सरस्वतीचा दुर्गावतार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 09:18 PM2019-01-12T21:18:01+5:302019-01-12T21:22:06+5:30

साहित्य संमेलनाच्या निमंत्रण वादाच्या वेळी जे घडले ते गैरच होते. एका व्यापक कटाचा हा भाग असल्याचेही बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमंत घेऊन टीकेचे धनी होण्याच मार्ग स्वीकारणार का ?

Saraswati's Durgavtar! | सरस्वतीचा दुर्गावतार!

सरस्वतीचा दुर्गावतार!

Next

- अविनाश थाेरात

‘जाज्वल्य हवेत तुमचे विचार, नुसती भाषा नको’ असे म्हणत सरस्वतीने दुर्गावतार धारण करत साहित्यिकांनी सत्व गहाण टाकलेले नाही हे दाखवून दिले.  साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संयोजकांनाच ठणकावत झुंडशाहीपुढे झुकायला नको होते असे म्हणून अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा जागर केला. आक्रस्ताळेपणे नव्हे तर सात्विक भाषेतही निषेधाचा सुर मांडता येतो. अधिक परिणामकारक होतो, हे देखील त्यांनी दाखवून दिले. यवतमाळ साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण संयोजकांकडून रद्द करण्यात आल्यावर वाद उद्भवला होता. या वादावर  अध्यक्षा या नात्याने कोणतीही भूमिका अरुणा ढेरे यांनी मांडली नव्हती. अरुणा ढेरे यांचे व्यक्तीमत्व मृदू असल्याने या विषयावर त्या बोलणार नाही, असेही म्हटले जात होते. परंतु, कऱ्हाड  साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ विदुषी दुर्गा भागवत यांची परंपरा जपत त्यांनी या विषयावर आपली सडेतोड मते मांडली.
 
लेखकाचा  आवाज दाबून टाकणाऱ्या कोणत्याही सत्तेला लेखकाचा विरोध असायला हवा असेही त्यांनी सांगितले. मुक्तीची लढाई केवळ शासनाबरोबरची नाही किंवा समाजाबरोबरची नाही तर स्वत:तल्या अडथळ्यांवर आहे. राष्ट्र म्हणजे व्यक्तींचा समूह नव्हे. व्यक्तिमत्त्व असलेल्यांचा समूह म्हणजे राष्ट्र. अखंड विचारप्रवाहानं हे व्यक्तिमत्त्व घडतं. म्हणून विचाराच्या अभिव्यक्तीवरची बंधनं रद्द होणं आवश्यक आहे. या मुक्त विचारासाठी आपण जर उभे राहिलो नाही, तर भीतीचं राज्य निर्माण होईल, असे दुर्गा भागवत यांनी ठणकावून सांगितले होते. सामाजिक- राजकीय प्रश्नांवर भूमिका घेत आपली मते निर्भिडपणे मांडली होती. १९७५ मधील आणीबाणीच्या काळात झालेल्या मुस्कटदाबीच्या विरोधात त्यांनी दुर्गेचा अवतार धारण केला होता. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ‘अमुक एक गोष्ट तू लिही, असेच विचार मांड, असंच परिस्थितीचं चित्रण कर, असं लेखकाला सांगणं बरोबर नाही. पिनलकोडप्रमाणे साहित्याला नियमबद्ध करणं नुसतं हास्यास्पदच नाही, तर धोकादायकदेखील आहे.’ असे त्यांनी सांगितले होते. या परंपरेचा सार्थ वारसा अरुणा ढेरे यांनी पुढे चालविला आहे, हेच त्यांच्या साहित्य संमेलनाच्या भाषणातून दिसून आले. ‘दुर्गा भागवत : व्यक्ती विचार आणि कार्य’ हा संशोधनपर ग्रंथ साकारताना दुर्गाबाईंचे विचारही त्यांनी पचविल्याचेच या भाषणातून दिसून आले.
 
साहित्य संमेलनाच्या निमंत्रण वादाच्या वेळी जे घडले ते गैरच होते. एका व्यापक कटाचा हा भाग असल्याचेही बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमंत घेऊन टीकेचे धनी होण्याच मार्ग स्वीकारणार का ? असा सवाल त्यांनी केला. निमंत्रण रद्द करून संयोजकांकडून गंभीर चूक घडली आहे. संमेलन साहित्यबाह्य शक्तीच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम समजशक्तीने उचलली गेलीच पाहिजे, ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही, असे सांगितले. 

या वादानंतर  ही नयनतारा कोण ठाऊक आहे काय ? कोण अशा महान साहित्यिक लागून गेल्यात ? मुठभर अवार्डवापसी गॅंगमध्ये सहभागी झाल्या म्हणून कोणी विचारवंत वा साहित्यिक होत नाही. पुरस्काराचे ढिग घरात पडलेले असल्याने कोणी मान्यवर होत नाही, येथपर्यंत बोलण्याची- लिहिण्याची मजल गेली होती. त्यांनाही अरुणा ढेरे यांनी उत्तर दिले. नयनतारांचं साहित्य मराठी वाचकांना फारसं परिचित नाही. साहित्यकार म्हणून त्यांची निर्मिती वाचकांसमोर बहुधा आलेली नाही. त्यांनी हाताळलेले लेखनप्रकार, त्यांचं अनुभवविश्व आणि भारतीय साहित्यजगतातलं त्यांचा स्थान या विषयीचा मराठी वाचकांना परिचय फारसा नाही. या निमित्ताने त्यांच्या साहित्याच्या अनुवादाचा विचार कदाचित पुढे गेला असता.  संमेलनाला त्यांना निमंत्रित करताना जो हेतू मराठी माणसांच्या मनात होता त्याला त्या राजकीय विचारांचा रंग आता चढला आहे,  असे त्यांनी सांगितले. कोणत्याही तत्त्वज्ञानाशी साहित्यिकाची बांधिलकी नसते. साहित्यिकाशी बांधिलकी त्याच्या जगण्याशी असते. कलेच्याद्वारे येणारा मुक्ततेचा अनुभव हा कलाकाराचा ध्यास असतो असेही त्या म्हणाल्या. नयनतारा सहगल यांचे विचार जपायला आणि जोपासायला हवेत असेही मत अरूणा ढेरे यांनी व्यक्त केले. आपला विवेक जागृत ठेवायला हवा, सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्या इथे आल्या असत्या तर त्यांचे विचार आपल्याला समजू शकले असते. आता त्यांचे भाषण आपल्याला मिळाले आहे मात्र त्या कशाप्रकारे आवाज उठवतात, त्यांनी काय काय अनुभव घेतले आहेत? हे आपल्याला ऐकायला मिळालं असतं असंही ढेरे यांनी म्हटलं आहे.

साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही अशा लोकांमुळे वाद निर्माण होतो ते चुकीचे आहे. झुंडीचे, धर्माचे राजकारण हे त्याजंच आहे असे सांगताना ज्ञानवंतांचे आवाज आज गहिरेपणाने ऐकण्याची गरज निर्माण झाली आहे. विचारवंतांनी कायम सावध राहणं गरजेचे आहे. साहित्यिकांच्याबाबतीत मृत गोष्टी गळून पडल्या पाहिजेत, जुने विचार, जुन्या जाणीवा साहित्यिकांनी झटकून टाकल्या पाहिजेत. आपल्या संवेदना कोरड्या पडू नयेत याचीही काळजीही साहित्यिकांनी घेतली पाहिजे, असे ढेरे म्हणाल्या. हे सांगण्याची आज गरज होती. समाजात आज मध्यमवर्गीय, मध्यममार्गी लेखकांबाबत बिनकण्याचे म्हणण्याबाबत मजल गेली आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ढेरे यांनी त्याला उत्तर दिले आहे. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नासंबंधी माणसाने भूमिका घेतली पाहिजे, विशेषत: कलावंत- साहित्यिकांना आपली भूमिका असली पाहिजे आणि वेळप्रसंगी ती त्यांनी ठासून मांडली पाहिजे, असे दुर्गा भागवत म्हणायच्या. ती परंपरा जपतानाच या निमित्ताने राजकारण करून साहित्य संमेलनावर बहिष्कार घालणाऱ्यांनाही अरुणा ढेरे यांनी सुनावले. नयनतारा सहगल यांच्याबाबत वाद झाल्यावर महाराष्ट्रात बहिष्काराचे जणू पिक आले होते. यामध्ये खरोखरचे साहित्यिक किती आणि कोणत्याही प्रसंगात चमकोगिरी करण्याची सवय असणारे किती हा प्रश्न अलहिदा. पण एखाद्या प्रश्नाला भिडण्याऐवजी बहिष्कार घालणे योग्य नाही हे देखील अरुणा ढेरे यांनी महादेव गोविंद रानडे यांच्या समन्वयवादी भूमिकेच्या आधारे स्पष्ट केले. हे सांगणेही महत्वाचे होते. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या अत्यंत गौण, क्षुद्र आणि अगदी लज्जास्पद करणांनी संमेलनांना वादाचा विषय केले गेले आहे. हे होता कामा नये. भल्या वाचकांनी, निर्मळ साहित्यप्रेमींनी आणि वृत्तीगांभियार्नं लेखन करणाऱ्यांनी संमेलनाच्या स्वरूपाबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे. काहींनी या अमंगळ वातावरणापासूनच दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि संमेलनाचं स्वरूप नकोशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींनी विकृत होत राहिले, हे सांगण्याचे धाडस त्यांनी केले. सार्वजनिकरीत्या वादविवादाची, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष करीत खंडन-मंडनाची पद्धत अस्तित्वात होती, ती नष्ट झाली. समग्रतेचं, प्रश्नाच्या संपूर्ण आकलनाला महत्त्व देण्याचं निरोगी भान नाहीसं झालं. तिची जागा आता माध्यमांमधून संदर्भरहित, तात्कालिक आणि अपुरा विचार करणाऱ्या आणि संवादाकडे जाण्यापेक्षा वादांनी व्यासपीठ रंगवणाऱ्या लोकचर्चेने घेतली, असे सांगुन त्यांनी सतत चर्चांचे गुऱ्हाळ घालणाऱ्या पंचमस्तंभीयांनाही दटावले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अधिकारवाणीने हे सांगण्याची गरज होती. 

Web Title: Saraswati's Durgavtar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.