्यकर्त्यानं सहज विचारलं, ‘काय कुणाला.. मास्तरांनी सांगितलं त्यांनाच का ?’ ती बाईही प्रांजळपणे अगदी सहज बोलून गेली, ‘नाही.. तुम्हाला कुणाला टाकायचं ते टाका, असं मास्तरच म्हणालेत, म्हणून आम्ही संमदे पूऽऽल पूऽऽल’.. आता पूर्वभागात ‘फ’चा उच्चार ‘प’ असा केला जातो, हे ज्यांना ठावूक त्यांनाच इकडचा ‘ट्रेंड’ही कळून चुकला.
 
शेवटची निवडणूक’
जुन्या पिढीसाठी टची

  सोलापूर शहरात काही का होईना ‘दक्षिण’ तालुक्यात मात्र ‘जाई-जुई’ फार्मची आपुलकी टिकून राहिल्याचं काही ठिकाणी स्पष्ट झालं. ‘ही शेवटचीच निवडणूक’ या भावनिक वाक्याचाही जुन्या-जाणत्या पिढीवर खोलवर परिणाम झालेला. असं असलं तरी ‘वंचित’वाल्यांनी ‘देवकतेंचं राजकीय करिअर कुणी उद्ध्वस्त केलं ?’ हा मुद्दा खासगीत अनेक वाड्या-वस्त्यांवर चर्चिलेला. त्यामुळं शेवटच्या दोन दिवसांत ‘धनगरवाड्याचा ढोल’ वाजवूनही सुशीलकुमारांना अपेक्षित असलेली साथ ‘दक्षिण’मधून न मिळालेलीच. त्यात पुन्हा गेल्या पाच वर्षांत सुभाषबापूंनी गावोगावी केलेल्या कामांचा इम्पॅक्ट मतदानावेळी स्पष्टपणे जाणवला. शहरालगतच्या हद्दवाढ भागानंही नेहमीची परंपरा जपली. नेहरूनगरची ‘याडी’ मात्र वर्षानुवर्षांची ‘हाताची आपुलकी’ विसरली नाही. 


मुंबई-पुण्याकडच्या 
मंडळींची गावी ‘ट्रीप’

अक्कलकोट तालुक्यातून दुसºयांदा खासदार पाठविण्याची संधी इथली मंडळी थोडीच सोडणार ? विशेष म्हणजे, या भगव्या लाटेला विरोध करण्याचा प्रयत्नही कुणी जास्त न केलेला. ‘दुधनी’चे ‘शंकरण्णा’ सोडले तर बाकीचे महाराजांबद्दल अवाक्षरही बोलायला तयार नव्हते.. कारण पुढच्या विधानसभेला याच ‘महाराजांचे आशीर्वाद’ कामी येऊ शकतात, एवढी चर्चा ‘लक्ष्मी निवास’वर झालेली.. तरीही ‘दुधनी’त लीड ‘हाता’लाच. बाकी ठिकाणी मात्र ‘वत्त व्हडी हुव्वाऽऽ’... म्हणजे ‘होऊन जाऊ दे फूलऽऽ’
असं असलं तरीही या तालुक्यात पुण्या-मुंबईची मंडळी स्वत:च्या खर्चानं गावी येऊन ‘फॅमिली पॅक’ बटन दाबून गेली. ज्या वस्त्यांवर पूर्वी गाड्या पाठविल्याशिवाय घरांची दारंही म्हणे उघडली जात नव्हती, तिथं स्वत:च्या खिशाला झळ सोसून ‘कपबशी’तला चहा एकमेकांना पाजण्यात बहुतांश मंडळी रमली. 

कमळाला ‘समाधान’;
‘गोपीचंद’मुळे फुटला घाम

पंढरपूर अन् मंगळवेढ्यात मात्र चित्र विरोधाभासाचं. पंढरपूर शहरात घाटांच्या साक्षीनं गल्लीबोळात ‘कमळं’ उगवली. ‘पंतांनी दिलेला शब्द पंतांनी पाळला’ असला तरी खेडोपाडी ‘भारतनानां’चा संघर्ष थोडाफार का होईना कामी आलेला. मात्र पंढरपूर तालुका सांभाळण्याच्या नादात मंगळवेढा थोडाबहुत ‘हाता’तून निसटला.


‘आवताडें’चं पक्षांतरही मंगळवेढ्यात शेवटच्या क्षणी ‘कमळा’ला ‘समाधान’ देणारं ठरलं. ‘भीमा’काठची गावंही भगव्या वस्त्रांना जागली. दक्षिणेकडचा भाग मात्र ‘भारतनानां’च्या शब्दाखातर ‘हाता’सोबत राहिला. मात्र पश्चिम भागात ‘गोपीचंद’च्या आक्रमक भाषणबाजीमुळे वाड्या-वस्त्यांवर विभागणी झाली. अंगणातल्या मेंढीचं ताजं दूध पहिल्यांदाच ‘कपबशी’तून पिताना म्हणे अनेकांना आवडलं. मात्र याचा फटका पुन्हा एकदा ‘हाता’लाच बसला. मंगळवेढ्यातून मिळणारं अपेक्षित लीड या ठिकाणी कमी झालं. खरंतर, सुशीलकुमारांनी शेवटपर्यंत मोठ्या जिद्दीनं याच तालुक्यावर जास्तीत-जास्त भर दिलेला.

मग कसं.. मालक म्हणतील तसं; पण..

‘अक्कलकोट, दक्षिण अन् शहर उत्तर’ची घोडदौड थोपविण्यासाठी ‘हाता’ला साथ दिली मोहोळच्या राजन मालकांनी. यंदाही सर्वाधिक मतदान याच मतदारसंघात. याचा फायदा सुशीलकुमारांनाच. ‘बारामतीकरां’ना दिलेला शब्द ‘मालकां’नी पाळला. यापूर्वी केलेली चूक सोलापूरच्या सुपुत्रांनीही दुरुस्त केलेली. मोहोळच्या ‘त्या’ जुन्या प्रकरणात तेव्हा ‘बाळराजें’ना म्हणावी तशी मदत न करू शकल्याची भरपाई कदाचित सुपुत्रांनी इथं भरून काढलेली.


  खंडोबाचीवाडीत ‘बाळराजें’च्या कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला झाल्याचं कळताच ते स्वत: पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेले. खरंतर, अनगर पट्ट्यात बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांचंही काल चुकलंच. मतदान केंद्राच्या आवारात फिरणाºया मालकांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा भंग केला, याचा नवा साक्षात्कार बाहेरून आलेल्या ‘खाकी’ला पहिल्यांदाच झाला.. कारण गेली कैक दशके इथं अशीच परंपरा चालत आलेली. 


तरी मोहोळ तालुक्यातल्या लोकांचं नशीब समजा... आजकाल थोडीफार का होईना ही मंडळी ‘लोकशाही’ मानण्याच्या मूडमध्ये येऊ लागलीत. नाहीतर पूर्वीचे किस्से एक से एक. पूर्वी आवारात तर सोडाच.. म्हणे थेट आत केंद्रातच वावरऽऽ. असो. बाकी कुरुल अन् कामती पट्ट्यात दुपारनंतर भगव्याचा थोडाफार गवगवा झालाच. आष्टी परिसरातही ‘कमळा’साठी ‘दुरून डोंगर साजरे’ अशी परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. 


या तालुक्यामध्ये शेवटच्या टप्प्यात राजन मालकांनी अख्खी प्रचार यंत्रणा स्वत:च्याच ताब्यात घेतल्यानं इथले मूळचे ‘हात’वाले मात्र दूरच राहिले. या जुन्या कार्यकर्त्यांपर्यंत सोलापुरातून ‘रसद’ही पोहोचली नाही. उलट हीच ‘रसद’ म्हणे मोहोळमध्ये अनेकांना ‘जय महाराष्टÑ’ म्हणत हळूच भेटून गेली. त्यामुळं इथलं ‘भगवं उपरणं’ही बाहेर कुठं जास्त प्रचारात दिसलंच नाही... नाहीतरी या मंडळींना ‘कमळ’वाल्यांनी गिनलंच कुठं होतं म्हणा?


या साºया निष्कर्षातून कोणताही निकाल स्पष्ट होत नसला तरी अंदाज बांधला जाऊ शकतो. ज्यानं-त्यानं आपापल्या दृष्टिकोनातून निकाल समजून घ्यावा.


- सचिन जवळकोटे

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)


Web Title: Solapur lok sabha election
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.