शिर्डीच्या साईशताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने शिर्डीतून विमानसेवाही सुरू झाली आहे. मात्र, हा महोत्सव केवळ शिर्डीपुरता मर्यादित करावयाचा आहे काय? हा प्रश्न उपस्थित होतो. शिर्डीच्या महोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्च महिन्यात मुंबईत बैठक घेऊन तीन हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या बैठकीला केवळ नगर जिल्ह्यातील तेही शिर्डीच्या आसपासच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत जो आराखडा ठरला त्याचीही अंमलबजावणी सुरू नाही.
वास्तविकत: शिर्डीत देशभर व जगभरातून भाविक येतात. यानिमित्ताने अहमदनगर जिल्हा, नाशिक, औरंगाबाद ही शहरे जोडता येणे शक्य होते. शिर्डीला येणारे बहुतांश भाविक हे औरंगाबाद, नाशिकवरूनच शिर्डीत येतात. मुंबईहून साईभक्तांच्या ज्या पदयात्रा येतात त्या नाशिकमधूनच पुढे मार्गस्थ होतात. हैद्राबादचे भाविकही औरंगाबादमार्गे येतात. त्यामुळे साईशताब्दीचा विचार करताना याही शहरांना सोबत व विचारात घेऊन पर्यटन विकासाचे पदर रुंदावता येणे शक्य आहे. तो विचार प्रशासकीय पातळीवर अजूनतरी झालेला दिसत नाही. नाशिकच्या कुंभमेळ्याचे नियोजन करताना नाशिकसोबतच आसपासची तीर्थस्थळे व पर्यटन केंद्रांचा विचार होतो. शिर्डी विकसित करतानाही हा दृष्टिकोन समोर ठेवायला हवा. नगर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. मात्र, नगर शहराबाबत साईशताब्दीच्या आराखड्यात काहीच उल्लेख नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही याबाबत आग्रही दिसत नाहीत. उत्तर महाराष्टÑात नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार हे जिल्हे आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने उत्तर महाराष्टÑ पातळीवर एकत्रित बैठक घेता येणे शक्य आहे. परंतु हे जिल्हे केवळ कागदावर प्रशासकीयदृष्ट्या एकत्र आहेत. विकासासाठी जो आंतरिक संवाद व्हायला हवा तोच नाही. शिर्डीतून विमानांची उड्डाणे सुरू झाली. शिर्डीच नव्हे उत्तर महाराष्टÑात प्रत्यक्षात कार्यरत झालेले हे पहिले विमानतळ आहे. कारण, नाशिक व जळगावला विमानतळ आहे. मात्र तेथून उड्डाणेच होत नाहीत. शिर्डीतून मुंबई, हैद्राबाद ही सेवा सुरू झाली आहे. भविष्यात आंतरराष्टÑीय उड्डाणेही होणार आहेत. या विमानतळाचा फायदा नाशिककरांनाही होऊ शकतो. शिर्डीत कार्गो हब झाले तर नगर, नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ती उपलब्धी ठरेल. पूर्वी खासदारकीच्या निमित्ताने नगर व नाशिक जिल्ह्यातील तालुके एकत्र होते. अजूनही उत्तर महाराष्टÑाचा पदवीधर व शिक्षक मतदारसंघ एकच आहे. पण, मतदानाच्या पलीकडे हे आदानप्रदान जाणार आहे का? यावर या प्रदेशातील सुविधांचा फायदा एकमेकांना कसा होईल हे ठरेल. तूर्तास तरी संवाद म्हणावा तसा दिसत नाही. साईशताब्दीच्या निमित्ताने तसा प्रयत्न करता येऊ शकेल. सार्इंची पालखी शिर्डीपुरती नको. जयंत ससाणे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष असताना नाशिक, नगर, औरंगाबाद हा पर्यटनाचा ‘त्रिकोण’ तयार करण्याचा मुद्दा चर्चेला आला होता. त्याबाबत बैठकाही झाल्या होत्या. मात्र, त्यास मूर्त स्वरूप मिळाले नाही. मुंबईही अकोले, भंडारदरामार्गे शिर्डीशी जोडणे शक्य आहे.
sudhir.lanke@lokmat.com


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.