Sanjay Raut's Amit Shah Aarti | संजय राऊतांची अमित शहा आरती
संजय राऊतांची अमित शहा आरती

आषाढी एकादशीचा उपवास कोणते नेते करतात यासाठीच्या सर्वपक्षीय सर्वेक्षणात बहुतेक सगळेच उपवास करतात हे समोर आलं. त्यामुळे सगळ्या नेत्यांनी उपवास केलाच पाहिजे हा आधी तयार करण्यात आलेला व्हिप रद्द करून एक नवीनच व्हिप निघाला. त्याने राज्याच्या राजकारणात नुसती खळबळच उडाली नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंग अन् ढंगच गेला ना राव बदलून. नेते रोजच्या रोज जे बोलतात त्याच्या अगदी विरुद्ध त्यांनी दिवसभर बोलायचं व वागायचं असा हा व्हिप होता. तुमच्या रोजच्या त्याच त्या बोलण्यास कंटाळलेल्या समस्त जनतेलाही तुमचे नवे रूप बघायला मिळेल, असा टोमणाही त्यात होता.
आता आली का पंचाईत? संजय राऊत घरी आले अन् वर्षा वहिनींना म्हणाले, अगं! पटकन आरतीचं ताट तयार कर. अमित शहा येताहेत मुंबईत. त्यांचं स्वागत मी सपत्नीक करायचं असा व्हिप निघालाय मातोश्रीवरून. अन् बरं का, हा व्हिप बदलणार नाही. अविश्वासाच्या वेळसारखा नाहीय तो. त्यामुळे आपली आता खैर नाही पण आपला खैरे होणार नाही हेही नक्की. वर्षावहिनी ताट तयार करू लागल्या. मॅरेथॉन मुलाखतीचं प्रेशर बाजूला ठेऊन संजयभौ त्यांना मदत करू लागले. ‘राष्ट्र के निर्माण मे मनुष्य के चरित्र का अहम महत्त्व स्वीकारते हुए हमे मार्गक्रमण करना है’, हे मोहनजींच्या भाषणातील अहम वाक्य ते घोकू लागले. कारण मातोश्रीच्या व्हिपमध्ये तळटीप होती, ‘ संघ विचारधारेला समर्पक अशी चर्चाही अमितजींबरोबर तुम्हाला करायची आहे’.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हातात एक लिफाफा पडला. त्यांना आधी वाटलं की रत्नाकर गुट्टेंनी काही नोटीसबिटीस पाठवलीय का काय? पण दुसऱ्याच क्षणी उलगडा झाला. मोठ्या साहेबांचा बारामतीवरून आलेला व्हिप होता, उद्या दिवसभर तुम्हाला पंकजाचं कौतुक करत सुटायचं आहे. सकाळी परळी, दुपारी वरळी आणि सायंकाळी तुम्हाला योग्य वाटेल तिथे प्रेस कॉन्फरन्स घ्या अन् पंकजाबद्दल फक्त गोड बोला.
हा आदेश पाहून धनुभाऊंचा चेहरा कडवट झाला ना! पंकजाबद्दल चांगलं काय बोलू असं त्यांनी वर्षावर कॉल करून विचारलं. मुख्यमंत्रीही हुश्शार... विषय समजून घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, राँग नंबर. त्यामुळे धनुभौ पार वैतागले. विनायक मेटे, सुरेश धस यांच्याकडून टिप्स् घेण्याचा ते विचार करताहेत म्हणे! मंत्रिपदाची वाट पाहून थकलेले मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदारकीनं हुलकावणी दिलेले माधव भंडारी तर हैराण परेशान झाले. लोकसभेसाठी जुळवून घ्यायचं असल्यानं उद्धवचालिसा लिहा असं फर्मान त्यांना बजावण्यात आलं. ‘हेचि फळ काय मम तपाला’, असं म्हणत ते विचारात पडले. नशीब! प्रसाद लाडचालिसा किंवा प्रवीण दरेकरचालिसा लिहिण्याचा व्हिप ‘वर्षा’वरून आला नाही, असं स्वत:चं समाधान शेलार यांनी करवून घेतलं. ‘रिंगमास्टर के कोडेंपर, तरह-तरह नाच के दिखाना यहाँ पडता है’, या महाकवि नीरज यांच्या ओळी गुणगुणत ते उद्धवचालिसा लिहू लागले.
 


Web Title: Sanjay Raut's Amit Shah Aarti
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.