सोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:27 AM2019-01-24T04:27:34+5:302019-01-24T04:27:43+5:30

१९९० च्या दशकापासून इंटरनेट आणि सन २००० नंतर सोशल मीडिया व स्मार्टफोनचा प्रचंड प्रसार झाल्यामुळे, बातम्या पसरविणे फारच सोपे झाले आहे.

Social media; New means of measuring political power | सोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन

सोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन

Next

- डॉ. दीपक शिकारपूर 
१९९० च्या दशकापासून इंटरनेट आणि सन २००० नंतर सोशल मीडिया व स्मार्टफोनचा प्रचंड प्रसार झाल्यामुळे, बातम्या पसरविणे फारच सोपे झाले आहे. स्मार्टफोनमधील सोशल संवादमाध्यमे, टीव्ही/वृत्तपत्रे इ. पेक्षा सहज प्राप्त होणारी, कमी खर्चाची आणि हाताळायला सोपी असल्याने, जगभरातील अधिकाधिक स्मार्टफोनधारक बातम्या मिळविण्यासाठी त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. सोशल मीडियाचा राजकारण आणि राजकारण्यांशी दररोजचाच संबंध असला, तरी निवडणुका जाहीर झाल्या की, त्याचा खरा चेहरा आणि परिणाम जाणवतो. सतत बदलत्या राजकारणाला समजून घेताना सोशल मीडियाला वगळून पुढे जाता येत नाही.
सोशल मीडिया हाताळणारी कोणीही व्यक्ती जगाच्या एखाद्या कोपऱ्यात बसून काहीही पोस्ट लिहून फक्त काही मिनिटांतच जगप्रसिद्ध होऊ शकते... या माध्यमातून फार लवकर आपलेपण साधता येते; तितकीच पटकन कटुतादेखील हे माध्यम निर्माण करू शकते. हे माध्यम जेवढे ज्ञान देते, तेवढेच अज्ञान पेरते. या माध्यमाने माणसांचे आपलेपण तपासण्याची नवी पद्धत जन्माला घातलेली आहे. पूर्वी गाव, तालुका, जिल्हा किंवा जातीवरून स्नेहबंध लावण्याचा प्रयत्न केला जात होता. आता फेसबुकच्या म्युच्युअल फ्रेंडलिस्टवरून नातीगोती ठरतात. समज अन गैरसमज शीघ्र गतीने वाढविण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे. कुठल्याही संस्थेचे वा सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नसलेले हे माध्यम आहे. एका बाजूने हे माध्यम व्यक्तिगत आहे आणि समूहाचेही आहे. दुसºया बाजूने नियंत्रणअभावी हे माध्यम कुणाचेच नाही. त्यामुळेच या माध्यमाची विश्वासार्हता संशयास्पद आहे .
हे माध्यम संपर्कात राहण्यासाठी सोपे सुटसुटीत आहे. कुठेही बसून फोन वा तत्सम उपकरणाद्वारे या माध्यमामुळे नेता अन् कार्यकर्ता यात संवाद घडू शकतो. सोशल मीडियावर असलेले मित्र अन फॉलोअर्स ही आजच्या नेत्याची राजकीय शक्ती मोजण्याचे एक नवीन साधन झाले आहे. या माध्यमावर बरेचदा अनेक लोक एकमेकांशी एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलेले असतात. त्यामुळे हे माध्यम माणसांना संख्यात्मक बाजूने एकत्र करत असले, तरी त्यात सत्यता मात्र फारशी नाही. हे माध्यम कल निर्माण करण्यात कमालीचे यशस्वी झालेले आहे, पण या माध्यमावर एकाच वेळी परस्परविरोधी कलही निर्माण होत असतात. त्यामुळे या माध्यमाने जन्माला घातलेले अन् वाढविलेले पक्ष असोत वा नेते, त्यांची विश्वासार्हता ही संशयास्पद असते.
आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात वर्तमानात रमते. तिला इतिहास महत्त्वाचा वाटत नाही. कारण वर्तमान आपल्या हातात असतो. इतिहास नाकारणाºया काळाचे आव्हान आपल्या समोर आहे. ते आव्हान वाढवण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. तरुण पिढी हे सर्व राजकीय पक्षाचे मोठे लक्ष्य आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येऊन आपला चाहता वर्ग तयार करण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरू असतो़ हे माध्यम गतिशील असल्याने, त्याची परिणामकारकता तितकीच गतिशील आहे. ज्या गतीने ते एखाद्याला उंचीवर घेऊन जाते, त्याहून जास्त गतीने खालीही खेचते. निवडणुकांच्या आधी आणि निकाल जाहीर होण्यापूर्वी सोशल मीडियावरील बातम्यांना (आणि अफवांना) फारच महत्त्व प्राप्त होते. आजच्या राजकारणाचा गाभा अन आवाका घडविण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे. सोशल मीडिया हे जागतिकीकरणानंतरच्या सध्याच्या गतिमान युगाचे प्रतिबिंब आहे.
(संगणक साक्षरता प्रसारक)

Web Title: Social media; New means of measuring political power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.