शिवसेनेला उर्जेची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 04:32 PM2019-07-17T16:32:24+5:302019-07-17T16:33:10+5:30

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची राज्यस्तरीय जनआशीर्वाद यात्रा खान्देशातून सुरु होत आहे

Shivsena needs energy | शिवसेनेला उर्जेची आवश्यकता

शिवसेनेला उर्जेची आवश्यकता

Next

मिलिंद कुलकर्णी
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची राज्यस्तरीय जनआशीर्वाद यात्रा खान्देशातून सुरु होत आहे. खान्देश हा शिवसेनेचा कधीही बालेकिल्ला राहिलेला नाही; परंतु सेना आणि ठाकरे कुटुंबाचा खान्देशशी ऋणानुबंध जुना आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि जळगावच्या ‘बातमीदार’च्या नानासाहेब नेहेते कुुटुंबियांचा ऋणानुबंध होता. प्रबोधनकार हे ‘बातमीदार’मध्ये नियमित स्तंभलेखन करीत असत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद नानासाहेबांच्या सुपूत्राकडे दिले होते. बाळासाहेब ठाकरेदेखील अनेकदा खान्देशात येऊन गेले. जळगावात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी सुरेशदादा जैन यांनी बाळासाहेबांना बोलावले होते. त्यावेळी झोपडपट्टीवासीयांसाठी सुरेशदादांनी उभारलेली घरकुले पाहून भारावलेल्या बाळासाहेबांनी पहिल्या युती सरकारच्या काळात शिवशाही गृहनिर्माण प्रकल्पाची जबाबदारी सुरेशदादा जैन यांच्यावर सोपविली. भुसावळात विधानसभेची उमेदवारी तत्कालीन जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांना जाहीर झाली होती, परंतु, बाळासाहेबांच्या जाहीर सभेत दायमा यांनी तत्कालीन तालुकाप्रमुख दिलीप भोळे यांचे नाव उमेदवारीसाठी सुचविले आणि बाळासाहेबांनी दिलदारीने ते स्विकारले. भोळे सलग दोनदा आमदार झाले. शिवसैनिक, पदाधिकारी आणि बाळासाहेब यांच्यातील स्रेह, ऋणानुबंध आणि विश्वासाचे हे मोठे उदाहरण होते. संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख अशी उत्तम संघटनबांधणी सेनेत आहे. हरिभाऊ महाजन, गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, सुरेशदादा जैन, आर.ओ.पाटील, किशोर पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे, प्रा.शरद पाटील, रामकृष्ण पाटील असे आमदार सेनेकडून निवडून आले आहेत. काही नंतर सेनेतून बाहेर पडले, पण प्रभाव राखू शकले नाही.
खान्देशचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात सेनेचे संघटन चांगले आहे. राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे उपनेतेदेखील आहेत. प्रा.चंद्रकांत सोनवणे व किशोर पाटील हे आणखी दोन आमदार आहेत. काही पालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व आहे. मात्र धुळे, नंदुरबारची तशी स्थिती नाही. धुळे हा एकीकडे सेनेचा बालेकिल्ला होता. मात्र अंतर्गत राजकारणामुळे ताकद क्षीण झाली. महापालिकेवर असलेले वर्चस्व गमावले गेले. नंदुरबारात काँग्रेसशी आघाडी करुन सेनेने पालिकेत सत्तास्थान मिळविले. पण उर्वरित ठिकाणी ताकद नसल्याची स्थिती आहे.
विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने विचार केला तर जळगाव जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, पाचोरा आणि चोपडा हे मतदारसंघ विद्यमान आमदारांचे असल्याने भाजपसोबत युती करताना त्यात काही बदल संभवत नाही. जळगावात सुरेशदादा जैन, एरंडोलमध्ये चिमणराव पाटील, मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील हे गेल्यावेळी पराभूत झाले असले तरी त्यांची मतदारसंघावर पकड आहे. भाजपकडून हे मतदारसंघ मिळविण्यासाठी सेनेला जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत. चाळीसगाव आणि भुसावळमध्ये सेनेची ताकद असताना चुकीचे उमेदवार दिले गेल्याने मोठा फटका बसला. त्याठिकाणी आता सेनेला दावा करणेही अवघड बनले आहे. जामनेर आणि रावेरमध्ये कामगिरी फारशी समाधानकारक नाही.
धुळ्यात प्रा.शरद पाटील हे ग्रामीण मतदारसंघाऐवजी धुळे शहरात इच्छुक आहेत. पण ही जागा गेल्यावेळी भाजपने जिंकली असल्याने सेनेला ती परत मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. तर ग्रामीणमध्ये पक्षाला उमेदवार शोधावा लागणार आहे. साक्री, शिरपूर, शिंदखेड्यात पक्षाचे पदाधिकारी सक्रीय असले तरी संघटन मजबूत नाही आणि निवडणुकीत विजयाचे गणित जमून येण्यासारखी स्थिती नाही.
नंदुरबारात डॉ.विक्रांत मोरे, आमशा पाडवी यांच्यासारखे जिल्हाप्रमुख प्रभावी आहेत, पण संघटन कार्य फारसे नसल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एखादा उमेदवार पाच आकडी संख्या गाठतो, हा इतिहास आहे. त्यामुळे संघटनात्मक नव्याने बांधणी करण्याची आवश्यकता आहे.
आदित्य ठाकरे हे नव्या दमाचे, दृष्टीचे आणि विचारांचे युवा नेते आहेत. त्यांच्या यात्रेचा फायदा सेनेला होईलच, शिवाय जनमानसामध्ये या तरुण नेतृत्वाविषयी आशा निर्माण होण्यास मदत होईल.

Web Title: Shivsena needs energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव