शिंदेंच्या विचाराने झपाटलेला संशोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:10 AM2017-08-17T00:10:07+5:302017-08-17T00:10:08+5:30

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा विचार ज्यांना पटला त्यांना शिंदेंनी झपाटून टाकले.

Shinde's thoughtful researcher | शिंदेंच्या विचाराने झपाटलेला संशोधक

शिंदेंच्या विचाराने झपाटलेला संशोधक

googlenewsNext

- सुधीर लंके
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा विचार ज्यांना पटला त्यांना शिंदेंनी झपाटून टाकले. अहमदनगरचे डॉ. भि.ना. दहातोंडे यांनी नुकतीच पंचाहत्तरी ओलांडली. हा माणूस आपले निम्मे आयुष्य याच विचारासाठी जगला व जगत आहे. आपले संशोधनच त्यांनी जीवन बनविले.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आजही समाजाला किती समजले? हा प्रश्न निरुत्तरित आहे. हयातीत त्यांची उपेक्षा झालीच, पण त्यांच्या पश्चातही महाराष्टÑाने त्यांना न्याय दिला, असे म्हणता येणार नाही. माजी आमदार डॉ. मा.प. मंगुडकर हे पहिले असे गृहस्थ आहेत जे शासनदरबारी शिंदे यांचा विचार पुढे नेण्यासाठी भांडले. शिंदे यांचे ते पहिले अभ्यासक मानले जातात. भारतभर फिरून त्यांनी शिंदे यांचे साहित्य जमवून प्रकाशित केले. मंगुडकर यांच्या आग्रहामुळेच शासनाने शिंदे यांच्यावर आधारित ‘धर्म, जीवन व तत्त्वज्ञान’ हे दोन खंड प्रकाशित केले. ‘मंगुडकर उठले कीे महर्षी शिंदे यांचे नाव घेतात’, अशी टीका त्यावेळी त्यांच्यावर झाली. शिंदे यांचे चालते-बोलते विद्यापीठ ही उपाधीही त्यांना प्राप्त झाली.
शिंदे यांना ज्यांनी समजावून घेतले ते असेच झपाटले गेले. एस.एम. जोशी, प्रा. एन.डी. पाटील, सदानंद मोरे, डॉ. गो.मा. पवार, भास्कर भोळे, नागोराव कुंभार, शंकरराव कदम, डॉ. नागनाथ कोतापल्ले, कॉ. गोविंद पानसरे, न्यायमूर्ती पी.बी. सावंत हेही शिंदे यांचे मोठे अभ्यासक आहेत. यात संशोधक म्हणून अहमदनगरच्या डॉ. भि.ना. दहातोंडे यांचाही समावेश करावा लागेल. दहातोंडे हे देखील आपले निम्मे आयुष्य शिंदे यांच्यासाठीच जगले. त्यांच्याही नसानसात शिंदे भिनलेले आहेत. दहातोंडे यांनी या आठवड्यात वयाची पंचाहत्तरी ओलांडली; पण शिंदेंचा स्मारक ग्रंथ केल्याशिवाय आपल्या आयुष्याला पूर्णता येणार नाही, अशी त्यांची धारणा आहे.
नगरच्या जिल्हा मराठा शिक्षण संस्थेत १४ वर्षे लिपिकाची नोकरी केल्यानंतर ते प्राध्यापक झाले. माजी प्राचार्य ह.की. तोडमल व स.वा. मुळे यांनी त्यांना महर्षी शिंदे यांचे जीवन, चरित्र व कार्य या विषयावर पीएच.डी. करण्याचा सल्ला दिला, म्हणून दहातोंडे त्या वाटेला गेले. त्यानंतर ते शिंदेंचेच झाले. ‘शिंदे यांच्याविषयी जो अभ्यास करेल, तो माझा झाला’, असे मंगुडकर स्कूलचे तत्त्व आहे. त्यामुळे त्यांनी आपले घरच दहातोंडे यांच्यासाठी खुले केले.
इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना महर्र्षींनी १९०१ मध्ये तेथील वृत्तपत्रात ‘भारतातील सामाजिक सुधारणेची अद्भुतता’ हा लेख लिहिला होता. इंग्लंडच्या मँचेस्टर कॉलेजशी पत्रव्यवहार करून हा लेख दहातोंडे यांनी मिळविला. त्याबद्दल राम बापट व पी.बी. सावंत यांनी त्यांचे खास अभिनंदन केले होते. दहातोंडे यांचे संशोधन फक्त पदवीपुरते मर्यादित राहिले नाही. तो त्यांच्या जीवनाचा विचार बनला. शिंदे यांचा विचार हेच आपल्यासाठी सर्वात मोठे मेडल असल्याचे ते मानतात.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नावाचे प्रतिष्ठानच त्यांनी स्थापन केले. महर्षी शिंदे स्मारक ग्रंथ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तो प्रकाशित करावा म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले. पत्रव्यवहार केला. शरद पवारांपासून अनेकांना भेटले, पण त्याला यश आले नाही. आता प्रतिष्ठानमार्फत वर्गणी करून तो प्रकाशित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लहान मुलांना शिंदे समजावेत यासाठी ‘मुलामुलींचे महर्षी शिंदे’ ही गोष्टीरूप पुस्तिका त्यांनी काढली. त्यातील ‘दयाळू विठू’ हा धडा इंग्रजी व हिंदी माध्यमाच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे.
शिंदे हे पहिले असे मराठा होते जे जातीतून बाहेर पडत व्यापक झाले. पुण्याच्या भवानी पेठेत अस्पृश्य वस्तीत ते बायको-मुलांसह जाऊन राहिले. ‘न्यायाची चाड, अन्यायाची चीड आणि महाराष्टÑात राहतो तो मराठा’ अशी त्यांनी ‘मराठा’ शब्दाची व्याख्या केली होती.
महाराष्टÑ ‘शाहू, फुले, आंबेडकर’ हे सूत्र मांडतो. पण त्याऐवजी ‘फुले-शिंदे-शाहू-आंबेडकर’ हे सूत्र स्वीकारायला हवे, असा दहातोंडे व नगरचे निवृत्त प्राचार्य विद्याधर औटी यांचा आग्रह आहे. त्यादृष्टीने ते संधी मिळेल तेथे मांडणी करतात. पीएच.डी. पूर्ण झाली की संशोधक मरतो म्हणतात. अशा संशोधकांनी दहातोंडे यांच्याकडे बघायला हवे. घरापेक्षाही त्यांनी शिंदेंना प्राधान्य दिले.

Web Title: Shinde's thoughtful researcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.