सांगा बापू-मालक, सोलापूर कसे विकायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 2:52am

सोलापूरच्या मार्केटिंगची भाषा केवळ भाषणापूरती ठेवून कसे चालेल ? सध्या सोलापूर कसे ‘विकायचे?’ या प्रश्नाचा वेध जिल्ह्यातील व शहरातील सामान्य माणूस घेऊ लागला आहे.

सोलापूरच्या मार्केटिंगची भाषा केवळ भाषणापूरती ठेवून कसे चालेल ? सध्या सोलापूर कसे ‘विकायचे?’ या प्रश्नाचा वेध जिल्ह्यातील व शहरातील सामान्य माणूस घेऊ लागला आहे. इच्छाशक्तीला कृतीची जोड न मिळाल्यास कोणत्याही चांगल्या माणसाचे नियोजन स्वप्नरंजनाच्या पलीकडे पोहोचत नाही. हा अनुभव सध्या सोलापूर जिल्हा घेऊ लागला आहे. एखाद्या कारखान्याची ‘चिमणी’ पडते की राहते किंवा राजकीय गटबाजीच्या सारीपाटावर यश संपादन करून कोणता नेता डिंग्या मारतो यात सामान्य नागरिकाला रस असू शकत नाही. इथे मात्र नको ते विषय ताणत बसणे आणि राजकारणाच्या एरंडीचे गु-हाळ गाळण्यातच आनंद मानला जात आहे. बरं एकदा ठरले की, सोलापूर जगभरात विकायचेच ! (विकायचे म्हणजे सोलापूरच्या सशक्त आणि गौरवशाली बाबींचे मार्केटिंग करायचे असं, बरंका !) मग विक्रीसाठी आवश्यक असणारी फक्त बोलबच्चनगिरी करून कसे भागेल ? अगोदर वस्तूंची गुणवत्ता जी उच्च आहे ती अबाधित राखून उच्च कोटीचे सादरीकरण करावे लागेल. मागच्या आठवड्यात ‘क्रेडाई’ या संस्थेने सोलापूर जिल्ह्याचे मार्केटिंग करणारी एक खूप चांगली व्हिडिओ क्लिप प्रसारित केली होती. ‘लोकमंगल’कार आणि राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाषबापू देशमुख यांनीही मंत्रिपदाची महावस्त्रे परिधान करण्यापूर्वीच सोलापूरच्या मार्केटिंगची महती जाणून तसे काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांचे काम आणि भूमिका मर्यादित स्वरूपाची होती. त्याप्रमाणातच लोकांच्या अपेक्षाही होत्या. पण ते राज्यातले प्रमुख कॅबिनेटमंत्र्यांपैकी एक बनल्यानंतर त्या अपेक्षा दुणावल्या. सोलापूरचे मार्केटिंग आणि सोलापूर जिल्ह्याचा विकास ही केवळ सुभाषबापूंची जबाबदारी आहे असे मात्र आम्ही म्हणणार नाही. ती सर्वांचीच जबाबदारी आहे. पण पालकमंत्री म्हणून आमचे ‘आवडते मालक’ विजयकुमार देशमुख आणि जिल्ह्यातील वजनदार कॅबिनेट मंत्री म्हणून सुभाषबापू यांच्याकडे उत्तरदायित्वाचा अधिक वाटा जातो. ३८४ कोटी रुपये स्मार्ट सिटीच्या तिजोरीत येऊन महिने लोटले तरी स्मार्ट होण्याची कुठलीही चिन्हे आम्हाला दिसेनात. रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर साडेबावीस कोटी रुपये खर्च होणार आहेत म्हणे ! स्मार्ट रस्तेच स्मार्ट करून सोलापूर शहर स्मार्ट होणार आहे का? गारमेंट पार्कच्या गप्पा झाल्या ! राज्याला लागणाºया शालेय गणवेशात अर्धा वाटा आमचा असतो अशी शेखी आम्ही मिरवतो. गारमेंट पार्क कागदावरून प्रत्यक्ष प्लॉटवर कधी येणार? राजमाता अहल्याबाई होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. राजमाता अहल्याबाईएवढीच श्रद्धा आमची महात्मा बसवेश्वरांवरही आहे. नामकरण तर झाले, विद्यापीठाच्या विकासाचे काय? छोटे कार्यक्षेत्र प्रगतीला उपकारक असते असे म्हणतात. बाकीचे राजकारण सोडून आपले छोटे विद्यापीठ आंतरराष्टÑीय दर्जाचे व्हावे असे का कोणाला वाटत नाही ? उजनी धरण ११० टक्के क्षमतेने भरले. उपलब्ध पाण्याचे नियोजन बापू आणि मालकांनी काय केले? पाणी संपल्यावरच आपण सगळे जागे होणार आहोत काय? सत्ता ही खुर्चीवर बसणाºयाला अंध आणि कर्णबधीर बनवत असते असे अनेकजण म्हणतात. त्याच कारणाने बापू व मालक आपल्या असंख्य ‘चाणक्य’ दर्जाच्या मोहºयात गुंतल्याने आज विचारू वाटते, सांगा बापू-मालक, सोलापूर कसे विकायचे ? - राजा माने

संबंधित

अंग्रेजों के जमाने का वाफेवरचा रोडरोलर लक्ष वेधतोय सोलापुरच्या इंद्रभवनात !
वडार समाजाचा सोमवारी सोलापुरात राज्यस्तरीय महामेळावा
दोन महिन्यांत सोलापूर जिल्ह्यातील १६३ आरोपींवर कारवाई
काँग्रेसला आता चांगले दिवस; लोकांचे काँग्रेस पक्षावरील प्रेम वाढले : सुशिलकुमार शिंदे
सोलापुरची सिद्धरामेश्वरांची यात्रा ; ६८ लिंग पायी यात्रा परिक्रमेचा मार्ग भक्तांसाठी थोडासा खडतरच !

संपादकीय कडून आणखी

सरप्लसमुळे शिक्षक मायनस होणार का ?
भूसंपादन कायद्याच्या पुनर्विचाराची गरज
राहुल गांधींना जनादेश
ऊर्जित पटेलांचा मोदींना धक्का
जी-२० परिषदः विसंवाद्यांतील संवाद

आणखी वाचा