वर्षभरापूर्वी सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात बंडखोरांचा कथित म्होरक्या बुऱ्हान वणी ठार झाल्यापासून काश्मीर खोऱ्यातील युवकांनी दगडफेकीचे अस्र उपसले आहे. सुरक्षा दलांनी एखाद्या भागात बंडखोरांना शोधण्यासाठी कारवाई सुरू केली की युवकांचा मोठा जमाव जमतो व तुफान दगडफेक सुरू करतो. गेल्या वर्षभरात अशा दगडफेकीच्या तब्बल ४११ घटना घडल्या असून, त्यात सुरक्षा दलांचे शेकडो जवान जखमी झाले आहेत. या दगडफेकीचा प्रतिकार कसा करायचा हा सुरक्षा दलांसाठी डोकेदुखीचा विषय झाला आहे. हिंसक नागरी जमावावर थेट बंदुका चालविता येत नसल्याने पेलेट गन्सचा वापर केला गेला. परंतु या पेलेट गनचे छर्रेे लागून असंख्य तरुणांच्या डोळ्यांना इजा झाली व अनेकांना दृष्टी गमवावी लागली. यातून जनक्षोभ आणखी वाढला. पेलेट गनला पर्याय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने एक समितीही नेमली. या समितीच्या सूचनेनुसार आता रबरी गोळ्यांच्या बंदुका वापरण्याचे ठरविले आहे. काश्मीरसारख्या संवेदनशील भागातील या समस्येवर असे विचारमंथन सुरू असताना एक अनपेक्षित सूचना पुढे आली आहे. मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील लाखपूर या दुर्गम गावातील प्रेम सिंग नावाच्या आदिवासी युवकाने केलेली ही सूचना वरकरणी अनोखी वाटत असली तरी थोडा विचार केल्यावर ती व्यवहार्य नसल्याचे दिसून येते. ग्रामीण भागांमध्ये सुगीच्या हंगामात शेतांवर येणारे पक्ष्यांचे थवे उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोफण या पारंपरिक कौशल्याचा उपयोग करून काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या जमावांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘गोफण बटालियन’ स्थापन करावी, अशी या प्रेमसिंगची सूचना आहे. एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेने स्थानिक नेत्यांच्या मतमतांतरासह ही बातमी प्रसृत केल्याने गुरुवारी तो एक चर्चेचा विषय झाला. परंतु ‘गोफण ब्रिगेड’ हा पर्याय व्यवहार्य नाही. पहिली गोष्ट म्हणजे गोफण हे अचूक नेम धरून लक्ष्यवेध करण्याचे साधन नाही. शेतांवरही गोफण फिरविली जाते ती पाखरे मारण्यासाठी नव्हे, तर उडविण्यासाठी. शिवाय गोफण फिरविण्यासाठी सभोवतालच्या भागाहून उंच असे मचाण लागते. दंगलसदृश परिस्थितीत ते शक्य नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस आणि सुरक्षा दलांनी बळाचा वापर करण्याचे काही नियम ठरलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी कोणती साधने कधी वापरावीत याचीही बंधने आहेत. निदर्शक दगड मारतात, म्हणून सुरक्षा दलांनीही त्यांना दगडानेच प्रत्युत्तर देणे यात बसू शकत नाही.