भारतीय संदर्भात सोन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतीयांचे आणि विशेषत: महिलांचे सोन्याप्रती खास प्रेम आहे. लग्न समारंभ आणि खासकरुन सणांच्या दिवसांमध्ये हे सातत्याने अधोरेखीत होत आलेले आहे. किंबहुना सोने आणि सेन्सेक्स बाजार यांच्यातही सारखी जुगलबंदी होत असल्याचे आपण पाहतो. सोन्यावर केंद्र सरकारने आणलेल्या निर्बंधानंतर हा बाजार काहीसा निराश झाला होता. तथापि, अलीकडेच २ लाखांपर्यंतच्या सोने खरेदीसाठी पॅनकार्ड लागणार नसल्याचे जाहीर होताच, सोने बाजारात जान आली आहे. हेच दिवाळीच्या दिवसांमध्ये सराफा बाजारात स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या वर्षभराच्या काळवंडलेल्या बाजारपेठेवर यंदाच्या दिवाळीत पहिल्यांदा सोन्याला झळाळी मिळाली. यंदाच्या दिवाळीला सोने खरेदी अपेक्षेप्रमाणे होणार की नाही, अशी चिंता होती़ मात्र लक्ष्मीपूजनाआधीच सोने खरेदीने साडेचारशे कोटी रुपयांचा टप्पा गाठला़ आज लक्ष्मीपूजनाला यापेक्षा अधिक सोने खरेदी होईल, असा अंदाजही व्यक्त होत आहे़ वाढती मागणी बघता सोन्याचा भाव एक हजार रुपयांनी वाढला आहे़ अगदी हातावर पोट असणाºया महिलादेखील सोन्याच्या मोहातून सुटत नाही़ महिलांपेक्षा पुरुषांचे दागिने गळ्यातील चेन, अंगठी व बे्रसलेटपर्यंत मर्यादित असले तरी मुहूर्ताला सोने खरेदी करणारे लाखो असतात़ दोन दशकांआधी सोन्याचा भाव अगदी दोन ते तीन हजार रुपये तोळे होता़ त्या वेळी दागिने करून ठेवणे म्हणजे प्रत्येक घरातील एक परंपराच होती़ सोन्याचे भाव वाढले तसे ही परंपरा थोडी कमी झाली़ पण त्याचे सातत्य राहिले आहे़ गेल्या वर्षी मोदी सरकारने आणलेली नोटाबंदी, ५० हजार रुपयांपर्यंतच्या सोने खरेदीसाठी पॅनकार्ड सक्ती, नंतर आलेला जीएसटी यामुळे या वर्षी दिवाळीला सोने खरेदी अपेक्षेप्रमाणे होणार नाही, असे गणित होते़ मात्र सोने खरेदीची पॅनकार्ड सक्तीची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली़, आणि बाजार पुन्हा तरारला. त्यामुळे सोने खरेदी गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी १५ टक्क्यांनी वाढली़ आत्तापर्यंत ४५० कोटींची उलाढाल मुंबईच्या सराफा बाजारात झाली आहे़ सोन्याला पर्याय असलेल्या आणि श्रीमंताची पसंत असलेल्या प्लॅटिनमकडे अजून ग्राहकांचे पाय हवेतसे वळलेले नाहीत़ त्यामुळे सोन्याच्या उलाढालीवरच बाजारपेठ अवलंबून आहे़ यंदाच्या दिवाळीने बाजारपेठ पुन्हा थोडी उंचावली हे उत्साहाचे लक्षण म्हणावे लागेल. हा उत्साह दिवाळीनंतर टिकायला हवा, तरच बाजारपेठेची कमान चढती राहील.