मोठ्या झेपेसाठी छोटे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:35 AM2017-11-29T00:35:48+5:302017-11-29T00:37:12+5:30

सोमवारी साजरा झालेल्या राष्ट्रीय अवयवदानदिनी नवा विक्रम प्रस्थापित करून, या मानवतावादी राष्ट्रीय कार्यात आम्हीही मागे नसल्याचे विदर्भाने सिद्ध केले. सोमवारी नागपुरात चार मूत्रपिंडांचे रोपण करण्यात आले

 Small steps for a big shot | मोठ्या झेपेसाठी छोटे पाऊल

मोठ्या झेपेसाठी छोटे पाऊल

googlenewsNext

सोमवारी साजरा झालेल्या राष्ट्रीय अवयवदानदिनी नवा विक्रम प्रस्थापित करून, या मानवतावादी राष्ट्रीय कार्यात आम्हीही मागे नसल्याचे विदर्भाने सिद्ध केले. सोमवारी नागपुरात चार मूत्रपिंडांचे रोपण करण्यात आले, प्रत्येकी एक यकृत पुणे व मुंबईला पाठविण्यात आले, तर एक हृदय मुंबईला पाठविण्यात आले. शिवाय नागपूर व अमरावतीत प्रत्येकी दोन ‘कार्निया’चे (डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा) यशस्वीरीत्या रोपण करण्यात आले. दोन ‘ब्रेन डेड’ रुग्णांच्या नातेवाईकांनी दाखविलेल्या अतुलनीय औदार्यामुळे एकूण ११ रुग्णांना नवे जीवन लाभले वा त्यांच्या जीवनात प्रकाश उजळला! नागपुरात २०१३ पासून आजवर एकूण २६ अवयव रोपण पार पडले आहेत. शिवाय उपराजधानीने या वर्षात आजवर मुंबई, पुणे व दिल्लीतील गरजू रुग्णांसाठी एकूण चार हृदय व अकरा यकृत पुरविले आहेत. नागपूरपाठोपाठ आता अमरावती शहरानेही अवयव दानाच्या मानवतावादी कार्यात पुढाकार घेतला आहे. गत काही वर्षांपासून भारतात अवयवदानाने गती घेतली असली, तरी जागतिक आकडेवारीशी तुलना केल्यास आपण अजूनही जगाच्या बरेच मागे आहोत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात दर तासाला सरासरी १४.५ अवयवांचे रोपण होते. भारतासंदर्भात बोलायचे झाल्यास, एका सर्वेक्षणानुसार, दरवर्षी सुमारे पाच लाख रुग्ण प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने मृत्युमुखी पडतात. त्यापैकी दोन लाख रुग्णांना यकृताची, तर पन्नास हजार रुग्णांना हृदयाची गरज असते. शिवाय दीड लाख रुग्णांना मूत्रपिंडाची प्रतीक्षा असते; मात्र त्यापैकी जेमतेम पाच हजार भाग्यशाली रुग्णांनाच ते सध्याच्या घडीला लाभू शकते. या क्षेत्रात आपल्याला अजून किती मोठी मजल मारायची आहे, हे या आकडेवारीवरून दिसून येते. इथे नील आर्मस्ट्राँग या चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणाºया अंतराळवीराचे बोल आठवतात. चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर नील आर्मस्ट्राँग म्हणाला होता, ‘‘मनुष्यासाठी हे खूप छोटे पाऊल आहे; पण मानवजातीसाठी ही खूप मोठी झेप आहे.’’ आज अवयवदानाच्या क्षेत्रातील आपले पाऊल छोटे भासत असले, तरी उद्या त्या बळावरच आपण खूप मोठी झेप घेऊ शकणार आहोत. भारतातील बहुसंख्य लोक धार्मिक प्रवृत्तीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात दानाचे अपरंपार महत्त्व आहे. तेव्हा अवयवदानासंदर्भात पुरेशी जनजागृती घडवून आणल्यास, त्याचे महत्त्व आणि गरज नागरिकांच्या मनावर बिंबविल्यास, सध्या ज्या रुग्णांना अवयव उपलब्ध नसल्याने जीव गमवावा लागतो, त्यांना नवे आयुष्य लाभू शकेल!

Web Title:  Small steps for a big shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.