Security of journalists 'settlement' | पत्रकारांच्या सुरक्षेचा ‘बंदोबस्त’
पत्रकारांच्या सुरक्षेचा ‘बंदोबस्त’

- संदीप प्रधान
लखनौमध्ये आबिद अली या पत्रकारावर टोळक्याने हल्ला केला, तेव्हा त्याची पत्नी घरातून रिव्हॉल्व्हर घेऊन बाहेर आली आणि तिने हल्लेखोरांवर चक्क गोळीबार केला... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाटोडीवर आडवा हात मारत ही दृश्ये पाहिली. लागलीच त्यांनी आपल्या स्वीय सहायकांना फोन लावला आणि तातडीने पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या मंडळींची बैठक बोलावण्याचे फर्मान सोडले. रात्री-अपरात्री पेंगुळलेल्या समितीच्या प्रतिनिधींना रामप्रहरीच्या बैठकीचे निरोप गेले. सकाळी डोळे चोळत मंडळी बैठकीच्या दालनात दाखल झाली. पत्रकारांवरील हल्ल्याचा विषय काढला, तरी छान तोंडभरून हसत सरकारीछापाचे उत्तर देणारे फडणवीस अचानक स्वत:हून बैठकीला कसे तयार झाले, या कल्पनेने अस्वस्थ झालेल्या काही समिती सदस्यांनी तो नारायण आज पश्चिमेकडे, तर उगवला नाही ना? या कल्पनेनं दोन-पाच वेळा पश्चिमेकडं न्याहाळलं. एक-दोघा सदस्यांनी बैठकीच्या दालनात परस्परांना कडकडून चिमटे काढून पाहिले, पण हे स्वप्न नव्हते. तेवढ्यात, मुख्यमंत्री फडणवीस दाखल झाले. पत्रकार मित्रांनो, तुमच्यावरील हल्ल्याच्या घटना रोखण्याकरिता कठोर कायदा करण्याचा आपला इरादा पक्का आहेच. मात्र, यापूर्वी डॉक्टरांवरील हल्ले रोखण्याचा कायदा करून फारसे हाती लागलेले नाही. त्यामुळे सरकारने एक जालीम उपाय योजण्याचे ठरवले आहे. मला सर्व पत्रकारांच्या पत्नींची नावे व फोन नंबर हवे आहेत. या भाऊरायाची भाऊबीज दिवाळीपूर्वी अ‍ॅडव्हान्स घरपोच होईल. मात्र, ती भेट केवळ त्याच बाळगू शकतील. एवढे बोलून फडणवीस निघून गेले. समितीचे सदस्य उघड्या तोंडाचा चंबू करून बसले. अवघ्या दोनच दिवसांत सर्व पत्रकारांच्या घरी बंद खोके पोहोचले. अर्थात, ते पत्रकारांच्या पत्नीच्याच हाती सोपवले गेले. आईच्या नावे चक्क मुख्यमंत्र्यांकडून आलेली ही गिफ्ट उघडून पाहायला पोरंबाळं उतावीळ झाली. मात्र, जेव्हा खोक्यातून बाहेर आलेले घोडे बायकोने पत्रकार नवरोजींवर रोखलेले पाहिले, तेव्हा अनेकांची दातखीळ बसली. काहींचा रक्तदाब वाढला, तर काहींनी कानाला जानवी गुंडाळत पळ काढला. पत्रकार घरातून बाहेर पडताना ‘सौ’ने भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असे म्हटले तरी कार्यालय गाठेपर्यंत बहुतांश पत्रकार दहावेळा मागं वळून पाहू लागले. सुटीच्या दिवशी काही पत्रकारांवर आपल्या चिरंजीवांसोबत चोर-पोलीस खेळण्याची आफत ओढवली. चोर झाल्यानं हॅण्ड्सअप केलेल्या पत्रकारांचे पाय लटपटा कापू लागायचे, तर तिकडं माझं गुणाचं गं पोरं अगदी सीआयडीमधल्या दयासारखं दिसतंय, असं म्हणत सौ पोराचे पापे घेत असायच्या. रात्री काम संपल्यावर रेंगाळणाºया पत्रकारांना ‘वेळेवर येताय ना घरी’ हे पत्नीचे उद्गार गब्बरसिंगच्या ‘अब गोली खा’, ऐकू येऊ लागले. एक-दोघा पत्रकारांच्या बायकोने जेम्स बॉण्डसारखा हातात रिव्हॉल्व्हर घेतलेला डीपी ठेवल्याने त्यांचे चेहरे ‘स्कायफॉल’ अर्थात आभाळ कोसळल्यासारखे झाले होते. पत्रकारांच्या घरात ‘सामान’ (हा गँगमधील शब्द) असल्याची वार्ता सर्वदूर पसरल्यावर एक दिवस सर्व घोडे गोळा करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला पत्रकार गेले, तेव्हा ते हुबेहूब खºयासारखे दिसणारे खेळण्यातील घोडे होते, हा उलगडा झाला...


Web Title: Security of journalists 'settlement'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.